रत्नागिरी शहराजवळच्या भाट्ये गावातील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्राचा प्रथम पुरस्कार मिळाला. कोकणातील शेतकऱ्यांसाठी सातत्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून नारळाच्या नवनवीन जाती विकसित करण्याच्या केंद्राच्या कार्याला ही राष्ट्रीय स्तरावर मिळालेली मान्यता आहे.
भारतात पामवर्गीय महत्त्वाची चार पिके असून त्यात नारळ, तेलताड, पालमेरा (तोडगोळे) आणि सुल्पी (सुरमाड) आदींचा समावेश आहे. या पिकांवर देशातील २२ केंद्रात संशोधन सुरू आहे. यापैकी सर्वाधिक १३ केंद्रांवर नारळावर संशोधन सुरू आहे. या सर्व केंद्रांची द्वैवार्षिक सभा भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येते. त्यामध्ये दोन वर्षात झालेल्या संशोधनावर आधारित शिफारस करण्यात येऊन पुढील संशोधनाची दिशा ठरविण्यात येते. या वर्षात कासारकोड (केरळ) येथील 'केंद्रीय रोपण पिके संशोधन केंद्र' येथे घेण्यात आली. सभेत उत्कृष्ट काम करणाऱ्या संशोधन केंद्राची निवड करून त्यांना 'कै.अमित सिंग मेमोरीअल फाऊंडेशन पुरस्कार' देण्याचे निश्चित करण्यात आले. या पुरस्काराचा मान प्रथमच रत्नागिरी येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठांतर्गत स्थापण्यात आलेल्या प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राला मिळाला.
या प्रादेशिक संशोधन केंद्राची स्थापना १ जुलै १९५५ रोजी झाली. डॉ.व्ही.पी. लिमये यांच्यासारखे संस्थापक आणि त्यानंतरच्या अनेक संशोधकांनी हे केंद्र विकसित करण्यात परिश्रम घेतले. केंद्रीय नारळ विकास मंडळाचे सदस्य राजाभाऊ लिमये यांचेही मार्गदर्शन केंद्राच्या विकासात महत्वाचे आहे. कृषि विद्यापीठाचे कुलगुरू, केंद्राचे संशोधन संचालक आणि केंद्रप्रमुख यांच्या दूरदृष्टी आणि प्रयत्नातून गेल्या ५५ वर्षात केंद्राने लक्षवेधक प्रगती केली आणि त्याचा लाभ स्वाभाविकपणे कोकणातील शेतकऱ्यांना झाला.
भाट्ये गावाच्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर असलेल्या या केंद्राच्या परिसरात सर्वसाधारणपणे वार्षिक ३००० सेंटीमीटर पाऊस पडतो. वालुकामय पोयटा जमीन आणि आवश्यक असणारे तापमान असे अनुकूल वातावरण परिसरात उपलब्ध असल्याने संशोधनाला चांगली चालना मिळते. इथल्या २५.८४ हेक्टर जमिनीवर संशोधन केंद्र उभारले असून २२ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. केंद्राची स्थापना भारतीय मध्यवर्ती नारळ समितीतर्फे करण्यात आली होती. १९६९ मध्ये ते राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाकडे आणि कोकण कृषि विद्यापीठाच्या स्थापनेनंतर १९७२ मध्ये या विद्यापीठाकडे वर्ग करण्यात आले. केंद्राची ७५ टक्के आर्थिक जबाबदारी अखिल भारतीय तेलताड प्रकल्प आणि २५ टक्के महाराष्ट्र शासन उचलते.
संशोधन केंद्रात अधिक उत्पन्न देणाऱ्या आणि संकरित वाणांचा संग्रह करून त्यांचा अभ्यास केला जातो. नारळ लागवडीची आदर्श पद्धती आणि त्यातील मिश्रपिकांबाबत अध्ययनावर केंद्रात भर दिला जातो. किड रोगावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी संशोधनाच्या माध्यमातून उपाय सुचविण्यात येतात. राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पांतर्गत दुसऱ्या टप्प्यात मसाला पिकांची लागवड करून त्यांचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. मसाला पिकांची कलमे तयार करून ती शेतकऱ्यांना केंद्राद्वारे उपलब्ध करून देण्यात येतात.केंद्रामार्फत नारळ आणि मसाल्याच्या कलमांची अत्यल्प दरात विक्री करण्यात येते. त्यामुळे केंद्राला महसूल मिळतो.
केंद्रात एकत्रित केलेल्या २७ जाती आणि १३ संकरीत जाती यामधून लक्षद्वीप ऑर्डीनरी, टी x डी-केरासंकरा, प्रताप, फिलीपीन्स ऑर्डीनरी, चंद्रसंकरा, कोकण भाट्ये कोकनट हायब्रीड, केराबस्तर आणि गौतमी गंगा या जाती राज्यात लागवडीसाठी विकसित करण्यात आल्या आहेत. नारळ पिकाच्या मशागतीबाबत अनेक प्रयोग करण्यात येऊन पाणी व्यवस्थापन, पिक संरक्षण, आंतरपिके आदींबाबत मांडण्यात आलेले महत्त्वाचे निष्कर्ष शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त ठरत आहेत.
नारळासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याची शिफारस, उंच नारळासाठी सेंद्रीय खताची शिफारस, कीड नियंत्रणाच्या आधुनिक पद्धती, सूक्ष्म सिंचन पद्धती आदी उपयुक्त संशोधनामुळे कोकणातील नारळशेतीला मोठा आधार मिळाला आहे. दरवर्षी केंद्रातून २० हजार नारळाची रोपे आणि एक लाख बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. केंद्राला वर्षातून २० ते ३० हजार शेतकरी भेट देतात. अनेक शेतीसहलींच्या भेटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येते. पावसाळ्यात भेट देणाऱ्या शेतकऱ्यांची रिघ लागत असल्याची माहिती केंद्रप्रमुख डॉ.दिलीप नागवेकर यांनी दिली.
केंद्रात दररोज सकाळी आठ वाजता कर्मचाऱ्यांची हजेरी घेतल्यानंतर ' खरा तो एकची धर्म ' ही प्रार्थना घेतली जाते. प्राणीमात्रावर प्रेम करताना निसर्गाला समृद्ध करणाऱ्या वनस्पतींवर प्रेम करण्याची प्रेरणा कदाचित या प्रार्थनेतून सर्वांना मिळत असावी. केंद्राने संशोधनाबरोबरच सामाजिकतेचा पैलू सोबत ठेवीत काही उपक्रमही राबविले. केंद्रात तयार होणाऱ्या गवती चहाच्या रोपांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात आवड निर्माण व्हावी यासाठी शाळांमधून ५० पैशाला रोप वाटण्याचा उपक्रमही राबविण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. लागवडीचे क्षेत्र विस्तारलेले असूनही त्यातील स्वच्छता आणि नेटकेपणा तेवढाच आनंद देणारा आहे. बागेत फिरताना पिवळे, नारंगी, हिरव्या रंगाचे नारळ ठिकठिकाणी दिसतात. नारळाच्या मधोमध जायफळ, दालचिनी, अननस, केळी आदी रोपे डौलाने उभी असलेली दिसतात.
केंद्रात एक एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेली 'लाखी' बाग हे केंद्रातील प्रमुख आकर्षण आहे. केंद्रात आतापर्यंत झालेल्या पिक संशोधनावर आधाfरित ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे. नारळ, मसालापिके आणि फळपिके यांची एकत्रित लागवड केल्यास प्रति हेक्टरी एक लाख रुपये उत्पन्न मिळेल, अशी वेगवेगळ्या प्रकारची मॉडेल विकसित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे मसाला आंतरपिकांची लागवड केल्यानंतर नारळाच्या उत्पादनात गेल्या २७ वर्षात सातत्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. नारळ आणि जायफळ गटातून सर्वाधिक लाभ होत असल्याचे निष्कर्षही संशोधनाअंती मांडण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकारात नारळाच्या मध्यभागी एक जायफळ, दोन नारळांच्या मध्ये एक दालचिनी आणि प्रत्येक नारळावर दोन काळीमिरीची रोपे लागवड केली असता एकरी ७० नारळ, ५४ जायफळ, १२३ दालचिनी आणि १४० काळीमिरी रोपे बसतात व त्यापासून १० वर्षानंतर सरासरी एक लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. दुसऱ्या प्रकारात चार नारळाच्या मध्यभागी जायफळ व त्याचे सभोवती अननस, दोन नारळांच्या मध्ये साडेसहा फुटावर केळी आणि दोन केळींच्या मध्ये ४ फुटावर २ दालचिनी, प्रत्येक नारळाच्या कोमऱ्यावर १ सुरण आणि प्रत्येक नारळावर दोन काळीमिरी लागवड केली असता एका एकरात ७० नारळ, ५४ जायफळ, २८० केळी, २४६ दालचिनी, १४० काळीमिरी, २१६ सुरण, आणि १३५० अननस एवढी लागवड करता येते. अशाच पद्धतीने इतरही पद्धतीचे संशोधन या लाखी बागेत सातत्याने करण्यात येत आहे. विशेषत: एका ठिकाणी लावलेल्या रोपाची जागा दुसऱ्या वर्षी रिक्त ठेवण्यात येते आणि आदल्या वर्षी रिक्त असलेल्या जागेवर लागवड करण्यात येते. त्यामुळे जमिनीचा कस चांगल्या प्रकारे राहतो.
कोकणात सरासरी दहा गुंठे नारळाचे क्षेत्र धारण करणाऱ्या बागायतदारांची संख्या जास्त आहे. या बागायतदारांचा विचार करून दहा गुंठे क्षेत्रावर उत्पन्न कसे वाढविता येईल याचा प्रात्यक्षिक प्लॉट केंद्रपरिसरात १९९८ पासून सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये पपई अननस, वांगी, मिरची, शेवगा, वेलवर्गीय भाजीपाला, मसाला पिके यांची लागवड करण्यात येत आहे. दरवर्षी या प्लॉटपासून १५ ते २० हजार उत्पन्न मिळते आहे.
नारळासोबत बागायतदारांनी मिश्र पिकांची लागवड केल्यास त्यांना कसा लाभ होऊ शकतो याचे प्रात्यक्षिक या केंद्रात दाखविले जाते. त्याअंतर्गत मिरचीच्या ज्वाला आणि कोकणी किर्ती जातींची लागवड, घेवडा, टोमॅटो, ढोबळी मिरची, नवलकोल, वांगी, शिराळी, काकडी, पडवळ अदी आंतरपिकांच्या लागवडींची शिफारसही केंद्राने केली आहे. दालचीनीची 'कोकण तेज' जात विककरण्यात केंद्रातील संशोधक यशस्वी ठरले आहेत. या जातीची चव उत्कृष्ट असून ३.२ टक्के तेल त्यात आहे. जायफळाची 'कोकण स्वाद' ही जातदेखील इथे विकसित करण्यात आली आहे. एका वर्षात प्रति झाड १५० किलो उत्पादन असणारी कोकमची 'कोंकण हातीस' जातदेखील केंद्रात विकसित करण्यात आली आहे.
केंद्रात दरवर्षी नारळापासून सुमारे ५ टन कचरा आणि मसाला पिकांपासून प्रति हेक्टरी सुमारे ४ हजार किलो कचरा उपलब्ध होतो. या कचऱ्यापासून गांडूळखत तयार करण्यासाठी केंद्राच्या परिसरातच दोन युनिट उभारण्यात आले आहेत. प्रति हेक्टर २ ते ३ टन गांडुळखत उपलब्ध होते. या खताचा वापर बागेतील झाडांसाठी करण्यात येतो. तसेच याच ठिकाणी तयार होणारे व्हर्मीवॉशही रोपांसाठी उपयुक्त असते.
केंद्रातर्फे कीड रोग नियंत्रणाबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात आले आहे. या ठिकाणी गेंड्या भुंग्यांच्या उपद्रवापासून रक्षणासाठी महत्वाच्या उपायांबाबत बागायतदारांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पाने खाणारी अळी आणि काळ्या डोक्याच्या अळीच्या जैव किड नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना केंद्राने शोधली आहे.
मसाला पिकांच्या कलमांना कोकणातील शेतकरी वर्गातून मोठी मागणी येऊ लागली आहे. या वर्गातील पिकांची कलमेदेखील केंद्रात केली जातात. दालचीनीची गुटी कलम पद्धत, जायफळाची कोय कलम आणि मृदकाष्ट पद्धत, जायफळासाठी मायफळाचा खुट अशा विविध पद्धती विकसीत करून केंद्राने कोकणातील शेतकऱ्यांना नवा मार्ग दाखविला आहे.
संशोधन केंद्रामधील डॉ.नागवेकर यांच्यासह प्रा.विशाल सावंत आणि प्रा. संदीप गुरव अशा प्रकारच्या संशोधनात आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात व्यस्त असतात. केंद्राच्या महसूली उत्पन्नातही वाढ होत असून ते गतवर्षी ३६ लाखापर्यंत पोहचले आहे. परिसरातील नागरिकांना येथील विक्री केंद्रात या ठिकाणचे उत्पादन अल्पदरात उपलब्ध करून दिले जाते. संशोधनाला नियोजनाची जोड देऊन इथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या केलेल्या परिश्रमामुळेच केंद्राला राष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळाला आहे. हा सन्मान निश्चितपणे इथल्या संशोधन कार्याला नवी ऊर्जा देणारा ठरेल!