कृषी क्षेत्राच्या प्रगतीच्या आधारावर यंदाच्या आर्थिक वर्षात (2010-11) एकूण देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) 8.6 टक्के राहील असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी विभागाने (सीएसओ) वर्तविला आहे. चांगल्या पाऊसमानाने खरीप हंगामाने दिलेला हात, हिवाळ्यातील पावसामुळे रब्बी हंगामासाठी झालेली पाण्याची बेगमी यामुळे गतवर्षीच्या विकासदरामध्ये तब्बल पाच टक्क्यांची उडी कृषी क्षेत्र घेऊ शकणार असल्याचा अंदाज सीएसओने व्यक्त केला आहे.
2009-10 मध्ये कृषीचा विकासदर केवळ 0.4 टक्के होता, तेव्हा देशाचा आर्थिक विकासदर आठ टक्के राहिला होता. चालू वर्षात कृषी आणि पूरक उद्योगांच्या विकासात 5.4 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे "जीडीपी'चा आलेख गेल्या वर्षाच्या तुलनेत चढता राहणार आहे.
अर्थमंत्री प्रणव मुखर्जींनी "जीडीपी' साडेआठ टक्क्यांदरम्यान असेल असे म्हटले होते. तर रिझर्व्ह बॅंकेने गेल्या महिन्यात तिमाही पतधोरण आढाव्यादरम्यानदेखील साडेआठ टक्क्यांचाच अंदाज वर्तविला होता. त्या पार्श्वभूमीवर "सीएसओ'चा वाढीव अंदाज आशादायक मानला जात आहे. विशेष म्हणजे या अंदाजामागे 2010-11 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान, नोंदविलेल्या 8.9 टक्के जीडीपीचा आधार आहे. याशिवाय कृषी क्षेत्राने 0.4 टक्क्यांवरून 5.4 टक्क्यांवर घेतलेली झेपदेखील या अंदाजासाठी उपयुक्त ठरली आहे. त्या तुलनेत उत्पादन क्षेत्राचा विकासदर हा गेल्या वर्षीइतकाच म्हणजे 8.8 टक्के एवढा कायम आहे.
देशातील दरडोई उत्पन्नात 6.7 टक्क्यांनी वाढ होऊन तो 36 हजार तीन रुपयांवर जाणार आहे. यापूर्वीच्या अंदाजानुसार दरडोई उत्पन्न 6.1 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा होती.
आर्थिक वर्ष - कृषी विकास दर -- आर्थिक विकास दर (जीडीपी) (टक्के)
2007-08 - 4.7 - 9.03
2008-09 - 1.6 - 6.7
2009-10 - 0.4 - 7.2
2010-11 - 5.4 - 8.6
No comments:
Post a Comment