गावाकडच्या मातीतील मुलं मुळातच कष्टाळू, धडपडी असतात अन् याचं एक उत्तम उदाहरण ज्ञानेश्वर पांडुरंग काळगुडे हे आहेत. श्री काळगुडे मूळचे मालेगाव तालुक्यातील झोडग्याचे रहिवासी. लष्करी सेवेत काम करत असताना हा जवान देशाच्या संरक्षण सेवेतील आपल्या विशेष नैपुण्याच्या बळावर शांतिदूत बनला. दक्षिण अफ्रिकेतील सुदान प्रदेशात भारत सरकारच्या वतीने त्याची नियुक्ती होणार आहे.सैन्य दलात मराठा बटालियनमधून भरती झालेला ज्ञानेश्वर सध्या पंजाबमधील पठाणकोट येथे नायक पदावर कार्यरत आहे. गेल्याच महिन्यात परराष्ट्रात शांतिदूत म्हणून नेमणूक करण्यासाठी पठाणकोट येथील मराठा बटालियनमधील तीन सैनिकांची निवड झाली.त्यात ज्ञानेश्वरचा समावेश करण्यात आला.यासाठी ज्ञानेश्वरचे विशेष प्रशिक्षण सुरु आहे.कला.मानवता,अहिंसा ही मूल्ये अंगी बाळगून कल्याणासाठी त्यांचा वापर करणे शक्य असलेल्या सैनिकालाच शांतिदूत म्हणून नेमले जाते. ज्ञानेश्वरने या सर्व कसोटया पार केल्या.ज्ञानेश्वर काळगुडे शांतिदूत म्हणून २६ नोव्हेंबरला २०११ ला दक्षिण अफ्रिकेतील सुदान प्रदेशाकडे सहा महिन्यांसाठी रवाना झाला.
ज्ञानेश्वरला विचारले,शांतीसैनिक कशासाठी? जगभरातून संयुक्त राष्ट्र संघटना ही विशेष मोहीम राबवित असते.भारतातील लोकशाही ही इतर देशातील नागरिकांना आदर्शवत ठरणारी आहे. एकविसाव्या शतकात झेपावणारा मानव गुलामगिरीत राहू नये,त्याने आपले स्वतंत्र जीवन अनुभवावे,त्यासाठी लागणारी मूल्ये त्याला जपता यावी त्यासाठी ही संघटना इतर देशातून शांतीसैनिक पाठवित असते. निवडीची पध्दत कशी असते? ही निवड प्रक्रिया सैन्सदलातील सहा कंपन्यांमधून केली जाते. या प्रक्रियेत चारशे सैनिक भाग घेतात.विविध चाचण्यानंतर १४४ जणांची निवड होते. यांनतर सामान्यज्ञान,लोकशाही,मूल्यांची अवगतता याबाबत परीक्षा होते. त्यातून सहा जणांची निवड होते.या सहा जणांमधून पुन्हा शारीरिक,मानसिक,बौध्दीक कसोटयांवर तिघांची निवड होत असते. असा या पदाचा प्रवास त्यांनी संवाद साधताना सांगितला.
ज्ञानेश्वर यांचे वडील पांडुरंग काळगुडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, देशाची सेवा करताना मुलाने विशेष कौशल्य दाखवित शांतीसैनिक म्हणून मान मिळविला आहे.दक्षिण अफ्रिकेत जावूनही तो यशस्वी होईल.तर आई सुभद्रा काळगुडे म्हणाल्या की,आपला मुलगा एखादया राष्ट्रात शांतीसैनिक म्हणून जात आहे. सातासमुद्रापार मुलगा जाणार असल्याने त्याच्या आठवणीने ऊर भरुन येतो. गावचे सरपंच भैय्यासाहेब देसले म्हणतात की, ज्ञानेश्वर काळगुडेच्या गरुडझेपेने गावाच्या लौकिकात भर टाकली आहे.
ज्ञानेश्वरने गावात राहून माणसाचा विकास होऊ शकत नाही या विचारांना फाटा देत या गावाच्या मातीतूनचं आपलं कर्तुत्व साऱ्या समाजापुढे आदर्शवत ठेवलं आहे.