अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार व तेथील सरपंच पोपटराव पवार यांचे जलसंधारणाचे व ग्रामविकासाचे कार्य राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. जलसंधारण व ग्रामविकासाबरोबरच सामुदायिक शक्तीचे बळ एकत्रित करुन हिवरेबाजारच्या गावकर्यांनी कृषी क्षेत्रातही आपली वेगळी छाप पाडली आहे.
कांदा हे शेतकर्याचे बेभरवशाचे पीक आहे. कांद्याचे भाव चढले की, त्यावर्षी शेतकरी जिवाची मुंबई करतो आणि कांद्याचे भाव गडगडले की कर्जबाजारी होतो. पण भारतीय शेतकर्याचे कांदा पीक घेण्याचे आकर्षण काही कमी होत नाही. तो दरवर्षी दोन्ही हंगामात कांदा पीक घेण्यासाठी पुढे सरसावत असतो. हिवरेबाजारच्या पोपटराव पवारांनी शेतकर्यांची ही नाडी ओळखली आणि कांदा अभियान सुरु केले.
शेतकर्यांनी कांदा पीक घेऊ नये असे न सांगता उत्पादित केलेला कांदा जास्त दिवस कसा टिकवता येईल याचा गुरुमंत्र शेतकर्यांना दिला. त्यांनी राष्ट्रीय फलोत्पादनातून पारंपरिक कांदा पिकविणार्या शेतकर्यांचा समूह तयार केला. कांदा पिकविणार्या १७ शेतकर्यांना एकत्रित करुन त्यांना कांदा चाळी उभारण्यासाठी प्रवृत्त केले.
सतरा शेतकर्यांपैकी बबन माधव ठाणगे याने ५० मेट्रिक टन क्षमता असलेली कांदा चाळ बांधण्याचा निर्णय घेतला. तर इतर १६ शेतकर्यांनी २५ मेट्रिक टन कांदा साठवण चाळी बांधण्याचे ठरविले आणि हिवरेबाजार परिसरात एका वेळी ४५० मेट्रिक टन कांदा साठवण करणार्या चाळी उभ्या राहिल्या. कांदा चाळ उभारणीसाठी १७ लाभार्थी शेतकर्यांना ४ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान कृषी विभागाने दिले तर कृषी पणन मंडळानेही रुपये ५०० प्रती मेट्रिक टन प्रमाणे एकूण २ लाख २५ हजार रुपयांचे अनुदान दिले.
कांदा साठवणीची क्षमता निर्माण झाल्यामुळे काढणी पश्चात लागणार्या तंत्रज्ञानाचा वापर शेतकर्यांना करता आला. या कांदा चाळीचे डिझाईन राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र, राजगुरुनगर पुणे यांनी तयार करुन दिले असल्यामुळे साठवणुकीची गुणवत्ता चाळीमध्ये तयार झाली आहे. या सुधारित डिझाईनला महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मान्यता मिळालेली आहे.
नाशवंत कांदा उत्पादनास साठवणुकीची सोय उपलब्ध झाल्यामुळे ज्या बाजारपेठेत कांद्याला चांगला भाव आहे, तेथे कांदा विक्रीसाठी नेण्याची सोय झाली. तसेच कांद्याच्या भावात घसरण होते, तेव्हा कांदा विक्रीसाठी न काढता चांगला भाव येईपर्यंत साठवणूक करणे सोपे झाले. त्यामुळे हिवरेबाजारचा शेतकरी खर्या अर्थाने आपल्या मर्जीचा राजा झाला. पोपटराव पवारांनी घालून दिलेली शीस्त सर्वजण पाळत आहेत व त्यांच्या सल्लामसलतीने एकत्रित बसून निर्णय घेतला जात आहे.
कांदा साठवणुकीचा चांगला गुरुमंत्र पोपटराव पवारांनी आपल्या शेतकरी बांधवांना दिला. तसेच शासनाने आणि कृषी पणन मंडळाने आर्थिक सहकार्याचा सामुहिक चाळी बांधण्याच्या निर्णयास पाठिंबा दिला. त्यामुळे हिवरेबाजारच्या कांदा उत्पादक शेतकर्यांना साठवणुकीमुळे रुपये ८ ते १० प्रती किलो जादा दर प्राप्त झाला आणि कांद्याची दरवर्षी कडू - गोड होणारी कहाणी हिवरेबाजारपुरती समाप्त झाली आहे. आज चाळ बांधणारे सतरा शेतकरी कांदा पिक घेतल्यामुळे पस्तावले नाहीत, तर कांदा साठवून ठेवून योग्यवेळी बाजारपेठेत आणण्याचे तंत्र अवगत झाल्यामुळे सुखी आहेत.
'महान्यूज'मधील मजकूर
No comments:
Post a Comment