अत्र तत्र सर्वत्र उगवणारे गाजर गवत सर्वांच्याच परिचयाचे आहे. कोणतेही खतपाणी न घातला पडीक जमिनीवर, रस्त्याच्या दुतर्फा कडेला, शेताच्या बांधावर, जंगलात अशा ठिकाणी हे गवत उगवते. गाजर गवत किती उपद्रवी आहे हे कोणाला कितपत माहित असेल हे सांगता येत नाही.
या गाजर गवताचे मानवी आरोग्यावर आणि पिक उत्पादनावर मात्र अनिष्ट परिणाम होतात हे तितकेच खरे आहे. या गवताच्या संपर्कात आल्यास त्वचा रोग, ॲलर्जी, श्वसनाचे आजार उद्भवतात. गाई, म्हशींनी गाजर गवत खाल्ले तर दूधात कडसरपणा येतो असे अनेक अवगुण या गाजर गवतात आहेत. त्यामुळे गाजर गवताच्या समूळ उच्चाटनाची गरज लक्षात घेऊन अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त गणेश ठाकूर यांच्या सकल्पनेतून अमरावती येथे संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना तज्ज्ञ मंडळींनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
राज्यात सुमारे चार ते पाच लाख हेक्टर क्षेत्र गाजर गवताने व्यापलेले आढळते. तसेच शेतीच्या पीक उत्पादनात घट होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे, कृषी उत्पादनात वाढ करणे आणि गाजर गवताचे निर्मूलन करणे यासाठी सन २००६ मध्ये विधानसभेत ठराव पारित करण्यात आला होता. अजूनही हे गाजर गवत मोठ्या प्रमाणावर दिसून येते. म्हणून या घातक गाजर गवताचे उच्चाटनासाठी तीन वर्षाचा कालबध्द कार्यक्रम संबंधित यंत्रणेनी राबवावा या दृष्टीने या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते.