Saturday, January 8, 2011

वृक्षायुर्वेद,कीडनियंत्रण, रोग-नियंत्रण.

शेती हा जगातील प्राचीन व्यवसाय आहे. भारतात शेतीचे वेदकालापासून उल्लेख सापडतात. शेतीमधील आताची सर्व प्रश्नचिन्हे त्याही कालात होती. पिकांवरील कीड त्याही कालात होती. रोग होते, वातावरणातील बऱ्या वाईट फरकांचे परिणामांशी झगडा त्या काळातील लोकांनाही करावा लागला. शेतीसाठी विविध हत्यारे व साधने त्या लोकांनीही बनविली होती. त्यांनीही कीडनियंत्रण, रोग-नियंत्रण यांचा विचार केला होता. त्यावर उपायही काढले होते. लागवड किंवा पेरणी कधी करावी, कशी करावी, किती अंतरावर करावी, त्याला पाणी कधी व किती द्यावे, या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार आपल्या पूर्वजांनी केला होता.
वराहमिहिराने आपल्या बृहत्संहितेत अनेक शास्त्रातील त्या काली त्याला ज्ञात झालेल्या माहितीची नोंद करून ठेवली आहे. या नोंदी वाचल्यावर या व अशा अनेक महाभागांनी केवढा अमोल ठेवा आपल्या पुढील पिढय़ांकरिता जतन करून ठेवला आहे याची कल्पना येते. अनेक लोक अनेक प्रकारे परिस्थितीशी झगडत असतात, आपले प्रश्न सोडवत असतात. त्यातून त्यांनी रूढ केलेल्या पद्धती त्यांच्या प्रभावक्षेत्रात चालू असतात, पण त्यापलीकडे त्यांची कुणाला माहिती नसते. अशा नोंदीमुळे अशा यशस्वी पद्धतींची माहिती प्रसारित होऊ शकते. वराहमिहिर एखाद्या युरोपीय देशात झाला असता तर त्याचे नाव त्रिखंडात झाले असते.
आताही वराहमिहिर मोठाच आहे, पण त्याच्या कार्याची कुणाला माहिती नाही. तो संस्कृतात बंदिस्त राहिला आहे. त्याने व त्याच्यासारख्या अनेकांनी शेतीविषयी काय लिहिले आहे याची इतरांनी नव्हेच पण कृषीविद्यापीठांनीही दखल घेतलेली नाही. वराहमिहिराच्या कालात संस्कृत ही लोकभाषा होती. पण आता ती तशी राहिलेली नाही. ज्ञानेश्वरीचे काय झाले? फक्त सातशे वर्षांपूर्वीचा हा ग्रंथ माऊलींनी लोकांना गीता कळावी म्हणून मराठीत लिहिला, परंतु आता ती भाषा किती लोकांना कळते? परंतु ज्ञान हे अशा तऱ्हेने खंडित रहाता कामा नये. विद्वानांनी व निदान कृषिविद्यापीठांनी तरी या साहित्याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. भाषा येत नाही हे कारण होऊ शकत नाही. याची हिंदी, इंग्रजी, मराठी भाषांतरे करून घेऊन ती जिज्ञासूंना उपलब्ध करून देणे अगत्याचे आहे.
त्याही पुढे जाऊन तत्कालीन कीडनियंत्रण, रोगनियंत्रण त्यांनी सुचविलेली टॉनिक्स यांचा अभ्यास करून व ती प्रत्यक्षात वापरून ग्रंथात लिहिल्याप्रमाणे त्यांचा परिणाम होतो की नाही हे पाहूनच ती वापरात आणावी. केवळ वराहमिहिर किंवा आपल्या ऋषिमुनींनी सांगितले म्हणजे ते बरोबर असलेच पाहिजे असा माझा दावा नाही. परंतु त्यांनी सांगितलेल्या उपायांच्या काटेकोर चाचण्या घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी कृषिविद्यापीठे व शेतकऱ्यांनीही पुढे येण्याची गरज आहे. विविध प्रकारच्या हवामानात आणि विविध प्रकारच्या जमिनीतून अशा चाचण्या व्हायला हव्या.
या जुन्या ग्रंथामधून दूध-पाणी शिंपडणे (फवारणे) व मुळाशी घालणे यावर भर दिलेला आहे. या दुधात असे कोणते गुण आहेत याचा शोध घेताना एक दिवस अचानक याचे उत्तर सापडले. दूध पाश्चराइज न करता व थंड न करता कसे टिकवावे याविषयी लेख वाचताना या विषयी खुलासा मिळाला तो पुढीलप्रमाणे- दुधात सुप्तावस्थेत असलेली नैसर्गिक जिवाणुनाशक शक्ती उत्तेजित करून दूध ७ ते २६ तासपर्यंत टिकविता येते. याला एल.पी.पद्धत म्हणतात. शास्त्रीय भाषेत ‘लॅक्टोपॅरॉक्सिडेज थायोसायनेट हैड्रोजन पेरॉक्सॉइड’ असे म्हणतात. यामध्ये दुधातील ‘थायोसायनेट’ या घटकाचे ‘लॅक्टोपेरॉक्सिडेज’ या संप्रेरकाने व ‘हैड्रोजन पेरॉक्साइड’च्या मदतीने ‘हायपोथायोसायनेट आम्ले’ व पुढे हायपोथायोसायनेट या जिवाणुनाशक रसायनात रूपांतर होते. वरील तीनही घटकांपैकी लॅक्टोपेरॉक्सिडेज निसर्गत: गाईचे व म्हशीचे दुधात प्रतिलिटर ३० मि. ली. असते व थायोसायनेट प्रतिलिटर ०.०१ ते ०.२५ मिलिमोज असते. हे प्रमाण गुरांच्या खाद्याप्रमाणे बदलू शकते. ‘हैड्रोजनपेरॉक्साइड’ मात्र दुधात मिसळावे लागते.
हे विवेचन वाचल्यावर दुधात जिवाणुनाशक घटक निसर्गत:च आहेत हे लक्षात येते. वृक्षायुर्वेदकारांना हा तपशील एखादे वेळेस माहिती नसेल. दुधाची भांडी विसळून ते पाणी एखाद्या झाडाचे मुळात टाकल्यावर त्यात जो फरक पडला त्यावरूनही ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली असेल. परंतु होणाऱ्या परिणामांची नोंद घेऊन त्याचा उपयोग त्यांनी करून घेतला व आपल्या ग्रंथकारांनीही त्याची नोंद करून ठेवली हे महत्वाचे आहे. (यावरून
एक लक्षात येते की पिकांवर औषध म्हणून पाश्चराइज केलेले दूध नसावे.) या उलट दूध टिकविण्याविषयी लेख लिहिणाऱ्याला किंवा दुधातील घटकद्रव्ये व त्यांचे गुणधर्म यांचे संशोधन करणाऱ्या आधुनिक संशोधकालाही या दुधाचा उपयोग जिवाणुनियंत्रक म्हणून शेतीत होईल याची कल्पना नसेल. परंतु दूध-पाण्याचा प्रयोग करून बघायला काय हरकत आहे?
वराहमिहिराच्या ‘बृहत्संहिता’ या बृहत्ग्रंथाचा वृक्षायुर्वेद हा ५५ वा अध्याय आहे. यात एकूण ३१ श्लोक आहेत. यात झाडांची अभिवृद्धी, जमिनीची लागवडीचे दृष्टीने तयारी, बीजप्रक्रिया, रोपप्रक्रिया, झाडांसाठी टॉनिक्स, झाडांवरील रोग, लागवडीचे तंत्र व सिंचन या गोष्टींचा विचार केला आहे.(पूर्वार्ध)

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद