विदर्भातील कोरडवाहू शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी पाच वर्षात सिंचनाच्या सुविधेमध्ये वाढ करण्यासोबतच कापूस प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी दहा हजार कोटी रुपये खर्चाचा विशेष आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही श्री.चव्हाण यांनी सांगितले.
शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११३ व्या जयंती उत्सवानिमित्त अमरावती येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यक्रम तयार करताना डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या शेतीविषयक विचारांचाही यात समावेश करुन हा कार्यक्रम अमरावती विभागात प्रभावीपणे राबविण्यात येईल, असेही ते म्हणाले.