नवी दिल्लीतील भारतीय कृषी विज्ञान केंद्र, पुसा येथे एका शानदार सोहळ्यात केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्याच्या शालिनी राधाकृष्ण विखे-पाटील आणि सांगली जिल्ह्याचे प्रकाश दत्तात्रय पाटील हे दूध उत्पादक शेतकरी आहेत. या पुरस्काराचे स्वरूप शाल, प्रमाणपत्र, व २१ हजार रोख असे आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या शालिनी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे ३४ जनावरे असून आधुनिक पद्धतीचा वापर करून दररोज ३०० लीटर दूध काढले जाते. याशिवाय त्या बायोगॅस प्रकल्प राबवितात. सांगली जिल्ह्याचे प्रकाश दत्तात्रय पाटील यांच्याकडे २५ जनावरे असून २८५ लीटर दूध दररोज काढले जाते. त्यासोबतच जनावरांसाठी कुरण म्हणून नेटीयर गवत, लसूण गवत उपलब्ध करून देतात. तसेच बायोगॅस प्रकल्पही राबविला जातो.
या प्रसंगी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दूध उत्पादकांना मार्गदर्शन केले. यावेळी सचिव कृषी व सहकार सचिव प्रदीपकुमार बासू, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्सव्यवसाय सचिव रूद्र गंगाधरन, कृषी संशोधन व शिक्षण विभाग सचिव डॉ. अय्यप्पन हे उपस्थित होते.