कोकणात प्रवेश करताक्षणी पर्यटकांचे स्वागत होते ते काजू, आंबा आणि नारळ-पोफळीच्या दाट झाडींनी. हिरव्यागर्द झाडीतून डोकावणारे पिवळे-लाल काजूबोंड खूपच सुंदर दिसतात. त्याच्या खालच्या बाजूस असलेली काजू बी काढल्यावर उर्वरित बोंड टाकून दिले जातात. शाळेतून जाणारी मुले रस्त्याने असलेल्या झाडांवरची काजूबोंड काढून मजेने खातात.
मात्र फळ म्हणून त्यांची लोकप्रियता फारशी नाही. अशावेळी खाली पडलेल्या काजूबोंडांना बुरशी लागून त्यांचे दुष्परिणाम काजू पिकावर होण्याची शक्यता जास्त असते. हा धोका टाळतानाच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रक्रिया उद्योग हा एकमेव मार्ग आहे आणि नेमके हेच शेतकऱ्यांच्या गळी उतरविण्याचे काहीसे कठीण काम रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण कृषी उपविभागाने केले. उपविभागीय कृषी अधिकारी अरिफ शहा यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाने प्रक्रिया उद्योगाशी संबंधित संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या शेतातून काजूबोंड नेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
कृषी विभागाने एक्झॉटीक फ्रुट कंपनीच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला आहे. या कंपनीमार्फत सुरूवातीस आंब्यावर प्रक्रिया करण्याचा उद्योग स्थापन करण्यात आला होता. या वर्षापासून त्यात काजू प्रक्रियेची भर पडल्याने स्थानिकांना रोजगारही मिळाला आहे. चिपळूण तालुक्यातील १०६ हेक्टर आणि गुहागर तालुक्यातील ४०० हेक्टर काजूचे क्षेत्र या उपक्रमात समाविष्ट आहे. एकूण १३०० शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. कृषी विभागाने शेतीशाळेच्या माध्यमातून या प्रकल्पाचे महत्व शेतकऱ्यांना समजाविले. शेतकऱ्यांचे संघटन करून ६५ शेतीसमूह तयार करण्यात आले. १२ गावात एकूण २० काजूबोंड संकलन केंद्र तयार करण्यात आले. झाडावरून बोंड काढण्याची आणि ते कॅरेटमध्ये भरण्याची पद्धत कृषी सहायकांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितली. उद्योगसंस्थेने पॅकेजिंगचे साहित्य वाटप आणि वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून दिली. काजूबोंडाची वाहतूक करण्याचे काम स्थानिकांना देण्यात आले.
पहिलाच प्रयोग यशस्वी झाल्याने एकूण १५२ मे.टन काजूबोंडाची विक्री झाली. काजूफेणीसाठी बोंडाला साधारण एक रुपया ७५ पैसे किलो इतका दर असताना या उपक्रमात तीन रुपये दराने शेतकऱ्यांना किंमत देण्यात आली. उद्योगसंस्थेतर्फे वाहतुकीची व्यवस्था करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात बचत झाली. शेतकरी स्वत:च दररोज शेतात जाऊन काजूबोंड तोडू लागल्याने मजूरीचा खर्च कमी झाला. शिवाय कुजलेल्या काजूबोंडामुळे शेतात होणारी घाण आणि त्याच्या दुष्परिणामावर नियंत्रण करणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे.
काजूबोंड तोडल्यावर शेतकरी त्यातील बी काढतात. हिरवे आणि लाल काजूबोंड वेगळे करण्यात येतात. केवळ पिकलेले लालसर काजूबोंड कॅरेटमध्ये भरण्यात येतात. हे काजूबोंड कंपनीच्या वाहनाद्वारे रत्नागिरी येथे आणण्यात येतात. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कारखान्यात त्याचे सीरप तयार करून प्रक्रिया केली जाते आणि हे सीरप ब्रँडेड कंपन्यांना सरबत तयार करण्यासाठी पाठविण्यात येते. काजूचे प्रति हेक्टरी सरासरी एक टन उत्पादन होते. त्याच्या सहापट साधारण काजूबोंड प्राप्त होतात. त्यामुळे सहा टनाचे तीन रुपयांप्रमाणे १५ ते १८ हजार रुपये अतिरिक्त उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते.
काजूबोंड विक्रीच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या दाराशी ग्राहक पोहोचला आहे. याच उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात सेंद्रीय शेतीसाठी शेतकऱ्यांना खतनिर्मितीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. बायोसर्ट इंडियाच्या सहकार्याने सेंद्रीय शेतीचे तीन वर्षात प्रमाणीकरण करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. असे प्रमाणीकरण झाल्यावर शेतकऱ्यांना १० ते १५ टक्के अधिक लाभ मिळणार आहे.
प्रक्रिया उद्योगाच्या विस्ताराने कोकणातील शेतकऱ्यांचे अर्थकारणदेखील बदलणार आहे. काजूबोंडापासून सीरप बनविण्याचा व्यवसाय तालुका पातळीवर सुरू होण्याबरोबरच शेतकऱ्यांनी एकत्रितपणे असा प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी कृषी विभागाने घेतलेला पुढाकार स्तुत्यच आहे. गरज आहे ते शेतकऱ्यांनी आणि व्यावसायिकांनी पुढे येण्याची.
No comments:
Post a Comment