Tuesday, April 10, 2012

नातं मातीचं


रत्नागिरी जिल्ह्यात अनेकजण पारंपरिक पद्धतीने शेती करण्यात निष्णात आहेत. मात्र कोकणच्या तांबड्या मातीत शेती करताना तिच्या वैशिष्ट्यांचा आणि येणाऱ्या पिकांचा नीट अभ्यास करून शेतीत अनुकूल परिवर्तन करण्याचे प्रयत्न फार थोड्या प्रमाणात आढळून येतात. शिवाय अशा प्रयत्नात यश मिळाल्यावर 'जे जे आपणासी ठावे...' या उक्तीप्रमाणे परिसरातील शेतकऱ्यांना पीकपद्धतीची माहिती देण्याचे प्रयत्नही फारसे आढळत नाहीत. मात्र गुहागर तालुक्यातील कोतळूक गावातील शेतकरी जानू पांडू भेकरे याला अपवाद ठरले आहेत. 
नोकरीच्या अमिषाने मुंबई येथे भर तारूण्यात गेलेले भेकरे शेतीपत्रिका या शेतीविषयक मासिकाचे नियमित वाचक असल्याने त्यांचे मन नोकरीत रमले नाही. शेतीची आवड असल्याने १९८० मध्ये ते गावी परतले. गावात स्वत:ची अशी जमीन नव्हती पण शेती करण्याची प्रबळ इच्छा असल्याने भाड्याने जमीन घेऊन त्यावर शेती करण्यास त्यांनी सुरूवात केली. केवळ तिसरीपर्यंत शिकलेले असूनही नवे ज्ञान आत्मसात करण्याची आवड असल्याने कोकणात सहसा न आढळणारी कलिंगडाची शेती करण्यास त्यांनी सुरूवात केली आणि गेली २८ वर्षे शेतकरी म्हणून त्यांच्या यशाचा आलेख सातत्याने उंचावतो आहे. गुहागर तालुक्यातील कलिंगडाच्या वाढत्या क्षेत्रामागे भेकरे यांचीच प्रेरणा असल्याचे कोतळूक परिसरातील ग्रामस्थ सांगतात.
कौंढर गावात असलेली मेहुण्याची शेतजमीन भेकरे यांनी लागवडीसाठी घेतली आहे. गावातील साडेचार एकर जमिनीपैकी अडीच एकर जमिनीवर कलिंगड लागवड तर उर्वरित जमिनीवर विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड त्यांनी केली आहे. शेतात असलेल्या विहिरीचे पाणी जेमतेम फेब्रुवारी पर्यंत पुरायचे. एका वर्षी कलिंगडाचा बहर शेतात असताना विहीर आटली. पीक हातचे जाणार याची चिंता असताना कृषी विभागाच्या मार्गदर्शनावरून त्यांनी विंधनविहिरीचा पर्याय स्विकारला. पाण्याची कमतरता असतानाही कृषी सहायकांच्या सहकार्यामुळे पीक हाताशी आल्याचे ते भारावून सांगतात.

शीर पंचक्रोशीत कलिंगड लागवडीचा बादशहा म्हणून ओळख असलेले श्री.भेकरे अगदी आत्मविश्वासाने वार्षिक अडीच लाख रुपयांचे उत्पन्न घेणार असे ठासून सांगत होते. त्यांच्या शब्दाला त्यांच्या शेतीतील दोन तपाच्या अनुभवाचे बळ होते. या बळाच्या आधारावरच त्यांनी सामाजिक जाणीवा जपतांना इतरांची शेती बहरण्यासाठी मदत केली आहे. कुणाला पीक पद्धतीची माहिती देऊन तर कुणाच्या शेतात नैसर्गिकरित्या पाणी पोहचवून. शेतात इतरही पिके घेत असताना कलिंगडाच्याच शेतीचा प्रसार का करतात या प्रश्नांचे उत्तर देताना त्यांच्या चेहऱ्यावरील हसू लपत नाही. कलिंगडातून मिळालेल्या उत्पन्नामुळे पाच पैकी चार मुलींचे लग्न सहजरित्या करता आल्याचे ते सांगतात. या पिकाला बाजारात मागणी असून पैसा त्वरित मिळतो, अशी पुस्ती जोडायला देखील ते विसरत नाहीत.

शेताविषयी चर्चा करताना त्यांना श्रृंगारतळीहून कलिंगडाची मागणी आली. तेव्हा विक्रीविषयी माहिती देताना परिसरातील व्यापाऱ्यांकडे कलिंगडाला चांगली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरातील उत्पादकांसमवेत चर्चा करून निश्चित दराने या व्यापाऱ्यांना कलिंगड पुरविले जातात, अशी माहिती त्यांनी दिली. विक्रीचे योग्य व्यवस्थापन असल्याने शेतीतून मिळणाऱ्या लाभात प्रत्येक वर्षी वाढ करण्यात भेकरे यशस्वी ठरले आहेत.

सामाजिकतेचे अंग लाभलेल्या भेकरे यांनी कोतळूक गावातील चार वाड्यांची पाण्याची गैरसोय दूर करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ओढ्यावर प्रथम एक ११ फूट लांब आणि ११ फूट उंच बंधारा गावकऱ्यांच्या मदतीने बांधण्यात आला. त्यामुळे उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध झाले. हा अनुभव लक्षात घेऊन गावकऱ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदानातून ११ वनराई बंधारे बांधले. बंधाऱ्यात मे महिन्यापर्यंत पुरेसा पाणीसाठा राहिल्याने प्रत्येक वाडीत श्रमदानातून नळपाणी योजना कार्यरत करुन गुरूत्वाकर्षण तत्वावर त्यांनी चारही वाड्यांना बारमाही पाण्याची सोय केली आहे. परिसरात शेती क्षेत्रातील वाटाड्या म्हणून त्यांनी आपली ओळख प्रस्थापित केली आहे. अर्थात त्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आणि त्यांच्या सहृदयतेला सलाम करायलाच हवा.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद