Sunday, April 1, 2012

युवक शेतकऱ्यांनी धरली गटशेतीची वाट


बदलत्या नैसर्गिक परिस्थितीमुळे पारंपरिक शेतीत निर्माण झालेल्या अशाश्वतपणावर मात करीत काहीतरी वेगळे करून दाखविण्याची जिद्द उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नजच्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. या जिद्दीला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी नान्नजच्या सहा युवक शेतकऱ्यांनी गट शेतीची वाट धरली आहे. 

प्रत्येकी अवघ्या दहा गुंठ्यामध्ये सुरु असलेला हा प्रयोग उत्तर सोलापूर तालुक्यासाठीच नव्हे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीही पथदर्शी ठरत असून इस्त्रायलच्या धर्तीवर सेडनेटमधील ग्रुप फार्मिंगचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे प्रयोगशील शेतकरी अंकुश टोणपे यांनी सांगितले. 
मूळातच नान्नज हे गाव द्राक्ष उत्पादन आणि त्यातील संशोधनामुळे जगाच्या नकाशावर पोहोचले. मात्र, द्राक्ष उत्पादनामध्ये अव्वल असलेल्या या गावात निसर्गाच्या अवकृपेमुळे पाण्याअभावी शेकडो एकर बागा काढण्याची वेळ इथल्या द्राक्ष उत्पादकांवर आली. तेव्हा दिवसेंदिवस घाट्यात येत असलेल्या पारंपरिक पद्धतीच्या शेतीत आपण सोने पिकवू शकतो, हे अंकुश टोणपे यांच्यासह त्यांचे गटशेतीतील सहकारी संतोष म्हमाणे, सतीश म्हमाणे, पप्पू गुरव, अनिल कोरे आणि प्रकाश शिंगाडे या सहा तरुण शेतकऱ्यांनी सिद्ध करुन दाखविले आहे. 

गटशेतीच्या प्रयोगाकडे वळण्याचे कारण स्पष्ट करताना श्री.टोणपे म्हणाले, उत्तर सोलापूर हा अवर्षणप्रवण तालुका असल्यामुळे जिथे उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळत नाही, तिथे शेतीसाठी पाणी मिळणे अवघड होत आहे. त्यामुळे आम्ही सहा मित्रांनी एकत्र येऊन इथल्या शेतकरी बांधवांसाठी काहीतरी करुन दाखविण्याचा विचार केला. अशातच आता शासन गटशेतीला प्रोत्साहन देत असल्यामुळे आम्ही सहाजणांनी एकत्र येऊन गटशेती करण्याचे ठरविले. परंतु, खुली शेती करण्याऐवजी सेडनेट (जाळी) मधील शेती करण्यावर आमचा पक्का निर्णय झाला. तेव्हा आम्ही इतर ठिकाणी भेट देऊन सेडनेट शेतीची प्रक्रिया पाहून आलो. सहाजणांनी एकत्र येऊन प्रत्येकाच्या शेतातील दहा गुंठ्यात हा प्रयोग राबवायचे निश्चित केले. यासाठी भांडवल उभारण्यासाठी आम्ही नान्नजच्या स्टेट बँकेत गेलो. तिथे शाखा व्यवस्थापकांना आम्ही आमचा मनोदय सांगितला. तेव्हा बँकेनेही आम्हाला प्रोत्साहन दिले. शिवाय कृषी खात्याकडून ग्रुप फार्मिंग आणि सेडनेटसाठी ५० टक्के अनुदान असल्यामुळे आम्ही प्रत्येकी ३ लाख या प्रमाणे १८ लाख रुपयांची कर्जमागणी केली. बँकेनेही आम्हाला कर्ज मंजूर केले. 

टोणपे यांनी त्यांच्या दहा गुंठ्यात तालुक्यात प्रथमच इंद्रा या जातीची सिमला (ढोबळी) मिरची लावली आहे. तर उर्वरित पाच जणांनी हिमांगी काकडी लावली आहे. या गटशेतीचे फायदे सांगताना टोणपे म्हणाले, पूर्वी आम्ही प्रत्येकजण वेगवेगळी पिके घ्यायचो. तेव्हा कोणाला बाजार भाव मिळायचा, तर कोणाचा खर्चही निघायचा नाही. मात्र आता गटाने शेती केल्यामुळे शाश्वत बाजार, व्यापाऱ्याच्या मागणीप्रमाणे आम्ही माल देऊ शकतो. शिवाय एक गट असल्यामुळे योग्य भाव देईल, त्याला माल देऊ शकतो. त्यामुळे चार पैसे वाढवून येतात. खुल्या शेतीपेक्षा सेडनेटमध्ये शेती केल्यामुळे तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत ठेवणे शक्य होते. यामुळे पाण्यातही ५० टक्के बचत होते. याद्वारे खुल्या शेतीपेक्षा दहापट अधिक उत्पादन मिळते. जिथे खुल्या शेतीत पीक घेतल्यानंतर काकडीसारखे पीक २ ते अडीच महिने चालते तेच सेडनेटमध्ये असल्यामुळे चार ते पाच महिने चालते. तर सिमला मिरची वर्षभर चालते. सेडनेटमध्ये रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे फवारणीत ५० टक्के, पर्यायाने एकूण खर्चातही तितकीच बचत होते. खुल्या शेतीच्या तुलनेत या सेडनेटमध्ये जास्त गवत, तण उगवत नाही. शिवाय आम्ही सुरुवातीलाच पॉलिथीन पेपरचा वापर करतो. त्यामुळे खुरपणीचा खर्चही वाचतो. शिवाय आठवड्यातून दोन दिवस आम्ही एकत्र येऊन सल्लामसलत करतो. प्रसंगी तज्ज्ञांनाही मार्गदर्शनासाठी बोलावितो. प्रसंगी एकमेकांना औषधांची मदत करतो. एकमेकांकडे जाऊन पीक परिस्थितीचा अभ्यास करतो. 

आमचा हा प्रयोग पाहून पुढील वर्षी नान्नज आणि आजुबाजूच्या गावात ५० एकरावर सेडनेटमधील शेती उभी राहील, असा विश्वासही टोणपे यांनी व्यक्त केला. त्यांच्या यशामुळे भविष्यात शेतकरी गट शेतीकडे वळाल्यास आश्चर्य वाटायला नको.

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद