Monday, June 4, 2012

कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी शेती मिशन स्थापन करणार - पृथ्वीराज चव्हाण


राज्यातील ५७ टक्के जनता ही कोरडवाहू शेती करते, कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी राज्यात कोरडवाहू शेती मिशन स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. अकोला येथील कृषी महाविद्यालयाच्या डॉ.के.आर.ठाकरे सभागृहात आयोजित संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीच्या समारोपीय कार्यक्रमात शास्त्रज्ञांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे होते. यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदचे उपाध्यक्ष विजय कोलते, कृषी व फलोत्पादन विभागाचे प्रधान सचिव डॉ.सुधीरकुमार गोयल, कृषी आयुक्त उमाकांत दांगट, विभागीय आयुक्त गणेश ठाकूर, आमदार बळीराम सिरसकार, वसंतराव खोटरे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ.टी.ए.मोरे, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ.के.पी.गोरे, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉ.के.ई.लवांदे, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ.व्ही.एम.मायंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, समस्या आणि संशोधन यासाठी दरवर्षी राज्यातील ४ विद्यापीठांतील शास्त्रज्ञांची बैठक होत असते. या बैठकीत करण्यात आलेल्या शिफारसी व संशोधनाची अंमलबजावणी शासनामार्फत करण्यात येते. वाढत्या तापमानाचा शेतीवर विपरीत परिणाम होत असून हवामानातील बदलाशी निगडित अशा वाणांचे संशोधन शास्त्रज्ञांनी करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७८ हजार कोटी रुपयांची गरज आहे. राज्यात सिंचनावर अधिक भर देणे गरजेचे असल्याचे सांगून भविष्यात शेती संशोधनात आमूलाग्र बदल करून आधुनिकता आणावी लागेल, यासाठी जनसहभाग वाढविणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कृषी प्रदर्शनात सहभागी झालेल्या सामान्य शेतकऱ्यांनी आपले प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करून संशोधन केले आहे. अशा शेतकऱ्यांना विद्यापीठांनी संपूर्ण सहकार्य करून त्यांच्या पाठिशी उभे राहावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

कृषी विकासात विद्यापीठांचे अनन्यसाधारण महत्व असून यामुळे राज्याच्या कृषी औद्योगिक क्षेत्राला चालना मिळाली असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. कृषी विकासासाठी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शेतकरी यांचा समन्वय असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना उपयोगी पडेल असे संशोधन करावे, असे डॉ.गोयल यांनी सांगितले.

चाळीसाव्या कृषी संशोधन परिषदेच्या बैठकीत चार कृषी विद्यापीठांतून १९६ शिफारसी प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी १६५ शिफारशी पारित करण्यात आल्या असल्याची माहिती डॉ.व्यकंटराव मायंदे यांनी प्रास्ताविकातून दिली. १५ पिकांचे नवीन वाण प्रसारित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

शासन शेतकऱ्यांच्या पा‍ठिशी खंबीरपणे उभे राहील - मुख्यमंत्री

कृषी उत्पादन वाढीसाठी दर्जेदार बियाणे, खते व पीक कर्जासोबत कृषी विषयक आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीच्या निमित्ताने डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कृषी चर्चासत्रात श्री.चव्हाण बोलत होते.
चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे होते. व्यासपीठावर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष विजयराव कोलते, कृषी व फलोत्पादन विभागाचे प्रधान सचिव डॉ.सुधीरकुमार गोयल, कृषी आयुक्त उमाकांत दांगट, विभागीय आयुक्त गणेश ठाकूर, आमदार बळीराम सिरसकार, वसंतराव खोटरे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.टी.ए.मोरे, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.पी.गोरे, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.ई.लवांदे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक आर.जी.बनसोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले, नवीन वस्त्रोद्योग धोरणानुसार ज्या भागात कापूस पिकतो त्याच परिसरात प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यानुसार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रक्रिया उद्योग सुरू करण्याबाबत खाजगी उद्योजकांनीही तयारी दर्शविली आहे. फळबाग पिकासाठी विम्याच्या रकमेचा बोजा शेतकऱ्यांवर पडू नये म्हणून केंद्र, राज्य शासन व शेतकरी यांच्या संयुक्त रक्कमेतून विमा योजना राबविण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्कल स्तरावर हवामान व पर्जन्यमापन यंत्र बसविण्यात येणार असल्याची माहिती देऊन शेतकरी पॅकेजअंतर्गत शासनातर्फे जाहीर झालेल्या मदतीचे तातडीने वाटप करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नैसर्गिक आपतीच्या वेळी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

श्री.विखे पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी चर्चासत्र आयोजिण्यात आले असल्याचे सांगितले.

डॉ.मायंदे यांनी प्रास्ताविकात चर्चासत्र आयोजनाची माहिती दिली.

या चर्चासत्रात विदर्भातील ११ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. या मध्ये मोर्शी तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत ट्युबवेल व बोअरवेलसाठी ९० टक्के अनुदान मिळावे, एकरी ३० ते ४० हजार रुपये पीक कर्ज मिळावे, महाबीजने खरेदी केलेल्या बीज उत्पादनाचे ६० हजार रुपये त्वरित मिळावेत, अनुदानाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात याव्यात, ठिबक सिंचनाच्या संच खरेदीच्या अनुदानात वाढ करण्यात यावी, कमी व्याज दराने दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध व्हावे, शेतीला सिंचन सुविधा व शेतमालाला योग्यभाव मिळावा, वन्य प्राण्यांपासून शेतमालाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कायम स्वरुपी उपाययोजनेसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, ६५ वर्षांवरील शेतकऱ्यांना निवृतीवेतन योजना लागू करावी, प्रत्येक शेतकऱ्याला पाच गायी पुरविण्यात याव्यात, कृषी पंपाना किमान ८ तास वीज पुरवठा करावा, कृषी माल आयात/निर्यात धोरणात शेतकरी हिताला प्राधान्य देण्यात यावे, भाजी-पाला पिकाप्रमाणे कपाशीच्या पिकासाठी प्लास्टीक आच्‍छादनाची योजना राबवावी, प्रत्येक गावात शेतमाल साठविण्यासाठी गोदाम बांधण्यात यावेत आदी स्वरूपाच्या समस्यांचा समावेश होता.

प्रारंभी मुख्यमंत्री श्री.चव्हाण यांनी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच दीप प्रज्वलित करुन चर्चासत्राचे उद्घाटन केले.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद