शासकीय कर्मचार्यांविषयी क्वचितच चांगले बोलले जाते. तथापि प्रेरणा देणार्या अधिकार्यांमुळे कर्मचारी समाजापुढे चांगला आदर्श निर्माण करु शकतात. परभणी जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचार्यांनी वनराई बंधार्याच्या माध्यमातून हा आदर्श निर्माण केला आहे.
वनराई बंधारे, शेततळे अधिकाधिक संख्येने घेण्याची जिल्हा परिषदेची योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचार्यांनीही आता पुढाकार घेतला आहे. त्यातूनच एकाच दिवशी श्रमदानातून तब्बल २५ वनराई बंधारे बांधून पाणी अडविण्यात आले. तालुक्यातील भूजल पातळीत वाढ व्हावी व पर्यावरणाचा समतोल राखला जावा या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. वळवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांनी जिल्हा परिषदेतील विविध कर्मचारी संघटनांतील पदाधिकार्यांसमवेत एक बैठक आयोजित केली. त्यामध्ये पाणी पातळी वाढविण्यासाठी वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनानुसार जिल्हा परिषदेतील ५०० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचार्यांनी १० वेगवेगळे पथक तयार केले.
परभणी तालुक्यातील लोहगाव, सिंगणापूर, बाभळगांव, पेगरगव्हाण, पान्हेरा, अमडापूर, साळापूरी, कोटंबवाडी, उजळंबा, तामसवाडी आणि शिर्शी (खुर्द) आदी गावांतील २५ ठिकाणी पाणी अडवा-पाणी जिरवा या संकल्पनेतून वनराई बंधारे बांधले. विशेष म्हणजे अधिकारी आणि कर्मचार्यांनी स्वखर्चातून जवळपास साडेतीन हजार पोती विकत घेऊन वनराई बंधारे बांधले.
गावातील नागरिक आणि शेतकरी वनराई बंधारे बांधण्याकडे दुर्लक्ष करतात. नागरिकांना या बंधार्याचे महत्व पटवून देण्यासाठी जिल्हा परिषदेतील या अधिकारी व कर्मचार्यांनी स्वत:हून हे बंधारे उभारले. विशेष म्हणजे, यापुढेही श्रमदानातून बंधारे बांधण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. वळवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, अशोक सिरसे आदींसह ५०० कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.
'महान्यूज'मधील मजकूर.
No comments:
Post a Comment