केवळ परंपरागत शेती न करता फळबागेकडे वळून त्यावर घरीच प्रक्रिया करुन त्याचे उत्पादन बाजारात विकल्याने जास्त नफा मिळतो. याचा प्रत्यय अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू रेल्वे स्टेशन येथील सय्यद खुर्शीद व पत्नी अनिसा कौसर यांना आला आहे.
बोरगाव येथे राहणार्या या दाम्पत्याकडे ९ एकर शेती आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगड भागात राज्य शासनाच्या कृषि विभागाने आवळा व त्याचे उपपदार्थ यासंदर्भाने अभ्यास दौरा आयोजित केला होता. त्यामध्ये सय्यद खुर्शीद यांच्यासह ५० शेतकरी सहभागी झाले होते. दहा दिवसांच्या या अभ्यास दौर्यात आवळा उत्पादनाचे तंत्र व प्रक्रिया उद्योगाची माहिती मिळाली. व्यावसायिक शेतीच्या वाटचालीत आवळा हे फायद्याचे पीक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दौर्यावरुन परतल्यानंतर सैय्यद खुर्शीद यांनी अनिसा कौसर यांना त्यासंदर्भात माहिती दिली.
त्यानंतर या दाम्पत्याने आवळा शेती व प्रक्रिया उद्योगाची वाट धरण्याचा निर्धार घेतला. सन २००० मध्ये राज्य शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत त्यांनी पाच एकर श्रेत्रावर सात बाय सात मीटर अंतरावर सुमारे ४०० झाडे लावली. यातील ३०० झाडे वाचली. हा आवळा खुल्या बाजारपेठेत न विकता त्यावर प्रक्रिया करुन ते उत्पादन बाजारपेठेत विकण्याचा मनोदय सय्यद खुर्शीद यांनी व्यक्त केला. त्यांची पत्नी अनिसा कौसर यांनी त्यांची साथ दिली.
त्यांनी कौसर ऍग्रो महिला गृह उद्योग स्थापन केला. या उद्योगांतर्गत स्वत:च्या तंत्रज्ञानाने आवळा लाडवाची निर्मिती केली. यासोबतच सुपारी, कॅन्डी, सरबत, केशतेल आदी पदार्थ त्यांनी तयार केले. आपले उत्पादन कमिशन तत्त्वावर इतरांना न देता स्वत: कृषि प्रदर्शनी, भागवत सप्ताह यात्रांमध्ये याची विक्री करतात.
या विक्री व्यवसायास दरवर्षी कुरणखेड येथील चंडिका देवी संस्थान येथील नवरात्रौत्सवापासून सुरुवात केली जाते. सद्या जनतेत आरोग्यदायी आवळ्याबाबत जनजागृती वाढल्याने त्यांच्या या उत्पादनास चांगली मागणी आहे. मॉल किंवा दुकानामध्ये उत्पादन विक्रीस ठेवल्यास संबंधित व्यवसायिकाला २० टक्के कमिशन द्यावे लागते. त्याचबरोबर ४ टक्के जकात कर, आवळा लाडूच्या पॉकिंगकरिता लागणारे आकर्षक डब्बे, कागदी कटोरा, याकरिता २ रुपये ७० पैसे, कॅन्डीच्या पॉकिंगकरिता ७० पैसे, आवळा सुपारी ७० पैसे असा खर्च येतो.
ऑक्टोबर ते जानेवारी हा आवळ्याचा सिजन असून या कालावधीत आवळ्याचे पदार्थ तयार करण्यात येतात. याकरिता या परिसरातील सहा महिला व दोन पुरुषांनाही या दाम्पत्याच्या कल्पकतेमुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. परिसरातील शेतकरीही आता या दाम्पत्याचा आदर्श घेऊन आपला व्यवसाय थाटण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
'महान्यूज'मधील मजकूर.
No comments:
Post a Comment