Thursday, April 23, 2015

"आयएमडी'चा 93 टक्के पावसाचा अंदाज 2015.

यंदा मॉन्सून सरासरीहून कमी


"आयएमडी'चा 93 टक्के पावसाचा अंदाज
""मॉन्सूनचा कमी पावसाचा अंदाज असल्याने यंदाही दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागण्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी आणि धोरणकर्त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.''
- डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री, भारत सरकार
""मॉन्सूनचे आगमन नक्की कधी होईल, याबाबतचा अंदाज हवामान विभागामार्फत येत्या 15 मे रोजी व्यक्त करण्यात येणार आहे.''
- डॉ. डी. एस. पै, प्रमुख, लांब पल्ल्याचा अंदाज विभाग, भारतीय हवामानशास्त्र विभाग
पुणे - देशात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून (मॉन्सून) यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीहून कमी (93 टक्के) पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने बुधवारी (ता.22) व्यक्त केला. या अंदाजाहून पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यता गृहीत धरण्यात आली आहे. देशाची मॉन्सून पावसाची सरासरी 89 सेंटिमीटर म्हणजेच 890 मिलीमीटर आहे. गेल्या वर्षीच्या अंदाजाहूनही यंदा कमी पावसाचा अंदाज असल्याने देशात दुष्काळाची छाया कायम राहण्याची शक्‍यता आहे.
नवी दिल्ली येथील पृथ्वी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मॉन्सून पावसाचा पहिल्या टप्प्याचा हा अंदाज जाहीर केला. हवामान विभागाच्या लांब पल्ल्याच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. डी. एस. पै या वेळी उपस्थित होते. हवामान खात्यामार्फत मॉन्सूनचा दुसऱ्या टप्प्यातील अंदाज जून महिन्याच्या अखेरीस जाहीर करण्यात येणार आहे. या अंदाजात जुलै व ऑगस्ट महिन्यांतील पावसाचा अंदाज, मॉन्सूनची वाटचाल आणि भारताच्या चारही विभागांत पडणाऱ्या पावसाचे प्रमाण स्पष्ट करण्यात येणार असल्याचे डॉ. पै यांनी सांगितले.
यंदा सरासरीहून कमी पाऊस (90 ते 96 टक्के) पडण्याची शक्‍यता सर्वाधिक 35 टक्के असून, त्या खालोखाल सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस (90 टक्‍क्‍यांपेक्षा कमी) पडण्याची शक्‍यता 33 टक्के आहे. सरासरीएवढा पाऊस (96 ते 104 टक्के) पडण्याची शक्‍यता 28 टक्के आहे. सरासरीहून अधिक पावसाची (104 ते 110 टक्के) शक्‍यता फक्त 3 टक्के तर सरासरीहून अतिपावसाची (110 टक्‍क्‍यांहून अधिक) शक्‍यता एक टक्के असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
उत्तर अटलांटिक व उत्तर प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे डिसेंबर व जानेवारी महिन्यातील तापमान, हिंदी महासागराच्या विषुववृत्ताजवळील पृष्ठभागाचे फेब्रुवारी महिन्यातील तापमान, पूर्व आशियातील फेब्रुवारी व मार्च महिन्यांतील समुद्रसपाटीवरील हवेचा दाब, वायव्य यूरोपमधील भूपृष्ठावरील हवेचे जानेवारी महिन्यातील तापमान व विषुववृत्तीय भागातील प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचे फेब्रुवारी व मार्च महिन्यातील प्रमाण या घटकांच्या नोंदींवरून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच मॉडेलनुसार हवामान विभागाने देशात 95 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात सरासरीपेक्षा 12 टक्के आणि अंदाजाहून सात टक्के कमी (88 टक्के) पाऊस पडला.
- मॉन्सून मिशन मॉडलचा 91 टक्के अंदाज
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजीच्या मॉन्सून मिशन प्रोजेक्‍टअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या मॉडेलनुसार मॉन्सून प्रायोगिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीच्या 91 टक्के पावसाचा अंदाज आहे. या अंदाजात पाच टक्के उणे- अधिक फरक होण्याची शक्‍यता गृहीत धरण्यात आली आहे.
"एल निनो'चा प्रभाव राहणार
आयएमडी आणि आयआयटीएमच्या अंदाजानुसार यंदाच्या मॉन्सून हंगामात एल-निनोचा प्रभाव राहण्याची शक्‍यता आहे. गेल्या सहा महिन्यांपासून प्रशांत महासागराच्या पश्‍चिम आणि मध्य भागामध्ये पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा अधिक होते. तर डिसेंबर 2014 ते मार्च 2015 या कालावधीमध्ये पूर्व प्रशांत महासागरामध्ये तापमान सरासरीपेक्षा कमी होते. मात्र या तापमानात सध्या वाढ झाली असून, तेथे एल निनोचा प्रभाव कमी आहे. एकंदरीत लक्षणे पाहता "एल निनो'चा मॉन्सूनवरील प्रभाव वाढण्याची चिन्हे आहेत. हिंदी व प्रशांत या दोन्ही महासागरांच्या सागरी पृष्ठभागाच्या स्थितीचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात येत असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
- अशी आहे पावसाची शक्‍यता (मॉन्सून 2015)
पावसाचे प्रमाण ---- शक्‍यता
90 टक्‍क्‍यांहून कमी --- 33 टक्के
90 ते 96 टक्के --- 35 टक्के
96 ते 104 टक्के --- 28 टक्के
104 ते 110 टक्के --- 3 टक्के
110 टक्‍क्‍यांहून अधिक --- 1 टक्के

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद