बचतगट हा शब्द कोल्हापूर जिल्ह्यात परवलीचा शब्द झाला असून ही चळवळ आज जिल्ह्यातील खेडोपाडी रुजली आहे. ही चळवळ ग्रामीण जनतेचा श्वास बनली आहे. लोणची, पापडाच्या पारंपरिक जोखडातून मुक्त होवून चळवळीने आता खेडोपाडी चालणार्या सर्व व्यवसायात आपले स्थान पक्के केले आहे. महिलांच्या मनात तर या चळवळीने आपुलकीचे स्थान मिळवले आहे.
राधानगरी तालुक्यातील कुडुत्री गावच्या बचतगटाने म्हैस पालनाचा उपक्रम राबवून आज जिल्ह्यात एक आदर्शगट म्हणून नावलौकिक मिळवला आहे. या उपक्रमामुळे आज हा गट महिलांची उन्नती साधणारा, त्यांना स्वावलंबी बनवणारा उपक्रमशील बचतगट म्हणून जिल्ह्यात ओळखला जात आहे.
गावातील एक धडाडीचे कार्यकर्ते रामचंद्र चौगुले यांनी पुढाकार घेवून महिलांच्या बैठका घेवून, त्यांना प्रोत्साहन देवून ७ डिसेंबर २००६ रोजी या बचतगटाची स्थापना केली. सुरवातीला महिलांचा प्रतिसाद अत्यंत कमी होता. परंतु त्यांचे मन वळविण्यात त्यांना यश आले. मालुबाई डवर या एका उत्साही गावच्या महिलेस त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावयास लावून बचतगटाच्या कामकाजासंबंधी माहिती दिली. या गृहिणीने मग आपल्या गावातील भगिनींचे मन वळविण्याचे काम केले. यातूनच छाया मोहिते, अनुराधा कांबळे, छाया चौगुले, सुजाता डवर, सुलोचना डवर, अनुसया चौगुले, आनंदी जाधव अशा काही महिला एकत्र आल्या. सुरवातीस प्रथम मासिक ३० रुपये वर्गणी भरुन बचत गटाच्या कार्याचा शुभारंभ त्यांनी केला. अवघ्या पाच महिन्यातच गटाच्या अंतर्गत कर्ज देत छोटे मोठे व्यवसाय करत नियमीतपणे कर्जफेड करुन गटास त्यांनी उर्जितावस्था आणली.
गटाची ही चांगली कामगिरी पाहून राधानगरी पंचायत समितीनेही मग ग्रामीण विकास यंत्रणेकडून बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून ५० हजार रुपयांचे कर्ज गटास दिले. हे ही कर्ज या गटाने अवघ्या सहा महिन्यात फेडून बँकेचा आणि ग्रामीण विकास यंत्रणेचा विश्वास संपादन केला. बँकेने गटाच्या अध्यक्षा मालुबाई डवर यांना बोलवून अधिक कर्ज देण्याची आपली तयारी दर्शवली. डवर बाईंनी आपल्या गटातील महिलांशी सल्लामसलत केली. गटविकास अधिकारी जी. एम. जाधव, ग्रामसेवक निलकंठ चव्हाण आणि सरपंच श्रीमती भारती रानमाळे यांचे मार्गदर्शन घेवून दुग्धव्यवसाय करण्याचा मानस व्यक्त केला. म्हैसपालन व्यवसायही या जिल्ह्यात चांगलाच चालतो. त्यामुळे गटाने हा उपक्रम करण्याचे निश्चित केले. गटातील सर्व महिलांना विश्वासात घेवून प्रत्येकी एक म्हैस घेण्यासाठी अडीच लाख रुपयांचे कर्ज दिले. दहाही सदस्यांनी प्रत्येकी एक म्हैस घेवून हा व्यवसाय सुरु केला. हा गट गावातील डेअरीस दररोज सरासरी १५० ते २०० लिटर दुध देत असतो. हे अडीच लाखाचे कर्ज या गटाने मुदतीआधीच फेडले. त्यामुळे या गटाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सामाजिक कार्यातही हा गट मागे नाही. केवळ आपली प्रगती साधून हा गट गप्प बसला नाही तर सामाजिक बांधिलकी ओळखून गरीब, गरजू, बेरोजेगार महिलांच्या उन्नतीसाठीही हा गट कार्य करत आहे. शिवण क्लासचे वर्ग हा गट चालवित आहे. निर्मलग्राम, तंटामुक्त ग्राम योजना, दारुबंदी, गुटखा, मटकाबंदी आदी कार्यातही हा गट सहभागी होवून कार्य करीत आहे. विविध शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना देवून त्यांना या योजनांमध्ये सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न हा गट करत आहे. या गटाच्या महिलांना वेळोवेळी दिलेल्या प्रशिक्षणामुळे हा गट म्हणजे महिला बळकटीकरणाचे एक सक्षम उदाहरण ठरले आहे.
'महान्यूज'मधील मजकूर.
No comments:
Post a Comment