Tuesday, April 17, 2012

माळरानावर बहरले डाळींब


पर्जन्यमानात घट झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडला आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे शेतीमालाचे गडगडणारे दर पाहता शेती उद्योग तोट्यात आला आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक पिकांना बाजूला सारत पाण्याच्या थेंबा-थेंबाचे नियोजन करून आणि मेहनत व चिकाटीच्या जोरावर बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली येथील आवटी बंधूंनी त्यांच्या खंडाळा मकरध्वज शिवारातील माळरानावर डाळिंबाचा बगीचा फुलविण्यात यश मिळविले आहे. खडकाळ आणि निकस म्हणवल्या जाणाऱ्या माळरानावर डाळिंबांचा बहर निर्माण करुन इतर शेतकऱ्यासमोर नवा आदर्श निर्माण करण्याचे काम आवटे बंधूनी केले आहे.
शहरातील पुंडलिक नगर भागात गणेश आवटी आणि दिलीप आवटी राहतात. गावालगत खंडाळा मकरध्वज शिवारामध्ये माळरान प्रसिद्ध आहे. तेथील जमीन खडकाळ असल्यामुळे त्यामधून उत्पन्न कमी मिळत असल्याने सदर जमीन कुणीच घेत नसे. परंतु सुरूवातीपासूनच कष्टाळू असलेल्या गणेश आवटी यांनी १० ते १५ वर्षांपूर्वी ती शेती खरेदी केली. सुरुवातीचे काही दिवस शेती तोट्यात गेली. त्यानंतर त्यांनी या कोरडवाहू जमिनीत बोराचे पीक घेतले. शेतात विहीर देखील खोदली. मात्र, त्यातून पाण्याची सोय झाली नाही. अशा परिस्थितीत डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला. शेती तोट्यात जाऊ लागली. परंतु खचून न जाता त्यांनी जवळच असलेल्या पाझर तलावालगत जागा घेऊन त्या ठिकाणावरुन पाईपलाईनद्वारे हजार फूट उंचीवर असलेल्या शेतात पाण्याची व्यवस्था केली. त्यानंतर काही दिवस गहू, हरभरा ही पिके घेतली. परंतु त्याने जेमतेम खर्चही वसूल होत नसल्याने त्यांनी शेतातील पीक बदलण्याचा निर्णय घेतला.

गणेश आवटी व त्यांचे बंधू दिलीप आवटी यांनी त्यांच्या खंडाळा मकरध्वज शिवारातील अडीच एकर शेतामध्ये डाळिंबाची लागवड केली. हजार फूट उंचीवर असणाऱ्या माळरानावर पाणी आणण्यास प्रचंड मेहनत घ्यावी लागल्याने त्यांनी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन केले. उत्कृष्ट नियोजन, चिकाटी आणि पूर्णवेळ मेहनत या जोरावर त्यांनी डाळींब शेती फुलवून दाखविली. अडीच एकरात ९०० डाळिंबाच्या झाडाची १२ बाय ८ असे अंतर ठेवून झिकझ्याक पद्धतीने लागवड केली. त्यानंतर माल असताना आणि माल नसताना झाडाला किती पाणी मिळावे याचे नियोजन करताना १० लिटर प्रती झाडाप्रमाणे त्यांनी पाणी दिले. लागवडीपूर्वीच जमिनीची योग्य मशागत आणि जमिनीला आवश्यक घटकांची पूर्तता त्यांनी केली होती. सर्व मशागत झाल्यानंतर खडकाळ जमिनीत लागवड केलेली डाळिंबाची झाडे फुलाफळांनी लदबदून गेली आणि पहिलाच वेळी २५ क्विंटल डाळिंबाचे उत्पन्न मिळाले. त्याला भावही चांगला मिळाला. प्रती किलो ६५ रुपये प्रमाणे त्याची विक्री केली. 

आता बगीच्याचे वय ३३ महिने झाले असून उत्पन्न घेण्याची दुसरी वेळ आहे. आता सुद्धा एका झाडाला ७० ते ८० पर्यंत डाळिंबाची संख्या आहे. तेव्हा ४० क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळण्याची शक्यता गणेश आवटी यांनी व्यक्त केली आहे. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीमुळेच आपण ही बाग फुलवू शकल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. या बागेच्या संवर्धनासाठी राजेश अहिरे गोदरी व विनोद देशमुख यांनी वेळोवेळी गणेश आवटी यांना सहकार्य केले आहे. ज्या जमिनीकडे खडकाळ आणि माळरान म्हणून पाहिले जात होते, आज त्याच जमिनीवर आकर्षक अशी डाळिंबांनी लदबदलेली बाग पहावयास मिळत आहे. मेहनत घेण्याची तयारी आणि नियोजन असेल तर शेती सुकर होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरणच म्हणता येईल.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद