महिला आर्थिक विकास महामंडळ व कृषी विभागाच्या अभियानातून महिला बचत गटाचा संयुक्त सेंद्रिय भात प्रकल्प चंद्रपूर जिल्हयाच्या तीन तालुक्यात घेण्यात आला. पोंभूर्णा, चंद्रपूर आणि गोंडपिपरी या तालुक्यातील १८ गावाच्या महिलांनी७२५ महिलांकडून ११०० एकरावर सेंद्रिय भात प्रकल्प राबविला. या गटाने उत्पादित केलेल्या धानाची नागपूरच्या कीटनाशक उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळेत तपासणी केली असता एमआरएलच्या निकषानुसार भाताचे सर्व नमुने पात्र ठरले आहे.
या प्रकल्पासाठी निवड करण्यात आलेल्या बचत गटातील महिलांना सुधारित व सेंद्रिय पध्दतीने भात लागवडीचे पूर्व हंगामी प्रशिक्षण चंद्रपूर येथील तालुका फळ रोपवाटिकेत देण्यात आले त्यामध्ये सेंद्रिय भात लागवडीसाठी माती परीक्षण, सेंद्रिय खताचा वापर, रोपवाटिका तयार करणे व सुधारित श्री पध्दतीने. भात पिकाची लागवड या प्रशिक्षणाचा समावेश आहे प्रत्यक्ष कार्यानुभव यावा म्हणून शेती शाळेच्या माध्यमातून प्रती आठवडा एक दिवस याप्रमाणे कृषी खात्याने क्षेत्रीय स्तरावर प्रशिक्षणही दिले. राज्यभरातील १०० बचतगट सहभागी झाले आहे
सेंद्रिय पध्दतीने लागवडीच्या खर्चात ५० टक्के बचत झाली. रासायनिक खते वापरल्याशिवाय अपेक्षित उत्पादन मिळत नाही असा शेतकर्यांचा समज महिलांनी दूर केला. सेंद्रिय पध्दतीने पिकाचे नियोजन करता येते. पिकास आवश्यक असणारी मूल द्रव्ये दिल्यास उत्पादनात घट न येता मालाची प्रत चांगली टिकून राहते व पिकाचे अधिक उत्पादन घेता येते.
सेंद्रिय शेतीमुळै किमान ५० ते ६० टक्क्यापर्यंत रासायनिक खताची बचत करुन शेती अधिक किफायतशीरपणे करता येऊ शकते. हे या महिलांनी सिद्ध करुन दाखविले. प्रति हेक्टरी २५ ते ३० क्विंटल भाताचे उत्पादन झाले. यातून ५ हजार क्विंटल सेंद्रिय भात उपलब्ध झाला आहे. उत्पादित मालाची दहा गावातील रॅन्डम पद्धतीने सॅम्पल काढून नागपूर येथील कीटनाशक उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळेकडे पाठविली. हे सर्व नमुने पात्र ठरले. त्यासाठी ३२ कीटकनाशकाची त्यावर चाचणी घेण्यात आली आहे त्या सर्व चाचणीतून उत्पादित झालेला माल निकषात पात्र ठरला आहे.
हा उत्पादित माल आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा उपयुक्त आहे. जिल्हयात प्रथमच अशा स्वरुपाचा प्रकल्प महिला बचत गटामार्फत चांगल्या प्रकारे राबविण्यात आल्यामुळे जिल्हयातील मूल, सावली, सिंदेवाही, चिमूर, भद्रावती या भात पट्टयातील तालुक्यातील शेतकरी महिला बचत गटांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे.
यावर्षी किमान ४ हजार महिला पुढे येतील असे चित्र आता दिसत आहे. त्या सर्वांचे प्रशिक्षण क्षेत्रीय स्तरावर व चंद्रपूर येथील रोपवाटिकेवर जानेवारी २०११ अखेर आयोजित करण्यात येणर आहे. या कार्यक्रमासाठही सहभागी महिलांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहिमेंतर्गत ५० टक्के अनुदानावर अवजारे व प्रचलित अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात कडधान्य विकास कार्यक्रम, पपई लागवड, हरितगृह शेती, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय यासारख्या आदी क्षेत्रातही संयुक्त शेतीसाठी महिला पुढे येत आहेत.तसेच शेतकरी महिला बचत गटांनी पुढाकार घेतलेला आहे.
'महान्यूज.
No comments:
Post a Comment