अमरावती जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणात सिंचन शेतीचा अभाव आहे. कोरडवाहू शेतीत शेततळ्याच्या माध्यमातून काही प्रमाणात का होईना सिंचन करण्याचा प्रयत्न कृषी विभाग आणि राज्य शासनाने चालविला आहे. या वर्षभरात जिल्ह्यात ३ हजार ८०० शेतकऱ्यांनी कृषी विभागातील योजनेमधून शेततळे तयार केले असून त्याचा शेतीसाठी मोठा लाभ होत आहे.
मागील काही वर्षांत विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा आणि वर्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात योजना राबविण्यात आल्या. या भागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढलेले होते. अभ्यासकांनी शेतकरी आत्महत्येचे कारण सिंचनाचा अभाव असल्याचे स्पष्ट केल्यानंतर पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी पॅकेज दिले. त्यामध्ये सिंचनावरच भर देण्यात आला.
शेतात पाणी साठवल्यास जमिनीचा पोत सुधारण्यासाठी किमान एका पिकाला शेततळ्याच्या माध्यमातून पाणी देता येईल, या हेतूने शासनाने कृषी विभागामार्फत शेततळे देण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाने शेततळ्यासाठी १०० टक्के अनुदान जाहीर केले. शेतकऱ्यांकडून सुरुवातीला योग्य प्रतिसाद मिळाला नसला तरीही यंदा मात्र जिल्ह्यात एकाच वर्षी तब्बल ३ हजार ८०० शेततळे झाल्याचा दावा जिल्हा कृषी अधीक्षकांनी केला आहे. गेल्या चार वर्षापासून कृषी विभाग ही योजना राबवित आहे.
या शेततळ्यांचा जिल्ह्यातील कोरडवाहू शेतीला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकणार आहे. यावर्षी आतापर्यंत ३ हजार ८०० शेततळे तयार झाले असून ३१ मार्च २०१२ पर्यंत आणखी ५०० शेततळे पूर्ण करण्याचे कृषी विभागाचे लक्ष्य होते.
शेततळ्यांमुळे शेतकऱ्याला किमान एका पिकाला पाणी देता येते. यासोबतच शेततळ्याला उत्तम प्रकारे तयार केले आणि त्याला प्लॅस्टिकच्या साहाय्याने कव्हरींग केल्यास त्यामध्ये मत्सपालनासारखा जोड व्यवसाय देखील होऊ शकतो. हाच उद्देश पुढे ठेऊन शासनाने शेततळ्यावर कव्हर टाकण्यासाठी सध्या योजना तयार केली आहे. या योजनेअंतर्गत शासन ५० टक्के अनुदान देत आहे.
No comments:
Post a Comment