Tuesday, November 1, 2011

राजुऱ्याचा मिरची बाजार


राजुरा बाजार या गावाची बैलबाजाराप्रमाणे मिरचीसाठीसुध्दा देशभरात ख्याती आहे. मिरचीची आंतरराज्यीय बाजारपेठ म्हणूनही राजुऱ्याची ओळख आहे. बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या हिरव्या मिरचीची ओळख घाटावरची तिखट मिरची अशी आहे. ही मिरची अतिशय तिखट असल्याने तिला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मिरची खरेदीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून व्यापारी येथे डेरेदाखल होतात. रात्री ८ वाजता सुरु होणाऱ्या मिरची बाजारात पहाटेपर्यंत खरेदी-विक्रीचे व्यवहार असतात. शेकडो वर्षाचा बाजार आणि १५०० क्विंटल मिरचीची आवक होत असताना या भागात मिरचीवर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्याची मागणी होत आहे.

वरुड तालुका संत्र्याकरिता प्रसिध्द आहे. मिरचीचे उत्पादनासुध्दा तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या परिसरातील मिरचीने देश विदेशात स्थान मिळविले आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून मिरची बाजार फुलायला सुरुवात होते. मिरची उत्पादकांच्या गाड्या दर दिवसाला येत असते.

गत आठ दिवसापासून किमान १५०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे दर मिरचीला दिला जात आहे. विशेष म्हणजे येथील मिरची बाजार हा रात्री ८ वाजता सुरु होऊन पहाटेपर्यंत चालतो. रात्री चालणारा हा विदर्भातील एकमेव राजुरा बाजार येथील मिरची बाजार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीने येथे शेतकऱ्यांची सोय व व्यापारवृध्दीसाठी तीन वर्षापूर्वी प्रशस्त अशा बाजाराची निर्मिती केली. व बाजाराला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मिरची मार्केट असे नाव दिले आहे. या बाजारामध्ये सुरुवातीला साधारणपणे ९०० क्विंटल हिरव्या मिरचीची आवक होते, तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत ती नऊ हजार क्विंटलवर पोहोचते. लवंगी मिरची घाटावरची म्हणून येथील तिखट मिरचीची ओळख आहे. परिसरात मिरचीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. परंतु मिरचीवर प्रक्रिया करणारे कारखाने नाही. यामुळे कच्च्या मालाची जोखीम पत्कारायला कोणीही तयार होत नाही.

ब्रिटिश राजवटीत राजुराबाजार येथे मिरची आणि गुरांचा बाजार भरत असे. गुरांचा बाजारसुध्दा विदर्भात प्रसिध्द होता, तर मिरची बाजार देशभरात प्रसिध्द आहे. या मिरची बाजाराची वैशिष्ट्ये म्हणजे हा बाजार रात्रीला भरतो आणि पहाटेला संपतो. याला कारणही तसेच आहे. मिरची हा नाशवंत कच्चा माल आहे. काही तासांतच खराब होतो. त्यामुळे धोका पत्कारण्यापेक्षा शेतात दिवसा मिरचीची तोडणी होते आणि रात्रीच्या वेळी बाजारात आणली जाते. व्यापारीसुध्दा रात्रीतूनच तिची खरेदी करुन देशीभरातील बाजारपेठांमध्ये पाठवणी करतात.या मिरची बाजारात देशातील कानाकोपऱ्यातून व्यापारी येतात. महत्वाचे म्हणून येथून अरब देश आणि बांग्लादेशातदेखील मिरची पाठविली जाते.

मिरचीचे दर तासागणिक बदलत राहतात. हे सर्व मोठ्या बाजारपेठेतील भावावर अवलंबून असल्याने दरामध्ये फरबदल होत असतात. आवक वाढली , तर मिरची उत्पादकांना भाव कमी मिळतो. या मिरची बाजारामध्ये ४० परवानाधारक व्यापारी आहेत. मोर्शी, अचलपूर, चांदूरबाजार, काटोल, नागपूर, अमरावती येथील शेतकरीही हिरवी मिरची विक्रीकरिता राजुराबाजारात आणतात.

विशेष म्हणजे मिरची खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना लगेच पैसे दिले जातात. सुरुवातीच्या टप्प्यात बाजारात १ हजार ५०० ते १ हजार ७०० रुपयापर्यंत भाव मिळत आहे. मध्यंतरी आवक वाढल्यास थोडा कमी भाव मिळतो. मात्र पुन्हा डिसेंबरपासून भाव चढतो. तो २ हजार ५०० रुपयापर्यंत पोहोचतो. ऑगस्ट ते मार्च हा मिरची बाजार चांगलाच गजबजलेला असतो.

मिरची बाजाराने शेकडो हातांना रोजगार दिला आहे. भराई तोलाई, दलालीचे काम अनेकांना मिळाले आहे. चहाटपरी, उपहारगृह चालक व तेथे कामावर असलेल्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला आहे. या मिरची बाजारावर अनेकांची उपजीविका अवलंबून असते. अशा प्रसिध्द मिरची बाजारातून देशाच्या कानाकोपऱ्यात मिरची जाते. या बाजाराचे प्रशस्त अशा जागेत स्थानांतर करण्यात आले आहे. बाजार समितीने तीन यार्ड बांधले आहेत. व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. वरुड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजाराचे कार्यालय येथे आहे. शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास वा काही वाद झाल्यास या कार्यालयामध्ये त्यांना आपली गाऱ्हाणी लागलीच घेऊन जाता येते. व शंकांचे निरसन करुन घेता येतो.

शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या मिरची बाजाराचे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मिरची मार्केट असे नामकरण करण्यात आले आहे. मिरची व्यापारातून होणाऱ्या उलाढालीतून बाजार समितीला लाखो रुपयाचे उत्पन्न मिळते. शिवाय सेसपोटी चांगली रक्कम प्राप्त होते. बाजार समितीचे कर्मचारी येथे जातीने हजर राहून मिरचीच्या भावाची माहिती फलकावर नियमित लावतात. मात्र नव्या तंत्राचा वापर करण्याऐवजी पारंपरिक काटा पध्दतीने मिरचीची मोजणी केली जाते.

मिरची बाजारावर कृषी उत्पन्न्‍ बाजार समितीचे नियंत्रण आहे. येथे मिरची खरेदी विक्रीचे कोट्यवधी रुपयाचे व्यवहार होतात. एका रात्रीतून किमान १५ ते २० लाख रुपयांची उलाढाल होते. परंतु मिरचीचे पीक हे पूर्णत: निसर्गावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन ते उत्पन्न हा टप्पा जोखीम पत्करुनच गाठावा लागतो.

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद