Tuesday, November 15, 2011

शोभिवंत माशांचे संगोपन


एखाद्या काचेच्या पेटीत रंगीत आणि चमकणारे मासे पाहिल्यावर माणसाला आल्हाददायक वाटते. सौंदर्याबरोबरच आपल्या हालचालींनी हे मासे आपला थकवाही दूर करतात. असे मासे आपल्याला नदी किंवा समुद्रात क्वचितच पहायला मिळतात. त्यामुळे ड्रॉईंगरूमची शोभा वाढविण्यासाठी लहानसे का होईना ॲक्वेरीअम घरात आणले जाते. पूर्वी हा छंद महानगरातून दिसत असे. मात्र आता लहान शहरातूनही हा छंद जोपासणारी मंडळी दिसू लागली आहेत. म्हणूनच वाढत्या मागणीप्रमाणे त्या प्रमाणात पुरवठा करण्यासाठी शोभिवंत माशांच्या संगोपन आणि संशोधनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे तरुण वर्ग या अभ्यासाकडे वळताना दिसतो आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठांतर्गत रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात 'शोभिवंत माशांचे संगोपन आणि बिजोत्पादन' या विषयावरील पाच दिवसांच्या प्रशिक्षण सत्रात हेच चित्र पहायला मिळाले.


मत्स्यशेतीत शोभिवंत मत्स्यपालनाला महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. शोभिवंत मासे पाळणे हा फक्त छंदच नसून तो विस्तारणारा व्यवसाय म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या क्षेत्राकडे लोकांचा वाढता कल लक्षात घेता शोभिवंत माशांच्या व्यवसायाकडे मत्स्यविज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी संशोधन केंद्रात गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील कोळंबी उत्पादन, शोभिवंत माशांचे उत्पादन, ॲक्वेरिअम तयार करणे आदी विविध विषयांवरील प्रशिक्षण सत्रांचे वर्षभरात आयोजन करण्यात येते. मूलभूत स्वरुपाच्या संशोधनाचा उपयोग विद्यार्थ्यांना व्यवसाय करण्यासाठी करता यावा यादृष्टीने विषयाच्या प्रात्यक्षिकासह त्याचे सूक्ष्म पैलू प्रशिक्षणांतर्गत विद्यार्थ्यांसमोर मांडले जातात. त्यामुळे अशा प्रशिक्षण सत्रांना राज्याबाहेरूनही प्रतिसाद मिळतो. शोभिवंत माशांच्या संगोपनाबाबत आयोजित या सत्रात गुजरात राज्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. भाषेचा कुठलाही अडसर न येऊ देता या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाचा पूरेपूर लाभ घेतला.

एमपीइडीएच्या आकडेवारीप्रमाणे भारतात साधारण 10 लक्ष लोक शोभिवंत मासे पाळण्याचा छंद जोपासतात आणि त्यामुळे अंतर्गत बाजारपेठेत 15 कोटी रुपयांची उलाढाल होते. तर एक दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची दरवर्षी निर्यात होते. जागतिक पातळीवर पाच अब्ज डॉलर्सपर्यंत आर्थिक उलाढाल या क्षेत्रात होते. प्रतिवर्षी त्यात 10 टक्क्यांनी वाढ होत आहे. त्यामुळे नवी पिढी याकडे आकर्षित होत आहे. तरुण उद्योजकांना या व्यवसायातील बारकाव्यांची माहिती झाल्यास त्यातून ते चांगला व्यवसाय विकसित करू शकतात. प्रशिक्षणा दरम्यान या सर्व पैलुंना स्पर्श करण्यात आला.

शोभिवंत मासे पाळताना त्यांचे प्रकार, त्यांची जात, खाद्य, वागणूक, त्यांचे प्रजनन आदीबाबत सविस्तर माहिती असणे आवश्यक असते. त्यातील काही माहिती अत्यंत रोचक असते. शोभिवंत माशाला एकूण 7 मऊ व टोकरी काट्यांपासून बनलेले पर असतात. गप्पी मासा, स्वेर्डटेल, मोली, प्लॅटी मासा, बार्ब मासे, गोल्डफिश, सिंगल टेल, डबल टेल, रासबोरीनी, डॅनिओ, कॅरासिडी असे विविध प्रकार प्रशिक्षणा दरम्यान अभ्यासता येतात. प्रत्येक माशाचे वैशिष्ट्य वेगळे आहे. हे मासे कोणत्या देशात आढळतात, त्यांचे बीज कसे प्राप्त करता येते, माशांचे संगोपन करताना काय काळजी घ्यावी आदी गोष्टी कळल्यावर या व्यवसायात होणारी हानी टाळता येते आणि स्वाभाविकपणे फायद्याचे प्रमाण वाढते.

डॉ. विजय जोशी आणि डॉ. राघवेंद्र पै यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रशिक्षण सत्रात मत्स्यालयाची बांधणी, कृत्रिम खाद्यनिर्मिती, मत्स्यालयातील पाणवनस्पती असे नाविन्यपूर्ण विषय हाताळले गेले. माशांच्या संगोपनासाठी लागणाऱ्या पाणवनस्पतींचा व्यवसायदेखील मोठा फायदेशीर असल्याचे डॉ. पै यांनी सांगितले. या व्यवसायाच्या क्षेत्रात तरुणांना प्रचंड संधी आहे. मत्स्यपालनाचे विविध तंत्र प्रकल्प भेटीतून समजावून सांगताना बँकेकडून व्यवसायासाठी कर्ज कसे मिळवावे, याचेदेखील प्रशिक्षण बँक अधिकाऱ्यांना पाचारण करून देण्यात आले. सोबत परिपूर्ण संदर्भ पुस्तिका भेट देण्यात आल्याने प्रशिक्षणार्थींच्या शंकांचे निरसन चांगल्या प्रकारे होऊ शकले.

प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी साठी ओलांडलेल्या दिलीप पेडणेकर या ज्येष्ठ प्रशिक्षणार्थीने '52 वर्षापासून करीत असलेल्या व्यवसायात अनेक त्रुटी असल्याचे प्रशिक्षणानंतर जाणवले. त्यात सुधारणा करून आणखी व्यवसाय वाढवीन' अशी दिलेली प्रतिक्रीया प्रशिक्षणाचे यश मांडणारी आहे. वर्षातून असे आठ ते दहा सत्रांचे आयोजन केंद्रामार्फत करण्यात येते. प्रशिक्षणार्थींना व्यवसाय करण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शनासाठी केंद्रातील तज्ज्ञ डॉ.बी.आर. चव्हाण, सचिन साटम, रविंद्र बोंद्रे आणि त्यांचे सहकारी आनंदाने तयार असतात. त्यामुळे प्रशिक्षणार्थींचा उत्साहदेखील वाढतो. कोकणात मत्स्य संवर्धनासाठी असणारी अनुकुलता लक्षात घेतल्यास इथल्या युवकांसाठी हे प्रशिक्षण निश्चितपणे फायदेशीर ठरणार आहे. शिवाय महिला प्रतिनिधींचा प्रशिक्षणातील सहभागही तेवढाच आश्वासक आहे.

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद