प्रत्येक जिल्ह्याचं आपलं स्वत:चं एक वैशिष्ट्य असतं, एक ओळख असते. परभणी म्हटलं म्हणजे मराठवाड्यातील सांस्कृतिक केंद्र आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ या जमेच्या बाजू. परभणीला गेल्या वर्षी जुलैमध्ये जिल्हा माहिती अधिकारी म्हणून रुजू झाल्यावर कृषी महोत्सवाच्या निमित्तानं प्रथमच कृषी विद्यापीठात जाण्याचा योग आला. त्यानंतर अधूनमधून कार्यक्रमानिमित्त विद्यापीठात हजेरी लागली. तथापि या विद्यापीठात चालणारं संशोधन, विस्तार शिक्षण आणि माहिती देण्याचं काम प्रत्यक्ष पाहण्याची संधी नवनियुक्त कुलगुरु डॉ. के.पी.गोरे यांच्यामुळंच मिळाली.
पत्रकार नेहमीच निगेटीव्ह छापतात, त्यांना समाजात पॉझिटीव्ह चाललेलं दिसत नाही, अशी ओरड अनेकजण करतात. निगेटीव्ह छापून आलं तरी त्याचा वस्तुनिष्ठ खुलासा न करता, चालायचंच अशी मानसिकता अनेक अधिका-यांची दिसून येते. कुलगुरु डॉ. गोरे यांनी मात्र या गोष्टीला छेद दिला. विद्यापीठात चालणा-या उपक्रमांची माहिती सर्व पत्रकारांना द्यायची यासाठी त्यांनी विद्यापीठ भेटीचं आयोजन केलं. ऐकीव माहितीपेक्षा प्रत्यक्ष भेट देऊन, वस्तुस्थिती जाणून घेण्याची त्यांनी पत्रकारांना संधी दिली, परभणीच्या पत्रकारांनीही या संधीचा पुरेपूर लाभ घेतला.
शनिवार ७ मे रोजी सकाळी साडे नऊ ते दुपारी साडेतीन पर्यंत सुमारे सहा तास पत्रकारांनी विद्यापीठाच्या विविध विभागांना भेटी दिल्या. त्या-त्या विभागाचे प्रमुख आपल्या विभागामार्फत चालणा-या कामाची देत होते. विशेष म्हणजे स्वत: कुलगुरु डॉ. गोरे पत्रकारांसमवेत पूर्णवेळ उपस्थित होते. नकारात्मक छापून येतं म्हणून माहितीच द्यायची नाही किंवा लपवून ठेवायची या गोष्टींना फाटा देऊन त्यांनी एक सकारात्मक भूमिका घेतलेली दिसून आली. पत्रकारांनी अडचणीचे प्रश्न विचारले तरी कुलगुरुंनी वस्तुस्थिती लक्षात आणून दिल्यामुळं पत्रकारांचं समाधान झालेलं दिसलं. प्रत्येक विभागातील भेटीच्यावेळी विस्तार शिक्षणचे संचालक डॉ. रावसाहेब चोले, जनसंपर्क अधिकारी काळे हे ही पत्रकारांच्या शंकांचं निरसन करत होते.
सकाळी साडेनऊपर्यंत सर्व पत्रकार विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पोहोचले. कुलगुरुंसमवेत चहापान झाल्यावर त्यांनी विद्यापीठ भेटीची रुपरेषा सांगितली. विद्यापीठाचा परिसर सुमारे ३ हजार हेक्टर क्षेत्राचा असल्यानं वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.
सर्वप्रथम कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रास भेट देण्यात आली. केंद्राचे व्यवस्थापक डॉ. आनंद गोरे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, १ जानेवारी २००० रोजी या केंद्राची स्थापना झाली. विद्यापीठात विकसित झालेलं तंत्रज्ञान, बी-बियाणं विक्री, रोपं व कलम विक्री, कृषी औजारं विक्री प्रशिक्षण, माती तपासणी, पशु आरोग्य तपासणी, पिकावरील कीड व रोग निदान व सल्ला सेवा यासारख्या सुविधा इथून दिल्या जातात. या शिवाय कृषी माहिती वाहीनी या उपक्रमाखाली दर शुक्रवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत कृषी विषयतज्ञ ०२४५२-२२९००० या दूरध्वनी क्रमांकावर उपलब्ध असतात. शेतक-यांनी विचारलेल्या कृषी विषयक प्रश्नांना दूरध्वनीद्वारे उत्तरं दिली जातात.
याशिवाय एसएमएस सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शेतक-यांना पीकनिहाय खत, पाण्याचं नियोजन, किडीचं व्यवस्थापन अशी उपयुक्त माहिती एसेमेसद्वारे पाठविली जाते. जानेवारीपासून आतापर्यंत २९ हजार एसेमेस पाठविण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. याच केंद्रात टचस्क्रीन (स्पर्शपटल) सुविधा उपलब्ध असून कृषीविषयक माहिती केवळ एका स्पर्शावर उपलब्ध होऊ शकते. या केंद्रात दररोज दहा-पंधरा शेतकरी भेट देऊन माहिती घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
त्यानंतर पैदासकार बीजोत्पादन प्रक्षेत्रास भेट देण्यात आली. प्रवेशद्वाराजवळच गॉड या इंग्रजी शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यात आला होता. जी म्हणजे जनरेशन ऑफ आयडियाज, ओ म्हणजे ऑपरेशन ऑफ प्लॅनिंग आणि डी म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ नेशन. एकंदरीत राष्ट्रविकासाचा व्यापक दृष्टिकोन इथंही पहावयास मिळाला. इथलं बियाणं केंद्र सरकार अन् महाराष्ट्र शासनाला पुरविलं जातं, अशी माहिती सहयोगी संचालक (बियाणे) संजय देवकुळे यांनी दिली.
प्रक्षेत्र भेटीनंतर पत्रकारांची वाहनं वळाली पिंगळगड नाल्याकडं. गंगाखेड रस्त्याजवळून येणारा हा नाला विद्यापीठ परिसरातून वाहत जाऊन पुढं पूर्णा नदीला मिळतो. नाव जरी नाला असलं तरी ती एक छोटी नदीच आहे. तथापि अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिल्यामुळं यात गाळ साचलेला होता, काटेरी झुडूपं, बाभळी वाढल्या होत्या. पात्र उथळ झाल्यामुळं पावसाळयात हे पाणी प्रक्षेत्रात पसरायचं. त्यामुळं सुमारे ६०० हेक्टर क्षेत्राचं नुकसान व्हायचं.
या नाल्याच्या विस्तारीकरणाचं काम हाती घेण्यात आलं. काटेरी झुडूपं, बाभळी तोडण्यात आल्या. त्याचा फायदा म्हणजे पाणी साचण्याचा प्रश्न दूर झाला. परिसरात घेण्यात आलेल्या ५ विहिरींना चांगलं पाणी लागलं. पाणी साचल्यामुळं लागवडीसाठी वापर होऊ न शकणा-या जमिनीचा बीजोत्पादनासाठी वापर करता येणार आहे. या नाल्याचा पूर्णपणे विकास झाल्यानंतर या परिसरात अॉग्रो टुरिझम प्रकल्प राबविण्याचा मनोदय कुलगुरु डॉ. गोरे यांनी व्यक्त केला.
रेशीम संशोधन केंद्र, ऊती संवर्धन केंद्र, सिंचन व तंत्रज्ञान उद्यान, अपारंपरिक ऊर्जा उद्यान, फळे व भाजीपाला प्रक्रिया केंद्र, गृह विज्ञान महाविद्यालयाचा अन्न व पोषण विभाग, कौटुंबिक साधन व संपत्ती विभाग, मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभाग, वस्त्रशास्त्र विभाग, बीज प्रक्रिया केंद्र आदी विभागांनाही भेटी देण्यात आल्या. प्रत्येक विभागाचं कार्य म्हणजे स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो, एवढी मोठी त्याची व्याप्ती असल्याचं लक्षात आलं. रखरखीत ऊन असतांनाही पत्रकारांनी उत्साहानं सर्व माहिती जाणून घेतली, हे विशेष.
भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कुलगुरु डॉ. गोरे यांनी भविष्यकालीन नियोजनाची माहिती दिली. बदलत्या हवामानानुसार संशोधन, जैव तंत्रज्ञानाचा पीक वाण निर्मितीसाठी वापर, नैसर्गिक साधनसंपत्तीचं व्यवस्थापन, एकात्मिक पीक व्यवस्थापन, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण व काढणीपश्चात तंत्रज्ञान व प्रक्रिया असं संशोधन कार्य हाती घेण्यात येणार आहे. कृषी शिक्षणामध्ये कालानुरुप अभ्यासक्रम, कृषी व्यवसायपुरक शिक्षण, व्यवस्थापकीय कौशल्य, बौध्दीक संपदा अधिकार, मनुष्यबळ देवाण-घेवाण, सेवा सल्ला व समुपदेशन आदी योजना राबविण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
शेतकरी हा कृषी विद्यापीठाचा केंद्र असून शेती ही केवळ उपजीविकेचं साधन न राहता सर्वांगीण विकासाचं माध्यम व्हावं, अशी संशोधकांची तळमळ इथल्या भेटीवरुन लक्षात आली. शेती आणि शेतकरी यांच्या विकासासाठी कार्यरत विद्यापीठातील संशोधनकार्य पाहून समाधान वाटलं.
No comments:
Post a Comment