राजापूर येथील एस.टी.वाहनचालक नामदेव सानप यांचा दत्ता हा मुलगा. इंग्रजी विषयात पदवी घेतल्यानंतर तो शेतीमध्ये रमत आहे. दत्ताने अनेक नवीन प्रयोगही शेतीत राबविले. येवला तालुका हा तसा अवर्षणग्रस्त भाग. सानप यांनी अशा परिस्थितीत टोमॅटो लावण्याचे निश्चित करुन १३८९ या वाणाचे रोपे घेतली. सहा हजार पाचशे रोपे घेऊन त्यांनी एक एकर क्षेत्रात साडेतीन बाय दीड फूट अंतरावर रोपांची लागवड केली. लागवडीच्या वेळेस युरिया व सुपर फॉस्फेट या खतांची मात्रा दिली. पुन्हा २१ दिवसांनी २४:२४:० हे खत तर ४० दिवसांनी युरिया, सुपर फॉस्फेट व एमओपी ही खते सरी फोडून दिले. रांगाच्या प्रकारानुसार सुमारे सात वेळेस बुरशीनाशक व कीटक नाशकासह पोषकांच्या संतुलित फवारण्या करुन विशेष दक्षता घेतली.
लागवडीनंतर पाचव्या सहाव्या दिवशी पाणी दिले. या वर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे पाणी टंचाई जाणवू लागली. तेव्हा सानप यांनी ठिबक संच खरेदी करुन ठिबक सिंचनाद्वारे दररोज एक तास पाणी तसेच सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करुन टोमॅटो पिकांची २५ टक्यांपर्यत गुणवत्ता वाढविली. झाडांची वाढ होऊ लागल्यावर चार वेळेस सुतळीने बांधणी केली.
ज्यावेळी बाजारभाव १५ ते ४० रुपये कॅरेटप्रमाणे झाले त्यावेळी इतर शेतकऱ्यांनी टोमॅटोकडे दुर्लक्ष केले. परिणामी त्यांची बाग खराब झाली. काही शेतकऱ्यांनी तर बागा काढून दुसरे पीक घेतले. मात्र सानप यांनी पाणी, खत व फवारणीच्या व्यवस्थापनात सुसूत्रता व सातत्य ठेवून प्रतिकूलतेतही बाग टिकवून ठेवली. झाडांची निगा राखल्याने एक एकरात सुमारे १ हजार पाचशे कॅरेट टोमॅटोचे उत्पन्न निघाले.
सदर टोमॅटोची पिंपळगांव, सटाणा, येथील बाजारात तीन प्रकारात प्रतिवारी करुन विक्री केली. संपूर्ण हंगामात सानप यांना प्रत्येक वेळी वाढीव भाव मिळाला. त्यांना सरासरी २२५ रुपये कॅरेट प्रमाणे भाव मिळाला. त्यामुळे विक्रमी उत्पन्न मिळाले. या कामी कुटुंबातील सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
हे टोमॅटोचे उत्पादन घेताना येवल्याचे तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर यांचे वेळोवेळी मोलाचे सहकार्य लाभले. टोमॅटोच्या पिकातून मिळणारे उत्पन्न हे बाजारभावावर अवलंबून असते मात्र पिकांची निगा राखून अधिक उत्पादन घेता येते. ही किमया दत्ता सानप यांनी करुन दाखविली. त्यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.