डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या सुवर्ण मुकुटामध्ये एक मानाचा तुरा असणार्या प्रादेशिक फळ संशोधन केंद्राची स्थापना दक्षिण कोकणातील वेंगुर्ले येथे १९५७ साली झाली. या केंद्राकडून शेतकरी - बागायतदारांसाठी नवनवीन संशोधन केले जात असून, केंद्रावरील संशोधनाचा फायदा शेतकरी बागायतदारांना होत आहे.
येथे आंबा, काजू, आवळा, कोकम, फणस, करवंद तसेच जायफळ या पिकांवर संशोधन सुरु आहे. केंद्राच्या गौरवशाली इतिहासात आंब्याच्या चार जाती, काजूच्या आठ जाती तसेच फणस, करवंद, जांभुळ आणि जायफळ यांची प्रत्येकी एक जात अशा एकूण सोळा जाती विकसित करुन त्या शेतकर्यांपर्यंत पोहचविल्या आहेत. त्याचबरोबर केंद्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत विविध विषयावरील संशोधनाअंती तज्ज्ञांनी १०२ शिफारशी केल्या आहेत.
या वेंगुर्ले केंद्रामध्ये केंद्र व राज्य पुरस्कृत अशा मिळून एकूण १० योजना कार्यरत आहेत. या केंद्राला आणि येथील अधिकार्यांना प्रतिष्ठेचे असे कृषी भुषण पुरस्कार, काजू रोपवाटिकेकरिता राष्ट्रीय पुरस्कार, गिरीधारीलाल चढ्ढा पुरस्कार, फाय फौऊंडेशन पुरस्कार, जे. एस. पटेल पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
या फळसंशोधन केंद्राने केलेल्या संशोधनात्मक, विस्तार आणि विकासात्मक कार्याची दखल घेऊन भारत सरकारतर्फे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हे एकमेव जैविक केंद्र आहे. देशपातळीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत वेंगुर्ले फळसंशोधन केंद्र हे फळपिकांच्या जातीवंत कलमांची निर्मिती करणारे प्रमुख केंद्र म्हणून मान्यताप्राप्त ठरले आहे. या केंद्राने आतापर्यंत विविध फळ झाडांची सुमारे ३५ लाख रोपे (कलमे) निर्माण करुन त्यांचा शेतकर्यांना पुरवठा केला आहे.
केंद्रातील आंबा संशोधन केंद्रावर आजपर्यंत देशी तसेच परदेशी एकूण २६८ आंबा जातीचा संग्रह करण्यात आला असून सन १९७२ पासून संकरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सन १९९६ अखेर एकूण १३ हजार ६२२ संकर करुन त्यातील १७९ संकराचा अभ्यास पूर्ण केला आहे.
सन १९८३ साली रत्ना, सन १९९२ साली सिंधु, सन १९९९ साली कोकण रुची ह्या आंब्यांच्या संकरित जाती विकसित केल्या आहेत. तर सन २००२ मध्ये हापूस ९०० या वाणाची नोंदणी करण्यात आली आहे. या संशोधनाबरोबरच १५ वर्षानंतरच्या संशोधनाअंती सुवर्णा ही आंब्याची नवीन जात प्रसारित करण्यात आली आहे. या जातीची फळे घडाने धरत असून, एका फळाचे सरासरी वजन २८२ ग्रॅम असते. कोकणातील आंबा बागायतदारांना खास निर्यात करण्यासाठी आंब्याची ही जात उपयुक्त ठरली आहे.
आतापर्यंत या केंद्रावर २९२ हून अधिक काजूवाण गोळा करण्यात आले असून, त्यापैकी ७४ वाण टपोर्या बियांचे आहेत. १९९२ मध्ये वेंगुर्ले- ७ तर १९९७ मध्ये वेंगुर्ले- ८ या काजू जाती लागवडीसाठी प्रसारित करण्यात आल्या. काजू कलमाची लागवड केल्यानंतर पहिल्यावर्षी काजू कलमांना हिवाळ्यात १५ दिवसांनी तर उन्हाळ्यात ८ दिवसांनी १५ लिटर पाणी प्रत्येक कलमांना देण्याची आवश्यकता आहे.
वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रावर फळपिकावरील संशोधन सुरु असून त्याचा फायदा सिंधुदुर्गाबरोबरच महाराष्ट्रालाही होत आहे. अलिकडे माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक नवीन बाबींवर संशोधन सुरु असून कमी दिवसात आंबापिकावर संशोधन सुरु आहे. जागतिक हवामानाचा परिणाम पिकांवर होतोय, त्यावर मात करण्यासाठी आणि कोकणातील फळ निर्मिती वाढविण्यासाठी या केंद्राचे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद असे आहेत हे विशेष होय.
Please share contact no. Of vengurle fal sanshodhan kendra
ReplyDeleteCan we purchase mango from,here
ReplyDeleteGood job
ReplyDelete