जिद्द, चिकाटी आणि अपार मेहनतीच्या जोरावर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे मोखाडय़ातील खोच या आदिवासींच्या गावाने दाखवून दिले आहे. मुंबईतील आरोहन या सामाजिक संस्थेने येथील आदिवासींना एकत्र करून साडेसात एकर जमिनीवर सेंद्रिय खताचा वापर करून भेंडी आणि मिरच्यांची लागवड केली. त्यासाठी त्यांनी आवश्यक ती सर्व काळजी घेऊन मेहनत केल्याने भेंडी आणि मिरचीचे चांगले उत्पादन आले. महत्त्वाचे म्हणजे त्याला इंग्लंडमधून चांगली मागणी असल्याने या शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे गावातील बेरोजगारीचा प्रश्नही संपुष्टात आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील मोखाडा हा दुर्गम आदिवासींचा तालुका म्हणून ओळखला जातो. आदिवासींसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांचा फायदा देखील आदिवासी घेतात. या योजनांचा लाभ घेऊन आदिवासींचे जीवनमान उंचावण्याच्या हेतूने आरोहन ही संस्था सातत्याने प्रयत्न करीत असते.
या संस्थेने खोच गावातील लोकांना एकत्र करून साडेसात एकर जमिनीवर भेंडी आणि मिरच्यांची लागवड केली. त्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करून युरोपमधील बाजारपेठ त्यासाठी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले. विशेष म्हणजे त्यात त्यांना यश आले. येथील भेंडीला इंग्लंडमधून मोठी मागणी असल्याने ती आता निर्यात केली जाते. यामुळे येथील शेतकर्यांना चांगला फायदा मिळत असल्याने त्यांचे राहणीमान उंचावण्यास तर मदत झाली आहेच, पण त्यांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबले आहे.
ही योजना राबवताना पाण्याची सोय असलेली साडेसात एकर जमीन निवडण्यात आली. ही जमीन ११ शेतकर्यांच्या मालकीची होती. त्यामुळे त्यांना एकत्र करून गटशेती तयार केली. या गावातील लोकांबरोबरच शेजारच्या गावांतीलही सुमारे १५० मजुरांना शेतीच्या कामासाठी घेण्यात आले. सेंद्रिय खताचा वापर केल्याने येथील भेंडी आणि मिरचीचा दर्जा उत्तम राहिला. त्यामुळेच या उत्पादनांना युरोपीयन बाजारपेठ मिळण्यात अडचण आली नाही. येथील शेतकर्यांना आता हमीभाव देणे आम्हाला शक्य झाले असल्याचे या संस्थेचे राहूल तिवरेकर यांनी सांगितले.
शेतीची लागवड कशी करायची याची माहिती कृषितज्ञांनी दिल्यामुळे शेतकर्यांना आत्मविश्वास आला. येथे भेंडी आणि मिरचीच्या रोपांची लागवड केल्यानंतर ४५ दिवसांनंतर उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. आम्ही सुमारे साडेतीन टन एवढं रिजंटा १५२ या जातीच्या भेंडीचे उत्पादन घेतले असून त्यातील अडीच टन भेंडी इंग्लंडला निर्यात केली. ही भेंडी शंभर टक्के नैसर्गिक वातावरणात वाढवली असल्यामुळे ती पौष्टिक असून तिची चवही खूपच चांगली आहे. त्यामुळे परदेशातून तिला चांगली मागणी आहे. येथील शेतकर्यांना या हंगामात प्रत्येकी ४५ हजार एवढे उत्पन्न मिळाले आहे.
'महान्यूज'.
No comments:
Post a Comment