Monday, June 4, 2012

ऊस पाचट व्यवस्थापन अभियान उत्पादन वाढीचे हुकमी तंत्रज्ञान

भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशात बहुसंख्य लोक शेतीवर आधारित आहेत. पण शेती करताना तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिक उत्पादन घेण्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांमध्ये जागृती करुन त्यांनी आधुनिकतेची कास धरावी यासाठी प्रयत्न करणे कर्तव्य समजून कोल्हापूर येथील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील ऊस पाचट व्यवस्थापन अभियान राबवित आहेत. या अभियानामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादनात वाढ होत असून संपूर्ण राज्याला हे अभियान दिशादर्शक आहे. या विषयी त्यांनी दिलेली माहिती ....

प्रश्न:- ऊस पाचट व्यवस्थापन अभियान राबविणे आवश्यक असल्याचे आपणास का वाटले? 

उत्तर:- ऊसाच्या पाचटाच्या व्यापक फायद्यांचा व जमिनीच्या बिघडत जाणाऱ्या आरोग्याचा विचार करता हे तंत्रज्ञान राबविणे आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस शेती मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जिल्हा पाचटमुक्त करण्याच्या उद्देशाने नोव्हेंबर 2011 ला हा संकल्प केला. यामुळे 100 कोटी रुपयांचे उत्पादन वाढणार असून उत्पादन खर्चात 50 कोटी रुपयांची बचत होणार आहे. हे सुरुवातीच्या अभ्यासाअंती लक्षात आल्यानंतर हे अभियान प्रभावीपणे राबविण्याचे ठरविले.
प्रश्न:- ऊस पाचट अभियान राबविण्याचा उद्देश काय आहे? 

उत्तर:- ऊस उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे तसेच पर्यावरण संवर्धन, पाण्याची, विजेची बचत आणि जमिनीचे आरोग्य सुधारणे.

प्रश्न:- ऊस पाचटाचे व्यवस्थापन कसे करावे?

उत्तर:- ऊस पिकाची उत्पादकता वाढण्यासाठी हे एक हुकमी तंत्रज्ञान आहे.ऊस पाचटाचे व्यवस्थापन करताना ऊसातील पाला न जाळता एक आड एक सरीत ठेवला जातो आणि मोकळ्या सरीव्दारे पाणी दिले जाते.त्यासाठी वेगळ्या वाहतूकीची गरज नाही म्हणून हे व्यवस्थापन करणे सहज शक्य आहे. 

प्रश्न:- ऊस पाचट व्यवस्थापनाचे फायदे कोणते ? 

उत्तर:- मुख्य म्हणजे हेक्टरी एक ते दीड कोटी लिटर पाण्याची व सुमारे 100 ते 125 युनिट विजेची बचत होते. शिवाय पाचटाच्या आच्छादनामुळे भांगलणी व मशागतीच्या खर्चात व श्रमात 50 टक्क्यांनी बचत होते, शेतात ओलाव्याचे प्रमाण जास्त काळ टिकून राहते, त्यामुळे पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढले तरी ऊसाची वाढ चांगली होते.

एक आड एक सरीत पाणी दिल्याने सुमारे एक कोटी लिटर पाण्याची व ते उचलण्यासाठी लागणाऱ्या सुमारे 100 ते 150 युनिट विजेची बचत होते. ऊस क्षेत्रातून एकरी पाचते सहा टन पाचट मिळते. त्यापासून दोन ते तीन टन सेंद्रिय खत कोणतीही वाहतूक न करता विना खर्चात खोडवा पिकाला शेतातच मिळते.

ऊसाच्या उत्पादनात एकरी चार ते सहा टनांची वाढ होते. पाचटाच्या पूर्ण आच्छादनामुळे जमिनीच्या पृष्ठ भागावरुन होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. पाचटाचे विघटन होत असताना त्यामध्ये असणारी अन्नद्रव्ये उदा. नत्र 40 ते 50 किलो, स्फुरद 20 ते 30 किलो व पालाश 75 ते 100 किलो प्रति हेक्टरी ऊसाला उपलब्ध होतो. 

जमिनीचे तापमान थंड राखले जाते. त्यामुळे पांढऱ्या मुळांची नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे जमीन भूसभुशीत होऊन हवा खेळती राहते. तसेच पाचटातील सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक गुणधर्म सुधारतात व जलधारण शक्ती वाढते. पाचट कुजत असताना त्यातून पिकाला आवश्यक असणारा कार्बन डाय ऑक्साईड वायू बाहेर पडतो. त्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते.

प्रश्न:- या अभियानाव्दारे पर्यावरणाचे संवर्धन कसे होते ? 

उत्तर :- राज्यातील 8.5 लाख हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे 50 ते 55 टक्के क्षेत्र खोडवा, निडवा पिकाखाली असते सदर क्षेत्रावरील हेक्टरी 10 टन पाचट गृहीत धरल्यास सुमारे 40 ते 45 लाख टन पाला अपवाद वगळता सध्या जाळून टाकला जातो. याव्दारे प्रचंड प्रमाणात प्रदुषण होते. याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. या तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे होणाऱ्या इतर फायद्याबरोबरच प्रदुषण वाचविणे हा एक महत्वाचा फायदा होणार आहे.

प्रश्न:- अभियान अधिक गतीमान करण्यासाठी आणखी कोणत्या उपाययोजना कराव्यात असे वाटते ? 

उत्तर:- फायद्यांचा गांभिर्याने विचार करुन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहचविण्यासाठी लागणारे मनुष्यबळ महाराष्ट्र रोजगार हमी योेजनेअंतर्गत पुरविल्यास किंवा शेतकऱ्याने स्वत: काम करुन पाचट एक आड एक सरीत ठेवल्यास हेक्टरी 50 मनुष्य दिवस गृहित धरुन रु. 5 हजार पर्यंत अनुदान दिल्यास हे तंत्रज्ञान 1 ते 2 वर्षातच सर्व क्षेत्रावर पसरेल आणि त्यातून सुमारे 5 लाख टन ऊस उत्पादन वाढीबरोबरच 50 हजार कोटी लिटर पाणी व 5 लाख टन पाला व अमुल्य असे जमिनीचे आरोग्य व सुपिकता टिकविता येईल.

प्रश्न:- हे अभियान लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आपण कोणते प्रयत्न केले ? 

उत्तर:- यासाठी माहिती पुस्तिका आणि घडी पत्रिकांचे गावोगावी वाटप केले. स्टीकर्स, टोप्या आणि गळ्यात अडकविण्यासाठी कार्ड दिले. जिंगल्स आणि इतर जाहिरातीव्दारे प्रसिध्दी केली. तसेच या अभियानात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विमान प्रवास ठेवला असून लकी ड्रॉव्दारे शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. शेतकऱ्यांमध्ये जागृतीसाठी जास्तीत जास्त काळजी घेतली आहे.

प्रश्न :- उसाच्या मोकळ्या सरीचा उपयोग कसा करता येईल ? 

उत्तर:- रिकाम्या सरीमध्ये हंगामानुसार वाटाणा, वैशाघी, मूग, उडीद किंवा चवळी घेतल्यास अतिरिक्त उत्पादनाबरोबर जमिनीची सुपिकता सुधारते.

प्रश्न:- ऊस पाचट अभियानाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना काय आवाहन कराल ? 

उत्तर:- शेतकऱ्यांच्या समृध्दीचा तसेच जमीन, पाणी व पर्यावरण यांचे संवर्धन करणारा हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. सर्व शेतकरी, संस्थांना या उपक्रमामध्ये उस्फूर्त सहभागी होऊन पाचटयुक्त कोल्हापूर जिल्ह्याचे संकल्प पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद