Sunday, January 30, 2011

कृषितंत्राने साधली कर्जमुक्ती...

नांदेड तालुक्यातील चिमेगाव अवघ्या सहाशे लोकवस्तीचं गाव. आसना नदीच्या तटावर असलेल्या या गावात गेल्यावर गावात प्रगतीचे वारे वाहत असल्याचं चटकन लक्षात येतं. मुख्य रस्त्यावरून जाताना डावीकडील झाडाला लावलेली पाटी आपलं लक्ष वेधून घेते. पाटीवर 'पाणी हेच जीवन' अशा शीर्षकाखाली कविता दिलेली आहे. 'शेतकरी दादा तुम्ही ऐका जरा, जलसंपत्तीचे तुम्ही रक्षण करा, वनसंपत्तीची सर्वांनी लावली वाट, म्हणून पर्यावरणाने फिरविली आपल्याकडे पाठ' अशा जलसंधारणाचं महत्त्व सांगणार्‍या कवितेच्या ओळीखाली कवीचं नाव लिहिलेलं आहे-पंजाबराव पाटील चिमेगावकर....नजर जाईल तिथपर्यंत शेती दिसते. दोन पावलं पुढे गेल्यावर सागाच्या झाडावर विविध पक्ष्यांची रंगीत छायाचित्रं दिसतात. बाजूला शेडनेड, पॉलिहाऊस, विहिरीवर पंप बसविलेला, उजविकडे पॅक हाऊसचा बोर्ड..... एवढय़ाशा गावातील ही कृषी क्रांती बघून आश्चर्य वाटतं. या यशाचे शिल्पकार आहेत पंजाबराव आणि त्यांचे बंधु नागोराव पाटील(आढाव) चिमेगावकर...

सहा-सात वर्षापूर्वी ९० एकर शेतीचे मालक असलेल्या या कुटुंबावर बँकेचे कर्ज कसे फेडावे ही मोठी समस्या होती. आजचं ऐश्वर्य पाहिल्यावर यावर सहजपणे विश्वास बसत नाही. २००४ मध्ये कृषि विभागाच्या सहकार्याने पुष्पोत्पादन योजने अंतर्गत झेंडूचा प्लॉट या दोघांनी शेतात घेतला आणि त्या दिवसापासून या कुटूंबाने मागे वळून पाहिले नाही. या प्लॉटमध्ये त्यांना २० हजार रुपयांचा फायदा झाला. सोबतच शेती सहलीच्या माध्यमातून कृषि विभागाच्या नवीन योजना, शेतीतील नवे तंत्रज्ञान, फायदेशीर शेतीचे तंत्र आदींची माहिती मिळाल्यावर हे सर्व आपल्या शेतात आणण्याचे प्रयत्न पंजाबरावांनी सुरु केले.

अशातच कृषि विभागाने राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यात तळेगावचे तज्ज्ञ आणि बँकर्स उपस्थित होते. 'बँकेने आमच्यासारख्या कर्जबाजारी शेतकर्‍यावर विश्वास ठेवून नव्या तंत्रज्ञानासाठी पुन्हा कर्ज दिल्यानेच हे यश मिळू शकले' या शब्दांत नागोराव खुल्या दिलाने बँकेला धन्यवाद देतात. या कर्जातून त्यांनी पॉलिहाऊस उभे केले. कृषि विभागामार्फत सव्वा तीन लाख रुपयाचे अनुदान मिळाले. एका वर्षात जरबेराच्या उत्पादनातून साडेसहा लाखाचं उत्पन्न होऊ लागलं. वर्षाकाठचा खर्च होता फक्त दीड लाख रुपये. होणार्‍या फायद्यातून दुसरे पॉलिहाऊस उभारण्यात आलं...आणि ही प्रगतीची पाऊलं पुढे पडत गेली. आज या शेतातली फुलं दिल्ली, हैदराबाद, मुंबई आदी महानगरात जात आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कर्जाची परतफेड वेळेवर होत आहे.

आज या शेतात दोन शेडनेटही आहेत. सव्वा तीन लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला कृषि विभागाने १.३६ लाख रुपये अनुदान दिले आहे. दहा गुंठे क्षेत्रातील या शेडनेटमध्ये सिमला मिरचीची साडेतीन हजार रोपे लावली आहेत. प्रत्येक रोपाला साधारण तीन किलोप्रमाणे चार लाखापेक्षा अधिक उत्पन्नाची अपेक्षा या प्लॉटपासून आहे. दुसर्‍या शेडनेटमध्येदेखील नुकतीच रोपे लावली आहेत. इतर शेतजमिनीवर सोयाबीन, कापूस, भाजीपाला आदी उत्पादन घेतले जाते. या उत्पादनातून शेतीवरील खर्च भागतो. खरे उत्पन्न मिळते ते पॉलिहाऊसच्या माध्यमातून, असे नागोराव आवर्जुन सांगतात.

कृषि विभागाच्या सहकार्याने राष्ट्रीय फलोत्पादन योजने अंतर्गत शेताच्या बाजूला पॅक हाऊस उभारण्यात आले आहे. त्यासाठी शासनाकडून ६२ हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. या पॅक हाऊसमध्ये शास्त्रीय पध्दतीने फुले आणि इतर कृषि उत्पादनांचे पॉकिंग करण्यात येते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने पंजाबरावांनी शेतात श्रमदानातून शेततळ्याची निर्मिती केली आहे. फुलझाडांना पाणी दिल्यानंतर अतिरिक्त झालेले पाणी जमिनीतून झिरपून विहिरीचे पुनर्भरण करण्याचे तंत्र विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे विहीर पूर्णत: भरलेली आहे. फुलझाडांना पाणी देताना त्यातील क्षार बाजूला काढण्यासाठी शेतात एक लाख खर्च करून आरओ वॉटर प्लँट बसविण्यात आला आहे. त्यामुळे जमीन क्षारीय न होता रोपांची वाढ जोमाने होते.

शेतीमध्ये एवढी प्रगती करूनही या चिमेगावकर कुटुंबाला नाविन्याचा ध्यास आहे. शेतीतील नवे तंत्र आत्मसात करण्यासाठी नव्या ठिकाणी भेट देणे, अधिकारी आणि प्रगतीशील शेतकर्‍यांशी चर्चा करणे, शेतीत नवे प्रयोग करणे आदी बाबींवर यांचा सातत्याने भर असतो. स्वत:बरोबर गावाचा विकास व्हावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून स्वत:च्या शेतात मार्गदर्शन शिबीर भरविणे त्यांना आवडते. त्यासाठी शेतालगतच लहानसे सभागृह तयार करण्यात आले आहे. नवे तंत्र स्विकारले तर शेती फायदेशीर ठरू शकते हा संदेश देणारी ही प्रगतीशील शेतकरी भावंडांची जोडी गावासाठी अभिमानाचा विषय ठरली आहे.

'महान्यूज'

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद