कर्जबाजारीपणा व नापिकीला न घाबरता कोरडवाहू शेतात फळबाग घेता येते, हे विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांनी दाखवून दिले आहे. अकोला जिल्ह्याच्या आगर येथील अरुण कराळे या शेतकर्याने याशिवाय सौरकुंपणाचा प्रयोगही यशस्वी केला आहे.
अरुण कराळे यांच्याकडे अकोल्यापासून १६ किलोमीटरवरील आगर येथे ३५ एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांचे शेत मोर्णा नदीच्या किनार्याजवळ आहे. कोरडवाहू शेतात होणार्या अल्प उत्पादनामुळे ते संतुष्ट नव्हते. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या अरुण कराळे यांनी खारपाणपट्टय़ात फळशेती करावी, ही संकल्पना मूर्त स्वरुपात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
आय.डी.बी.आय बँकेतून त्यांनी ३० लाख रुपये कर्ज घेतले. ३५ एकर शेतातील मातीचे परीक्षण करुन जमिनीत सच्छिद्र-पाईप टाकून त्यातील क्षार पाईपद्वारे नदीत काढले. जमीन निक्षारीकरणासाठी मोठय़ा प्रमाणात प्रयत्न केले. त्यासाठी तीन लाख रुपये खर्च आला आहे. शेतात सौर कुंपण उभारण्यात आले आहे. यामुळे प्राण्यांचा फळपिकांना असलेला धोका टळला.
त्यांनी शेतात बोअरवेल खोदले. कर्ज योजनेपासून मिळालेल्या पैशांत ६० बाय ६० मीटरचे शेततळे बांधले. बोअरवेल व तलावाच्या पाण्यातून २० एकर शेतात फळबागेची लागवड केली. यामध्ये लिंबू, सीताफळ, पपई आदींची देखील लागवड करणे सुरु आहे. विशेष म्हणजे ते सेंद्रिय शेती करीत असून याच शेतात सेंद्रिय कंपोस्ट खत तयार करण्याचा प्रयोग करणार आहेत.
डॉ. देशमुख कृषी विद्यापीठात माती परीक्षण, बोअरवेल पाणी परीक्षण, जमिनीत असणारे क्षाराचे परीक्षण सुरु आहे. ३५ एकर फळबागेला ठिबक सिंचनाची पध्दत वापरली आहे. सौर कुंपणाचा प्रयोग आगर येथे यशस्वी झाल्यामुळे अरुण कराळे यांना अनेक शेतकर्यांनी मार्गदर्शन मागितले आहे.
पुणे येथे झालेल्या कृषी प्रदर्शनात त्यांनी असंख्य शेतकर्यांना जमीन निक्षारीकरणाबाबत मार्गदर्शन केले. शेतात घरासह गोदाम उभारले असून एका ठिकाणाहून संपूर्ण शेत दिसेल, अशी खोली उभारली आहे. शेतात काम करण्यासाठी तीन कुटुंबांचे वास्तव्य आहे. त्यामुळे त्यांना रोजगार मिळाला आहे.
No comments:
Post a Comment