विविध माध्यमातून आज शेतकऱ्यांना आधुनिक पीक पध्दतीची, लागवडीची माहिती मिळत आहे. शेतीमध्ये वेगळा प्रयोग करण्याची इच्छा असलेल्या श्री. आंगणे यांनी झेंडूची लागवड करण्यासाठी वेरळ येथील प्रगतशील शेतकरी सुरेश मापारी यांच्याशी संपर्क साधत या फुलाच्या लागवडीची शास्त्रोक्त माहिती घेतली. लागवडीसाठी त्यांनी' कलकत्ता रेड ' या जातीची झेंडूच्या रोपांची निवड केली.
प्रायोगिक तत्वावर लागवड करण्याच्या उद्देशाने त्यांनी जुलै महिन्यामध्ये 175 रोपांची लागवड केली. वेळच्या वेळी सेंद्रीय खत,युरिया यांची योग्य मात्रा दिल्याने व आंगणेवाडीची कोरडवाहू जमीन यामुळे रोपांची वाढ जोमदार झाली व गणेश चतुर्थीपासून फुले मिळण्यास प्रारंभ झाला.या फुलांची विक्री स्थानिक बाजारपेठ तसेच मालवण येथे त्यांनी केली.एका रोपापासून साधारण दोन ते अडीच किलो फुले त्यांना मिळाली.उशिरापर्यत लांबलेल्या पावसाने या रोपांपासून अजूनही मोठ्या प्रमाणात फुले मिळत आहेत.
आंगणेवाडी परिसरामध्ये भुईमूग,नाचणी व भातशेती हीच पिके प्रामुख्याने घेतली जातात.एक वेगळा प्रयोग म्हणून श्रीनिवास आंगणे यांनी झेंडूची लागवड केली. बऱ्यापैकी यशस्वी सुध्दा झाले. त्यांचे अनुकरण करुन पुढील वर्षी झेंडूची शेती करण्याचा इतर शेतकऱ्यांनी निर्णय घेतला आहे. श्री देव भराडीमातेच्या अधिवासाने पुनीत झालेल्या आंगणेवाडीच्या भूमीमध्ये पुढील वर्षी झेंडूचे अमाप पीक मिळाल्यास आश्चर्य वाटू नये एवढे मात्र निश्चित.
दिवाळी, दसरा सणांना झेंडूची मागणी पाहता या पिकांला चांगली बाजारपेठ आहे हे गमक कळल्यामुळेच आज शेतकरी फुलशेतीकडे वळू लागला आहे.बाजारात 80 ते 60 रूपये किलोपर्यंत झेंडूला मागणी असल्यामुळे या कालावधीत शेतकरी उत्पादनाच्या तुलनेत चांगला नफा कमवू शकतो.
शेतीमध्ये असे नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यास येथील शेतकरी आज प्राधान्याने विचार करत आहे हेच प्रगत शेतीचे एक लक्षण मानण्यास हरकत नाही असे आपण म्हटले तर वावगे ठरणार नाही. आज शेतकरी आपल्या पारंपारिक पिकांबरोबर सातत्याने असे काही नविन फुलशेती किंवा पिके घेतली तर शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तरात नक्कीच फरक पडण्यास मदत होणार आहे.शेतीच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये सातत्याने कोकणातील शेतकरी बदल करत आहे त्याचा फायदा त्यांना नक्कीच होत आहे.