अखेर शेतकरी जिंकले...
ऊस दरावर तडजोड_
कोल्हापूर विभागासाठी 2,050 रुपये दर, पुणे विभागासाठी 1,850 रुपये
तर उर्वरित महाराष्ट्र विभागासाठी 1,800 रुपये प्रस्ताव.
ऊसदर आंदोलनाचा यशस्वी समारोप :
राज्यात सुरु असलेल्या उसदराच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे. पुण्याच्या कौन्सिल हॉलमध्ये शेतकरी संघटनांचे नेते आणि सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बैठकीत दरावर एकमत झालं आहे.
तब्बल साडेतीन तासांच्या बैठकीनंतर अखेर दोन्ही बाजूंनी लवचिकता दाखवल्याने सहमती होऊ शकली. सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये झालेल्या चर्चेत ऊसाच्या दरावर तडजोड केल्यानंतर अखेर निर्णय घेण्यात आला. सरकारने राज्यात ऊसासाठी तीन वेगवेगळे दर जाहीर केले आहेत.
सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ऊसासाठी राज्यभरात पहिला हफ्ता जाहीर केला. यामध्ये कोल्हापूर- सातारा- सांगली जिल्ह्यांसाठी पहिला हफ्ता २०५० रुपये प्रतिटन, पुणे-अहमदनगर- सोलापूर जिल्ह्यांसाठी १८५० रुपये प्रतिटन, खानदेश-विदर्भ-मराठवाडा जिल्ह्यांसाठी १८०० रुपये प्रतिटन इतका जाहीर करण्यात आला आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. राजू शेट्टी गेल्या पाच दिवसांपासून उपोषणावर आहेत.
दरम्यान लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण मागे घेण्यास राजू शेट्टी यांनी नकार दिला आहे. साखर आयुक्त किंवा सहकार आयुक्तांकडून लेखी आश्वासन आल्याशिवाय आपण उपोषण मागे घेणार नसल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं.
सहकारमंत्र्यांनी राजू शेट्टी यांच्या प्रतिनिधींकडे पत्र सोपवलं असून ते काही वेळातच शेट्टी यांच्याकडे पोहोचेल. त्यामुळे खासदार शेट्टींनी उपोषणाचा समारोप करणं ही फक्त औपचारिकता आहे.