सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड तालुक्यातील पुरळ गावामध्ये आपल्या घरासमोरच असलेल्या अर्धा एकरच्या जागेमध्ये १५ गुंठ्यात त्यांनी ऊसाचे पीक घेतले आहे. जानेवारी महिन्यामध्ये उगवण झालेली ऊसाची दोन हजार रोपटी त्यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये लावली. ज्या भागात त्यांनी ऊसाची लागवड केली, तो मळ्याचा भाग आहे. पाऊस गेल्यावरही उशिरापर्यंत या जागेत ओलावा असतो. फेब्रुवारीमध्ये फाटक यांनी ऊसाची लागवड केल्यावर पाऊस पडेपर्यत त्यांनी रोपांना पाणी दिलं. पाणी टिकत असल्याने ८ ते १२ दिवसांतून एकदा त्यांना पाणी द्यावी लागायचं.
ऊसाला खोलवर नांगरणी करावी लागते. यासाठी त्यांनी नांगरणी करण्यासाठी खास ट्रॅक्टर मागविला. मोठी ढेपं फोडण्यासाठी रोटरची व्यवस्था नव्हती. त्यामुळे येथील शेती व्यवस्थापनात उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करुन त्यावर मात केली. दोन फुटाच्या अंतरावर १५ गुंठ्याच्या जागेत लावलेली ही २ हजार ऊसाची रोपं आता चांगलीच फोफावली आहेत. कोल्हापूर येथील ऊस शेती व्यवसायातील तज्ज्ञ डॉ. मराठे यांनी जेव्हा या शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा नकळत शाबासकीची थाप त्यांनी फाटक यांच्या पाठीवर मारली.
प्रथमच आपल्या शेतात ऊसाचे पीक घेताना फाटक यांनी शेतीसंदर्भातील बरीच माहिती करुन घेतली होती. अविवा लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या कामासंदर्भात महिन्यातील १५ दिवस ते कोल्हापूरला असतात. या आकर्षणाला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहताना त्यांनी सुंदर व्यवस्थापन केलं. शेतामध्ये पाईप लाईन टाकून पाण्याचा निचरा केला. शेणखत,युरिया सल्फेट आणि पोटॅश यांचे मिश्रण करुन प्रत्येक बुंध्यापाशी एक-एक चमच्याचा डोस दिला.९२व ५ या जातीचा हा ऊस आता डिसेंबर अखेरपर्यंत परिपक्व होईल. ऊसाला थंडीची आवश्यकता असते. थंडीमुळे त्यात साखर भरली जाते. मात्र, सद्य:स्थिती पाहता गुंठ्यामागे एक टन या हिशोबाने १५ टन ऊसाचे उत्पन्न मिळेल, असा विश्वास फाटक यांना वाटतोय. अर्थात भातशेती पेक्षा हे उत्पन्न आर्थिकदृष्ट्या मोठे असणार आहे. प्रथमच ऊसाचे पीक घेत असल्याने ट्रॅक्टरचा खर्च, रापांचे पैसे तसेच अन्य व्यवस्थापन धरुन १५ हजारांच्या आसपास हा खर्च गेला. हा वजा करता १५ ते २० हजारापर्यत त्यांना ऊसाच्या शेतीमध्ये निव्वळ नफा मिळणार आहे.
दरम्यान, ऊसाचं रोप एकदा लावल्यावर पुढील दोन वर्षे त्याचे उत्पन्न आपोआपच मिळणार आहे. त्यामुळे पुढच्या दोन वर्षामध्ये रोपांचा खर्च आणि ट्रॅक्टरची गरज नसल्याने ट्रॅक्टरचे भाडे वजा करता दहा हजारापर्यत त्यांचा खर्च कमी होणार आहे. अर्थात पुढील दोन वर्षात यंदासारखे पीक आले तर, प्रत्येक वर्षी त्यांना २५ ते ३० हजारापर्यत फायदाच होणार आहे. सुरुवातीच्या फायद्यामध्ये पुढील दोन वर्षात ७० ते ७५ टक्के वाढ होत असली तरी वैयक्तिकरित्या या पिकाच्या व्यवस्थापनासाठी लक्ष दिल्यामुळेच हे यश असणार एवढं नक्की !
ऊसाचे रोप लावल्यावर दीड महिना गेल्यानंतर त्याची पाळे स्थिरावली. मग तिथलीच माती मुळामध्ये टाकून त्यांनी ' बाळभरणी ' केली. मोठी भरणी करताना खत टाकून दुसरी माती ओढून प्रत्येक मुळापाशी मोठा ढीग केला. दरम्यान, पीक घेताना आजूबाजूला झाडे असू नयेत याची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण ऊसाला सावली चालत नाही. मुळामध्ये सावली पडली की, मुळाला फाटे फुटत नाहीत असं त्यांनी सांगितलं.
आज फाटक यांनी पुरळमध्ये केलेल्या ऊसाच्या शेतीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे ही शेती बघून तालुक्यातील काही शेतकरीही या शेतीसाठी पुढाकार घेत असल्याचे चांगले संकेत आहेत.
याबाबत बोलताना सुनील फाटक म्हणाले की, जो शेतकरी पाणी देऊ शकतो त्याचे नक्कीच कोकणात ऊसाचं पीक घ्यावं. एकदा रोप लावल्यावर पुढील दोन वर्षे किरकोळ खर्च होऊन मोठा फायदा मिळतोच. शिवाय या शेतीमध्ये सुर्यफूल,तीळ,मिरची आदी तीन महिन्यांपर्यतची पिकंही घेता येतात. त्यामुळे ऊस फक्त घाटावरच होतो ही कल्पना मनातून काढून टाकून चांगले व्यवस्थापन करुन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावी आणि शेतीमध्ये आर्थिक सुबत्ता आणावी,असं वाटतं.