उमरखेड तालुक्यात इसापूर धरणाचा डावा कालवा दहागाव जवळून वाहतो. याच कालव्याच्या काठावर जाधव यांची ५ एकर ३० गुंठे शेत जमीन आहे. त्यांच्या या शेतीची ओळख सेंद्रीय शेती म्हणून सर्वदूर पसरली आहे. वडिलोपार्जित शेतीत रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीचा पोत ढासळला. त्यामुळे शेतीपद्धतीतील बदलाकडे त्यांचे मन वळले. त्यांनी १९९७ मध्ये हैद्राबाद येथे झालेल्या कार्यशाळेत सेंद्रीय शेती तंत्रज्ञान प्रशिक्षण घेतले. तेथे असलेल्या मॉलमध्ये उपलब्ध असलेली सेंद्रीय शेतमालाची उत्पादने बघितली आणि त्यावर ग्राहकांच्या पडणाऱ्या उड्या पाहून त्यांनी सेंद्रीय शेतीचा ध्यास घेऊन प्रत्यक्षात ते स्वप्न साकार केले.
त्यांनी शेतात गांडूळखत प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पातून ७० दिवसाला ६० टनांपर्यंत खत तयार होते. त्यातील खरीप व रब्बी पिकासाठी ते स्वत: ८ ते ९ टन खताचा वापर करतात. उर्वरित खताची विक्री ४०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे इतर शेतक-यांना करतात. यापासून त्यांना दरवर्षी ६० ते ७० हजारांचे उत्पन्न मिळते. गांडूळ खतासाठी काडी, कचरा, कुटार, गवताचे ढीग आदी कच्चा माल ते विकत घेतात. गांडूळ खतासाठी युजेनिया, युड्रीलिस्ट या जातीचे गांडूळ वापरतात. इतर शेतक-यांसाठी ते गांडूळखताचे कल्चरही तयार करतात. त्यांच्या या खत प्रकल्पात तयार झालेले गांडूळखत ५० किलो वजनाच्या पिशवीतून विक्री करण्यात येते. या प्रकल्पातून त्यांना ५० टक्के नफा मिळतो. गांडूळखत प्रकल्पात तयार होणारे खत वापरुन बाबाराव जाधव यांनी आपल्या शेतीला सेंद्रीय शेतीचा दर्जा प्राप्त करुन दिला आहे.
रासायनिक शेतीने बिघडलेला जमिनीचा पोत गांडूळखताने सुधारण्यात त्यांना यश मिळाले. जाधव यांनी आपल्या शेतीत मिश्र पीक पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर अंगिकार केला आहे. यापूर्वी त्यांनी ५० आर जमिनीत ९३ टन सेंद्रीय उसाचे उत्पादन घेतले. सेंद्रीय शेतीत सुरुवातीला शेतमालाच्या उता-याचे प्रमाण कमी होते. मात्र सेंद्रीय व गांडूळ खताचा वापर वाढताच जमिनीचा पोत सुधारला व उत्पादनाचे प्रमाणही वाढले. २००४ च्या रब्बी हंगामापासून त्यांनी सेंद्रीय गहू उत्पादनाला सुरुवात केली. गांडूळखताचा वापर करुन ८० आर क्षेत्रात वेस्टर्न ११ जातीचा ४३ क्विंटल गहू उत्पादित केला. या गव्हाला चांगला भाव मिळाला.
सेंद्रीय गव्हाची गुणवत्ता व चव चांगली असल्याने आता या गव्हाला मागणी वाढली आहे. सुरुवातीला सेंद्रीय शेतमाल म्हणजे काय हा प्रश्न विचारला जात असे. आज मात्र सेंद्रीय मालाच्या गुणवत्तेमुळे ग्राहकांमध्ये मोठी जागृती पाहावयास मिळते. गेल्यावर्षी जाधव यांनी १.२५ एकर क्षेत्रात वेस्टर्न ११ जातीचा २९ क्विंटल गहू पिकविला. यापैकी २२ क्विंटल गव्हाची २४ हजार रुपये क्विंटल भावाने विक्री केली. या गव्हासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांपासून तर कर्मचा-यांपर्यंत ग्राहकांनी मागणी नोंदविली होती. यंदा त्यांनी तीन एकर क्षेत्रात सेंद्रीय गव्हाची लागवड केली असून त्याचे पीक जोमदार वाढले आहे. या गव्हाची सुद्धा मागणी आधीच नोंदविण्यात आली आहे. ते स्वत: गव्हाचे ५० किलो वजनाचे पॅकिंग करुन ग्राहकांना सेंद्रीय गहू उपलब्ध करुन देतात.
रासायनिक शेतीच्या तुलनेत सेंद्रीय शेतीत गहू पिकाच्या उत्पादनात दुप्पट वाढ झाल्याचा बाबाराव जाधव यांचा अनुभव आहे. गेल्यावर्षी त्यांनी ८ गुंठ्यात ४ क्विंटल सेंद्रीय गावराणी तूर पिकविली. त्यापासून तयार केलेली तूरडाळ बाजारात विक्री केली. डाळ चवदार असल्याने व लवकर शिजत असल्याने ग्राहक त्यांच्या या सेंद्रीय तुरीला पसंती देतात. तुरीसोबतच उडीद, मूग सेंद्रीय पद्धतीने घेत असल्याने त्यांच्या या शेतमालाला मोठी मागणी होत आहे. यंदाही त्यांनी १५ गुंठ्यात गावराणी तुरीची लागवड केली आहे. या सेंद्रीय तुरीसाठी ग्राहकांनी मागणी नोंदविली आहे.
बाबाराव जाधव यांना सेंद्रीय भाजीपाला पिकाचा लळा लागलेला आहे. दरवर्षी हरभरा पीक घेतल्यानंतर ते ढेमसा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. गेल्यावर्षी त्यांनी ५ गुंठ्यात फुलकोबी पिकविली. तसेच १७ गुंठ्यात चवदार गाजराचे १४० क्विंटल उत्पादन घेतले. त्यापासून २ लाख १० हजार रुपयाचे उत्पादन मिळाले. तसेच १० गुंठ्यात वांग्याचे भरघोस उत्पादन झाले. सोयाबिन पिकानंतर सेंद्रीय भाजीपाल्याच्या उत्पादनात जाधव यांनी मोठी आघाडी घेतली आहे. सेंद्रीय गाजर, लसण, कोबी, वांगे, टमाटर अशा भाजेपाल्यांची चव अतिशय चांगली असल्याने ग्राहकांची त्यांच्या शेतमालाला पहिली पसंती मिळते. सेंद्रीय शेतीला जाधव यांनी पूरक दूध व्यवसायाची जोड दिली आहे. यासाठी त्यांना पत्नी सलोकता, मुलगा उत्तम, विवेकानंद व कन्या अनुपमा यांची मदत होते. सेंद्रीय शेतीला संपूर्ण कुटुंबाचाच हातभार लागतो. त्यांनी आपल्या शेतीत केळी, ऊस, संत्रा, मोसंबी अशा सर्वच पिकांचे भरघोस उत्पादन घेतले आहे.
बाबाराव जाधव यांना सेंद्रीय शेतीसाठी जमशेदजी टाटा नॅशनल व्हर्च्युअल ॲकेडमीच्यावतीने एम.एस.स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन चेन्नईची फेलोशिप प्राप्त झाली आहे. त्यांनी शेतीशाळेचे अनेक कार्यक्रम राबवून एक हजारावर शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले आहे. विशेषत: बचत गटाच्या प्रशिक्षणावर त्यांनी भर दिला आहे.