सध्याचा स्थितीत शहरीकरण व औद्योगीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या शहरीकरण व औद्योगीकरणासाठी नागरी समुदाय मोठ्या प्रमाणात जंगल संपत्ती उपयोगात आणत आहे. मात्र, जंगल संपत्तीच्या शाश्वत उपयोग व्हावा, हा विचार कुठेही दिसून येत नाही
जंगलातून प्राप्त होणाऱ्या वनउपजांवर आधारित आपली उपजीविका पूर्ण करणारा एक मोठा आदिवासी समुदाय आहे. या आदिवासी बांधवाच्या उपजीविकेचे अनेक प्रश्न सध्या निर्माण होत आहे आहेत. शेतीतून मिळणारे अत्यंल्प उत्पादन वार्षिक धान्य पुरविण्यास अपुरे पडते. त्यामुळे त्यांना जंगलावर उपजीविकेसाठी अवलंबून रहावे लागते. जंगलसंपत्तीमध्ये वाढ व्हावी, जैविविधता वाढावी, आदिवासी समुदायाची उपजीविका शाश्वत व्हावी, जंगलसंपत्तीचा वारसा जपण्याचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांत रुजावा या अनुषंगाने सृजन संस्था मांगुर्डा यांच्यावतीने आदिवासी भागातील गावांमध्ये पर्यावरणमित्र गट संकल्पना राबविण्यात येते आहे.
या पर्यावरण मित्र गटाने गावातील विद्यार्थ्यांव्दारे उन्हाळ्यात रानबिया संकलित केल्या. या रानबियांची टोबणी करण्याचा उपक्रम सिबलानजीकच्या पाचपोर या कोलाम वस्तीच्या पोडावर नुकताच आयोजित करण्यात आला. या उपक्रमादरम्यान पाचपोर गावातील संरक्षित जंगलामधील ३६ हेक्टर जंगलात बांबू, साग, सिवन-साग, सीताफळ, धावडा, सावर, बेहडा, मोहा, चारोळी, हिरडा, यासारख्या रानबियांची टोबणी करण्यात आली. यावेळी पर्यावरण मित्रगटाचे विद्यार्थी, किशोरवयीन मुली व इतर सदस्य उपस्थित होते.
या उपक्रमाकरिता वनसंरक्षक समितीचे अध्यक्ष महादेव टेकाम, आरोग्यदूत कविता आत्राम, वसंता आत्राम, यांचे सहकार्य लाभले. सृजनचे कार्यकर्ते देवेंद्र राजुरकर, गणेश आत्राम, रणजित तोडसाम, करुणा शिंदे, यांचे मार्गदर्शन लाभले.