चंद्रपूर जिल्हा हा सीमेलगतचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात खनिज संपत्तीचा भरपूर साठा आहे. त्यामुळेच जिल्ह्यात चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, बल्लारपूर, राजूरा या तालुक्यात काळे सोने असलेल्या कोळशाच्या खाणी सुरु झाल्या आहेत. जिल्ह्यातील जमिनीतील खनीज मोठय़ा प्रमाणात उपसले जात आहे. काही शेतकरी अशाच प्रकारच्या जमिनीतून पीक घेत आहेत. त्यासाठी त्यांना पाण्याच्या नियोजनाबरोबरच वेगवेगळे प्रयोग करावे लागत आहेत. भद्रावती तालुक्यातील विजांसन या टेकडीलगतच्या गावातील प्रयोगशील शेतकरी सुधीर सातपुते यांनी शेतात बोर खोदून सिंचनाची सुविधा निर्माण केली आहे.
शेतीत नुकसान न होता शेती फायदेशीर व्हावी या दृष्टीने त्यांनी आपल्या शेतात हळद लावण्यास सुरुवात केली. भद्रावती, वरोरा, चिमूर तालुक्यातील काही शेतकरी पारंपरिक नैसर्गिक पध्दतीने हळदीची लागवड करतात. यात कोळी समाजातील व्यक्ती लागवडीत पुढाकार घेतात. मात्र या पारंपरिक पध्दतीला छेद देऊन कृषीशास्त्रात एम.एस.सी झालेल्या सातपुते यांनी नोकरी शोधण्यापेक्षा वडिलोपार्जित उत्कृष्ट शेती करावयाचे ठरवले. त्यानुसार त्यांनी आपली शेती तुषार सिंचन पध्दतीने करायला सुरुवात केली. केवळ भाजीपाल्याचे उत्पन्न न घेता इतरही पीके चांगल्या प्रकारे घेतली.
दररोजच्या खाण्याचे तसेच जखम, व्रण, त्वचारोग, खोकला, विंचुदंश, कोड यासारख्या औषधी गुणधर्माचे हळद आणि अद्रक पिकाचे तुषार सिंचन पध्दतीने उत्पन्न घेणारा सातपुते एकमेव शेतकरी ठरले. या पिकाचे हमखास उत्पन्न मिळते. दुसर्या वर्षापासून बियाणाचा खर्च, रानटी जनावरांचा त्रास या पिकांना होत नाही.
हळद पिकाबद्दल श्री. सातपुते म्हणाले, हे पिक जंतूनाशक, दुर्गंधीहारक, विषहारक असे आहे. पूर्वी सात-आठ वर्षापासून थोडय़ाफार जागेत परंपरागत हळद पिक घेत होतो. मागील चार वर्षापासून सव्वाचार एकरात हळदीचे पीक घेत आहे. पूर्वी ३० ते ४० क्विंटल हळद मिळत होती. यावर्षी ठिबकसिंचन पध्दतीमुळे एकरी दोन तास पाणी देतो. त्यामुळे अंदाजे १०० क्विंटल उत्पादन होईल. त्याची किंमत १० लक्ष रुपये पर्यंत राहील. या पिकासाठी ढेंचापासून तयार केलेले हिरवळीचे खत दिले. तसेच शेणखतही दिले. मजूरी, फवारणी यासाठी खर्च येतो, मात्र त्यामुळे पिकाचे उत्पन्न दुप्पटीने वाढले आहे. प्रक्रिया करुन हळद तयार केली जाते.
हळद पिकाप्रमाणेच सातपुते यांनी पाऊन एकरात कन्नड तालुका (औरंगाबाद) येथील माहिम जातीच्या अद्रक पिकाची लागवड केली. या पिकास अतिपाऊस, वादळाचा धोका नाही. तसेच जंगली जनावराचा सुध्दा त्रास नाही. या पिकासही लागवड खर्च जास्त वाटत असला तरी एका एकरातून एका वर्षास दिड ते दोन लाख रुपये हमखास फायदा मिळतो. सद्या पिकाच्या वाढीवरुन ९० ते १०० क्विंटल केवळ पाऊन एकरात अद्रक होईल असा विश्वास सातपुते यांनी व्यक्त केला. या अद्रक पिकाची ५ जूनला लागवड केली आज हे पीक सहा महिन्याचे झाले आहे. ठिंबकसिंचन पध्दतीमुळे पाण्याचा योग्य वापर आवश्यक त्या प्रमाणात होत असल्यामुळे या पिकाचेही दुप्पट उत्पन्न मिळू लागले आहे. हे पीक १० महिन्यांत काढावेच लागते. परंतु अधिक किंमतीच्या दृष्टीने आणखी पाच सात महिने जास्तीचे ठेवले तरी आपलाच फायदा होतो, असेही त्यांनी सांगितले.
अद्रक पिक घेण्याचे सातपूते यांचे हे पहिलेच वर्ष आहे. हळीद पिकापेक्षा या पिकास प्रक्रिया खर्च अत्यल्प आहे. अद्रक पिकास सद्या ७ हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव आहे. त्यामुळे यापासून एकरी ४ ते ५ लक्ष रुपयापर्यंतचे उत्पन्न मिळू शकते. मशागत हळदीसारखीच असून किड, रोगासाठी यावर फवारणी करावी लागते.
भद्रावती तालुक्यात कुठल्या मोठय़ा तलावाचे किंवा नहराच्या पाण्याचा वापर शेतीसाठी होत नाही. अशा स्थितीत श्री. सातपुते यांचे शेतीतील प्रयोग हा या भागासाठी अनोखाच ठरला आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग आजूबाजूच्या शेतकर्यांना व्हावा, त्यांच्यातही प्रेरणा निर्माण व्हावी यादृष्टीने ते भेट देणार्यांना योग्य माहिती देतात. तसेच चांगल्या प्रकारे समजावून सांगतात. याबरोबरच ते भाजीपाला लागवड करतात आणि अधिक उत्पन्न देणारी इतर पीके सुध्दा घेतात.
शेतकर्यांनी ओलिताची शेती करावी, भाजीपाला लागवड करुन उत्पन्न वाढवावे आणि शेतीबद्दलचे नैराश्य दूर करावे असे श्री. सातपुते सांगतात. इतर शेतकर्यांनीही आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करुन फायद्याची शेती करावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
महान्यूज'मधील मजकूर.
No comments:
Post a Comment