Tuesday, May 22, 2012

ये फुलों की राणी....


असे म्हटले जाते की तुमच्याकडे दोन रूपये असतील तर त्यातील एक रुपयाची भाकरी घ्या (जेवण करा) आणि एक रुपयाची फुले. भाकरी तुम्हाला जगवेल आणि फुले तुम्हाला कसे जगायचे ते शिकवतील. ठाणे जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव येथील भारती अविनाश सावे यांच्या बाबतीत हे अगदी प्रत्यक्षात आलेय. त्यानी फुलांना जगवलेय आणि कसे जगायचे ते फुलांनी त्यांना शिकवलेय. फुलझाडे लावण्याच्या त्यांच्या छंदाला त्यांनी फुलशेतीचे स्वरूप दिले आणि स्वतःबरोबरच परिसरातील आदिवासी भगिनींनाही त्यांनी कृषी क्षेत्रात सहभागी करून घेतले. 

त्यांचा जन्म वसई येथे १९५८ साली झाला. गरीब परिस्थितीत दहावीपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण झाले. त्यानंतर हिरे कंपनीत त्यांनी काम केले. तिथे सचोटीने काम केल्याने त्यांनी कुशल कामगार हा किताब मिळविला. लग्नानंतर सासरची परिस्थिती काही फार वेगळी नव्हती. त्यामुळे पती अविनाश सावे यांना मदत म्हणून गावच्या बाजारात पटकन विकली जातील, अशी उत्पादने निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. इथेच त्यांची व्यापार वृत्ती (बिझनेस माईंड) दिसून येते. त्यानंतर कर्ज काढून त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. 

माळ्याच्या माळ्यामंदी पाटाचं पाणी जातं,
गुलाब, जाई-जुई, मोगरा फुलवित.....
हे गीत म्हणत म्हशींपासून मिळणाऱ्या शेणखताच्या सहाय्याने त्यांनी घरच्या जमिनीत फुलझाडांची लागवड केली. त्यातून त्यांच्या फुलशेतीची सुरूवात झाली. परिस्थितीची जाण, जबाबदारीचे भान आणि वेळेशी घातलेली सांगड यातून भारतीताईंनी बाजारात काय विकले जातेय, हे अचूक हेरले. म्हणूनच एक गोष्ट करताना तिच्याशी निगडित अनेक गोष्टी त्यांनी साधल्या. फुलांच्या कळ्या खुडून त्यापासून गजरे व हार बनवून त्यांची विक्री करणे, हा आणखी एक व्यवसाय त्यांनी सुरू केला. लग्नसमारंभात फुलांची वाढती मागणी आणि त्यांना मिळणारा दर लक्षात घेता त्यांचा जम बसला. गजरे, वेण्या, हार-तुरे, तोरणे, मंडप, सजावट आणि पूजेचा मखर करण्यास त्यांनी सुरवात केली. हे सर्व शहरी भागातील महिलांना सहजसोपे वाटत असले तरी २०-२५ वर्षांपूर्वी ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील महिलांना यासाठी वणवण आणि खूप मोठी पायपीट करावी लागत असे. 

भारतीताईंनी नंतर कुठल्याही कामाची लाज न वाटून घेता फुलांच्या जोडीला फळे, भाज्या यांची विक्रीही सुरू केली. यातून आंबा, चिकू, पेरू, संकरित पेरू, काळे पेरू यांची फळझाडे त्यांनी लावली. पण, या सर्वांत कमी मेहनत आणि अधिक कमाई मिळाली ती अळू लागवडीने. सांडपाण्यावर त्यांनी अळू पाने आणि गवती चहा यांची लागवड केली. 

हे करत असताना भारतीताईंनी तलासरी तालुक्याच्या बोरीगाव परिसरातील आदिवासी महिलांमध्ये शेतीविषयक जागृतीचे काम केले आहे. जैविक तंत्रज्ञानांतर्गत कंपोस्ट खत तयार करणे, गांडूळ शेती, आंबा, चिकू आणि इतर फळझाडांची कलमे तयार करणे, कंदमुळांचे संवर्धन, औषधी वनस्पतींचे संगोपन आणि संवर्धन इत्यादी गोष्टींचे त्यांनी आदिवासी महिलांना प्रशिक्षण दिले. तसेच, आदिवासींना वेगवेगळ्या फुलांची रोपे दिली. या फुलझाडांमधून गजरे, हार, वेण्या तयार करण्याचे ज्ञान त्यांनी आदिवासी महिलांना दिले. 

त्याशिवाय, भारतीताईंनी ग्राहक भांडार बोर्डी, खरेदी विक्री संघ डहाणू, अशा संस्थांचे सभासदत्त्व मिळवले. हे करत असतानाच महिलांचा कृषी क्षेत्रात सहभाग या सरकारी योजनेअंतर्गत स्वतः प्रशिक्षण घेतले. त्यातून परसबाग तयार करणे, कमी क्षेत्रात अधिकाधिक उत्पादन मिळविणे, दलदलीच्या ठिकाणी अळू आणि फुलांची लागवड, औषधी व सुगंधी वनस्पती लागवड यावर भर दिला. तसेच, मुख्य पिकांमध्ये लिंबू, पेरू, केळी, सुपारी, गुलाब, झेंडू, मोगरा आदी आंतरपीक घेणे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतीला जोडव्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, अन्न धान्याची सुरक्षित साठवण असे अनेक प्रयोग त्यांनी केले. स्वतःच्या बागेत शिबिरे भरवून पंचक्रोशीतील आदिवासी आणि इतर महिलांना कृषी क्षेत्रात सहभाग वाढविण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. 

आदिवासी महिलांना बचतीचे धडेही भारतीताईंनी दिले. तसेच, त्यांना स्थानिक महिला पतपेढीमध्ये सामावून घेतले आणि कर्ज मिळवून दिले. महिलांचा कृषीक्षेत्रात सक्रिय सहभाग या योजनेअंतर्गत त्यांनी आदिवासी महिलांना या योजनेत सहभागी करून घेतले. 

जिद्द, चिकाटी आणि प्राप्त प्रतिकूल परिस्थितीतून नंदनवन फुलविण्याचे कौशल्य तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव येथील भारती अविनाश सावे यांच्याकडे उपजतच आहे. अत्यंत साधी राहणी, बोलका स्वभाव, समोरच्या माणसाबद्दल असणारी आस्था, त्यातून निर्माण होणारी आत्मीयता आणि त्यातून समोरच्या माणसाला आपले करण्याची हातोटी भारती सावे यांच्याकडे पुरेपूर आहे. पती पोलीस पाटील अविनाश सावे यांच्या साथीने आणि आवश्यक असेल तेथे शासनाच्या योजनांच्या सहाय्याने भारतीताईंनी स्वतःबरोबरच परिसरातील अनेक महिलांच्या जीवनाचा मळा फुलविला आहे.

भारतीताईंच्या कृषी क्षेत्रातील कामाची दखल घेत ठाणे जिल्ह्याचा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार त्यांना २००० आणि २००३ अशा दोन वर्षी मिळाला आहे. तसेच २००० साली मानव संसाधन विकास मंत्रालय महिला एवं बाल विकास विभागाचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. याशिवाय ठाणे जिल्हा परिषद कृषी प्रदर्शन कार्यक्रम प्रशस्तीपत्रक, अन्न सुरक्षा अभियान कार्यालय पुणे आणि आरसीएफ यांच्याकडूनही त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे. हॉलंडच्या शेतकऱ्यांनीही भारतीताईंच्या मळ्याला भेट दिली आहे.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद