राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ६५ लाख रुपयांचा एकात्मिक दुग्ध प्रकल्प भारस्वाडा (ता. परभणी ) येथे साकारला आहे. मराठवाडय़ात प्रथमच मुक्त संचार गोठा पध्दतीचा हा प्रकल्प पांडुरंग दूध उत्पादक सहकारी संस्थेने उभारला आहे. जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला चालना देणारा हा प्रकल्प ठरणार आहे.
केंद्र शासनाच्या वतीने राज्यातील ४३ दुग्ध उत्पादक संस्थांना हा प्रकल्प देण्यात आला आहे. त्यामध्ये मराठवाडय़ातील १६ संस्थांचा समावेश आहे. भारस्वाडा येथील पांडुरंग संस्थेने मात्र गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अनुदान मिळताच तातडीने हा प्रकल्प उभा केला. १०० संकरित गाईंसाठी या प्रकल्पात ७५ टक्के अनुदान आहे. गाईंसाठी शेड, वैरण, गोडाऊन, वासरांसाठी निवारा, दुध काढण्याचे यंत्र, संगणकीय प्रणाली, दूध शीतकरण यंत्र, विद्युत जनित्र व वैद्यकीय सेवा सुविधांसाठी या संस्थेला ४६ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.
भारस्वाडा येथे संस्थेने तीन एकर जमीन या प्रकल्पासाठी वापरली असून तीन शेड उभे केले आहेत. सध्या ४५ संकरित जातींच्या गाई अहमदनगर जिल्ह्यातून आणण्यात आल्या आहेत. दोन एकरवर हा गोठा उभारला असून वैरण गोडावून, मिल्क पार्लर, पाण्यासाठी हौद उभारले आहेत. तीन शेडपैकी दोन शेडमध्ये दुभती गाई व एकामध्ये दुध न देणार्या गाईचा समावेश आहे. याशिवाय वासरांसाठी स्वतंत्र गोठा उभा केला आहे. यासाठी पाच कामगारही नियुक्त केले असून त्यांच्या निवासासाठी पाच घरकुले उभारली आहेत.
चार्याचे नियोजन करताना एका एकरावर हायब्रीड पिके घेतली आहेत. याशिवाय १० एकर जमीन ठेका पध्दतीने संस्थेने घेतली असून त्या जमिनीवर चार्याचने नियोजन केले आहे. सध्या खाद्य म्हणून सुग्रास व सरकी पेंड गाईंना दिली जात आहे. सध्या १५० लिटर दुधाचे संकलन केले जात असून ते दूध संस्था स्वत:च्या वाहनाद्वारे परभणी येथील शासकीय दूध योजनेस पाठवित असते.
इंदापूर येथील डॉ. हुनळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा दूध प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. प्राथमिक टप्प्यात प्रकल्पातील सर्व कामे पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पातून जातीवंत वासरांची निर्मिती करण्याचा देखील पांडुरंग सहकारी दूध संस्थेचा प्रयत्न आहे.
महान्यूज'
No comments:
Post a Comment