निसर्गाच्या लहरीपणामुळे भाताचे उत्पन्न घटू लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शेतकर्यांनी जमिनी विकण्याचा सपाटा लावला असतानाच दुसरीकडे अलिबाग तालुक्यातील पळी-आंबेघरच्या पंकज पाटील या तरुण शेतकर्याने भातशेतीबरोबरच साडेतीन एकरामध्ये कारल्याचे पीक घेऊन नवीन पायंडा पाडला आहे.
एकेकाळी भाताचे कोठार म्हणून रायगड जिल्ह्याची ओळख होती. मात्र, काही वर्षांपासून जिल्ह्यात औद्योगिकीकरण वेगाने वाढू लागले आणि पडिक जमिनीसह शेतजमिनींवर प्रकल्प उभे राहू लागले. त्यातच खडीकरणाच्या जमिनी संरक्षक बंधारे फुटल्याने नापीक होऊ लागल्या. पावसाच्या लहरीपणामुळे भाज्या, मसाल्याची पिके घेण्याबरोबरच दुग्धव्यवसाय करण्याच्या सूचनाही कृषी विभागाकडून वारंवार करण्यात आल्या.
अलिबाग तालुक्यातील पळी-आंबेपूर येथील पंकज पांडुरंग पाटील या तरुणाने असाच एक नवा पायंडा पाडला आहे. त्याने साडेतीन एकर शेतात नऊ वर्षापासून कारल्याचे पीक घेतले आहे. दहावीच्या परीक्षेत अयशस्वी झालेल्या पंकजला पुढे शिकण्याची इच्छा असूनही परिस्थितीमुळे शिकता आले नाही. त्याने कृषी व्यवसायातून पुढे येण्याचा प्रयत्न केला. त्याला कुटुंबानेही सहकार्य केले. त्याचप्रमाणे कृषी विभागाचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
पावसाळी भातकापणीनंतर अभिषेक जातीच्या कारल्याचे पीक घेण्यात येते. एक दिवसाआड ८०० ते ९०० किलो कारले मिळते, असे पंकज सांगतो. नवी मुंबईतील वाशी येथील बाजारात कारले विक्रीसाठी नेण्यात येते. या पिकातून वर्षाला सुमारे तीन लाखांचा नफा मिळतो, असे तो आत्मविश्वासपूर्वक सांगतो.
कारल्याचे पीक घेताना त्याला सर्व प्रकारची आवश्यक द्रव्ये मिळतील असा त्याने प्रयत्न केला. त्यासाठी ७५ टक्के शेणखत आणि २५ टक्के रासायनिक खतांचा वापर करण्यात आला. रासायनिक खतामुळे पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यानेच शेणखतावर अधिक भर दिल्याचे पंकज सांगतो. उत्पादन वाढीसाठी आणि पिकाचा दर्जा राखण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे प्रयोग करत असल्यामुळे त्याचा त्याला फायदाच होत आहे. त्याने अतिरिक्त उत्पन्नातून आणखी जमीन खरेदी केली आहे.
पाऊस लहरी आहे आणि दराचा भरवसा नाही यामुळे हताश न होता बाजारभावाचा अंदाज घेऊन शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणे हिताचे आहे, असा संदेशही तो यानिमित्ताने देतो.
No comments:
Post a Comment