Sunday, June 3, 2012

शेवगा शेतीचा 'मराळे' पॅटर्न


नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील शहा गावातील बाळासाहेब मराळे या शेतकऱ्याने गेल्या तेरा वर्षापासून शेवगा या पिकाच्या उत्पादनाचा ध्यास घेतला आहे. पुरेशा पाण्याअभावी शेतीत मर्यादा आल्या असताना मोठ्या हिकमतीने त्यांनी शेवगा पिकाचा पर्याय शोधला. अहोरात्र परिश्रमाने, चिकाटीने, त्यांची शेवगा शेती बहरली आहे. एवढेच नव्हे तर राज्याचा सीमा ओलांडून परराज्य आणि देशाबाहेरही त्यांच्या शेवगा शेतीचा प्रचार झाला आहे. त्यांनी शोधलेल्या रोहित-१ या नवीन शेवगा वाणाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनाही चांगले अर्थार्जन होऊ लागले आहे.
नाशिक येथे आय.टी.आय.ची पदवी घेतल्यानंतर बाळासाहेब मराळे यांना पुणे येथे नोकरी करताना अनेकदा कंपन्यांकडून मिळणाऱ्या ब्रेकचा अनुभव घ्यावा लागला. ते १९९७ वर्ष होते. सहा महिने झाले की ब्रेक देणाऱ्या कंपन्यांना ते वैतागून गेले होते. अशातच घरच्या शेतीची नाळ काही सुटलेली नव्हती. त्यात काय करता येईल याचा विचार सुरू असायचा. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा पुण्याच्या गुलटेकडी बाजारपेठेत विविध शेतीमाल पाहत असताना ट्रकच्या ट्रक भरुन शेवगा आलेला दिसला. पाठपुरावा केला असता तामिळनाडू व गुजरातेतून तो महाराष्ट्रात विक्रीसाठी येतो असे समजले. महाराष्ट्रात त्या काळी फारसा शेवगा दिसायचा नाही. यावरुन शेवग्याच्या बाजारपेठेची क्षमता मराळे यांच्या लक्षात आली. पुढे मग या पिकाचे बियाणे मिळविण्याचा छंद लागला. 

दुसरी बाजू अशी होती की सिन्नर तालुक्यातील त्यांच्या शहा गावचा परिसर वर्षानुवर्षे अवर्षणग्रस्त भाग. उन्हाळ्यातील दोन तीन महिने तर पाण्याचे दुर्भिक्षच. त्यांच्या वाट्याला दहा एकराची जमीन आली होती. मात्र ते खडकाळ माळरान असल्यामुळे तेथे पाणी मुरायचे नाही. बाजरी किंवा तत्सम पिकाची शेती करताना वर्षाला अत्यंत तुटपुंजे उत्पन्न हाती पडायचे. त्यातून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणे अवघड होते. त्यामुळे पारंपरिक पीक पद्धतीत बदल करण्याचे मराळे यांचे प्रयत्न सुरू होते. शेवगा पिकासाठी त्यांनी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना भेट दिली. राज्याबाहेर चेन्नई, केरळपर्यंत ते पोहोचले. चेन्नई परिसरात भर उन्हाळ्यात हलक्या जमिनीमध्ये ३० ते ४० एकर क्षेत्रात शेवग्याची समाधानकारक वाढ असलेली झाडे त्यांनी पाहिली. आपल्याकडेही अशा परिस्थितीत शेवगा चांगला येईल, असा विश्वास त्यातून निर्माण झाला. या पिकाची अधिक माहिती घेण्यासाठी ते कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, गुजरात आदी राज्यात जाऊन आले. 

मराळे यांनी या पिकाचा बारकाईने अभ्यास सुरू केला. बाजारपेठेचे सर्वेक्षण करुन दर लक्षात घेतले. सर्व बाबी विचारात घेऊन त्यांनी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणाऱ्या भागाला कमी क्षेत्रात, कमी पाण्यात शेवगा पिकाचा पर्याय देण्याचे नक्की केले. ते वर्ष होते १९९९. 

शेवगा शेतीला घरातून विरोध झाला. मात्र या पर्यायावर मराळे ठाम होते. सुरुवातीस एक एकर क्षेत्र या पिकासाठी निवडले. विविध राज्यातून तसेच स्थानिक भागामधून शेवग्याचे विविध अठरा वाण आणून त्यांची लागवड केली. पहिल्या सहा महिन्यात एक एकर क्षेत्रातून पंचवीस हजारांचे उत्पन्न मिळाले. त्यातून उत्साह वाढला. पहिले उत्पादन स्थानिक बाजारपेठेतच विकले. पुढच्या वर्षी मुंबई बाजारपेठेकडून असलेली मागणी त्यांच्या लक्षात आली. तेथे कोणत्या गुणवत्तेच्या शेंगांना अधिक दर मिळतो, तसेच निर्यातीसाठी कोणत्या प्रकारचा दर्जा लागतो हे देखील व्यापाऱ्यांकडून समजले. आकर्षक गर्द पोपटी हिरवा रंग, गोड गर, अधिक टिकवण क्षमता, मध्यम आकार असलेल्या शेंगांना निर्यातीसाठी अधिक मागणी असते हे समजले. त्यानुसार त्यांनी उत्पादनामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी मेहनत घेतली. आता विविध प्रयोग करीत त्यांचा या पिकातील अनुभव दांडगा झाला आहे. व्यापाऱ्यांमार्फत त्यांचा शेवगा आखाती तसेच युरोपीय देशात निर्यात केला जातोय. अर्थात हा झाला मराळे यांच्या शेतीतील एक टप्पा.

शेवगा वाणाचा झाला प्रसार

दुसरा महत्वाचा टप्पा म्हणजे त्यांच्या शेवगा शेतीचा प्रचार केवळ राज्यातील विविध जिल्ह्यात नव्हे तर परराज्य व ती ही सीमा ओलांडून परदेशापर्यंत पोहोचला आहे. गेल्या तेरा वर्षाच्या कालावधीत सुमारे १६ हजार शेतकऱ्यांनी त्यांच्या शेवगा शेतीला भेट दिली आहे. असंख्य शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून शेवगा वाण घेऊन आपल्या शेतात त्याची लागवड केली आहे. शेवगा शेती बरोबरच त्यांनी फक्त शेवगा रोपांची स्वतंत्र नर्सरी सुरू केली आहे. त्यातून उच्च दर्जाच्या रोपांची निर्मिती करुन ती शेतकऱ्यांना पुरवली जातात. त्यातील उत्पादनातूनही त्यांना चांगले अर्थार्जन होत आहे. त्यांच्या शेवगा शेतीतील तेरा वर्षाच्या अनुभवाचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा झालाच पण परराज्यातील शेतकरीही त्यांच्या अनुभवाचा लाभ घेत आहेत. हेच मराळे यांच्या शेवगा शेतीचे यश म्हणावे लागेल. आपल्या तंत्राचा इतर शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून त्यांनी 'आधुनिक शेवगा लागवड' व 'शेवगा लागवड तंत्र आणि मंत्र' ही दोन पुस्तके लिहिली आहेत. सद्यस्थितीत दोन्ही पुस्तकांच्या आवृत्या संपल्या असून तिसऱ्या आवृत्तीचे काम चालू आहे. या शिवाय २००२ मध्ये त्यांनी शेवगा शेतीची माहिती देणारी www.drumsticksindia.com ही वेबसाईट सुरू केली आहे.

एका वेगळ्या वाणाचा इतिहास

श्री.मराळे यांच्या शेतीतील जे वाण आज अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाहायला मिळते त्याचे नामकरण त्यांनी रोहित-१ असे केले आहे. या वाणाचा इतिहास शोधायचा तर पूर्वी विविध वाणांचे बियाणे आणून ते शेतात वाढवण्याचा छंदच त्यांना लागला होता. एकदा आपला माल ते मुंबईत विक्रीसाठी घेऊन गेले होते. त्यावेळी त्यातील वेगळ्या गुणवत्तेच्या शेंगा एका व्यापाऱ्याने निदर्शनास आणून दिल्या आणि त्या निर्यातीसाठी योग्य असल्याचे सांगितले. मराळे यांनी त्यानंतर तशा शेंगा देणारे झाड शोधले. अन्य वाणांच्या तुलनेत या वाणाचे गुणधर्म व वैशिष्ट्ये वेगळी होती. त्यानंतर २००१ ते २००४ दरम्यान या झाडाचे सतत निरीक्षण व अभ्यास सुरू केला. त्याची वृद्धी केली. स्वतंत्र प्लॉट केला. स्थानिक बाजारपेठेत तसेच परदेशी बाजारपेठेत त्याला चांगला दरही मिळू लागला. हे वाण कोणत्या राज्यातले व कोणत्या भागातले आहे हे सांगणे कठीण आहे. मात्र मी ते चांगले वाढवले. या वाणाचे नामकरण केल्यास त्या नावाने चांगला दर मिळू शकेल, असे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी व सामाजिक काम करणाऱ्यांच्या आग्रहावरुन त्यांनी २००५ मध्ये त्याचे रोहित-१ असे नामकरण केले आहे. 

आता तीन एकरावर केवळ हेच वाण वाढवले आहे. गेल्या सहा वर्षात या वाणाची सहा राज्यात लागवड झाली असून पूर्वीच्या शेवगा जातीपेक्षा शेतकऱ्यांना या वाणापासून १० ते ३० टक्के जास्त उत्पन्न मिळाले आहे. या शिवाय श्रीलंका, इस्त्राईल, ऑस्ट्रेलिया, तैवान, चीन, जपान या देशातील शेतकऱ्यांनी व कृषी तज्ज्ञांनी मराळे यांच्या शेवगा शेतीला भेट देऊन आपआपल्या देशामध्ये रोहित-१ या वाणाची लागवड केली आहे.

श्री.मराळे यांनी तेरा वर्षात शेवगा शेतीतील केलेल्या विविध प्रयोगाची व संशोधनाची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. श्री.मराळे म्हणाले, शेवग्यापासून चांगला आर्थिक फायदा होण्यासाठी ४ ते ५ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ७ ते १० एकर क्षेत्रावर लागवड करुन ग्रुप पद्धतीने विक्री व्यवस्था तयार केली तर शेवगा शेंगांची स्थानिक बाजारपेठेपासून त्या त्या जिल्ह्यातील भाजी मार्केटमध्ये विक्री करता येऊ शकेल. तसेच पुणे, मुंबई, हैद्राबाद, बेंगलोर, नागपूर, इंदोर, अहमदाबाद ह्या शेवगा शेंगा विक्रीच्या मोठ्या बाजारपेठा आहेत. तेथे विक्री करूनही अधिक लाभ मिळविता येऊ शकेल.

एकूणच शेवगा शेतीतील मराळे यांनी केलेल्या या प्रयोगामुळे अनेक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांमुळे कृषी क्षेत्राला नवसंजीवनी मिळू शकेल, यात शंका नाही.

1 comment:

  1. बियाणे कुठे भेटेल.बऱ्याच ठिकाणी चौकशी केली अजून नाही भेटले

    ReplyDelete

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद