Friday, December 31, 2010

मोबाईल फवारणी यंत्रातून रोजगार निर्मिती

जेव्हा गरजेतून नावीन्याचा ध्यास आणि या ध्यासाद्वारे शोध लावून पोटाचं खळगं भरण्याचा पर्याय शोधला जातो, तेव्हा गरज ही शोधाची जननी असते ही लोकोक्ती सार्थ ठरते. नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील गुजरखेडा येथील केशव संपत चव्हाण या तरुणाने नवी चेतना व आकांक्षादायी ध्यास घेऊन मोबाईल फवारणी यंत्राव्दारे रोजगार मिळविला आहे.

भूमीहीन असलेल्या केशवने एनफिल्ड बुलेटला स्पेअर पंप बसवून शेतीत फवारणी करण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. भूमीहिन, बेरोजगार या बिरुदावलीतून बाहेर पडून आज केशव महिन्याकाठी खर्च वजा जाता दहा हजाराचे उत्पन्न मिळवून कुटुंब चालवित आहे.

गुजरखेडा हे दुष्काळी गाव आहे. चव्हाण कुटुंब याच गावातील रहिवासी आहे. केशव चव्हाण काहीतरी व्यवसाय करण्याच्या विचारात असताना केशवच्या चिकित्सक नजरेने हेरले की पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने फवारणी करणे गरजेचे बनत आहे. मात्र शेतकर्‍यांना फवारणीचे काम कष्टाचे व अवघड वाटत असल्याचा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि त्याच्या व्यवसायाचा शोध शेतीच्या माध्यमातून पूर्ण झाला. 

घरातील बचत तसेच उसनवार करुन केशवने ४६ हजार रुपयांत एनफिल्ड बुलेट विकत घेतली. बुलेटवर फवारणी पंप त्याने बसविला. बुलटेच्या क्षमतेमुळे हा पंप सहज चालतो. २०० लिटरची पाण्याची टाकी व नळी खरेदी करुन त्याने आपला हा व्यवसाय सुरु केला. प्रत्येक एकराला १२५ रुपये दर निश्चित करुन फवारणी करुन देण्याचे काम पाच सहा महिन्यापांसून त्याने सुरु केले आहे. एका मजुराच्या मदतीने तो दिवसभरात २० एकारापर्यंत फवारणी करु शकतो. मजूर, पेट्रोल व इतर मिळून एकरी ५० ते ६० रुपये खर्च येतो. हा खर्च जाऊन त्याला महिन्याला सरासरी दहा हजाराचे उत्पन्न मिळू लागले आहे.

शेतकरी निविष्ठा घेऊन फवारणी करीत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंडल कृषी अधिकारी हितेंद्र पगार यांनी केशवला निविष्ठा फवारणीचे मार्गदर्शन केले. त्यातून शेतकर्‍यांची गरज भागली व केशवला व्यवसाय मिळाला. फवारणीच्या हंगामात तर त्याला मागणी अधिकच असते.

केशवला कृषी खात्याकडून औषधे देण्यात आली. ही औषधे केशवने शेतकर्‍यांच्या शेतात फवारणी करुन दिली. त्यासाठी फक्त फवारणीचे पैसे केशवने घेतले. केशवने आपला फवारणीचा व्यवसाय येवला तालुक्यात तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातही वाढवला आहे. 

कृषी अधिकारी अशोक डमाळे व पगार यांनी केशवला मार्गदर्शनच नव्हे तर मदतही केली. नवीन व्यवसायाबद्दल बोलताना केशव म्हणतो, मी स्वत: सुरुवातीला साशंक होतो. पण जिद्द व तळमळ होती. त्यातून हा वेगळा व्यवसाय सुरु करुन यश मिळविले आहे. शेतकर्‍यांच्या मदतीला येतानाच माझी गरजही भागत असल्याचे समाधान आहे.

अशोक साळी 

'महान्यूज'मधील मजकूर

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद