Showing posts with label बटाटा. Show all posts
Showing posts with label बटाटा. Show all posts

Wednesday, May 23, 2012

बटाट्याचे एकरी १३० क्विंटल उत्पादन


वाशिम जिल्ह्यातील शेजूबाजार पासून जवळच असलेल्या तपोवन गावातील शेतकरी बंडूजी किसन येवले यांनी आपल्या शेतामध्ये बटाट्याचे एकरी १३० क्विंटल उत्पादन घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या पिकास मुंबई-पुण्यामध्ये बटाटा असे नाव आहे. मात्र विदर्भात आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये हे पीक आलू याच नावाने लोकप्रिय आहे. श्री. येवले यांच्याकडे एकूण १५ एकर शेती असून त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन सर्व शेती सिंचनाखाली आणली आहे. विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी असल्याने त्यांनी आपल्या शेतामध्ये कांदा, हरभरा, लसूण आदी पिके घेतली आहेत. बटाटा पिकाचे उत्पादन चांगले मिळू शकते याविषयी त्यांनी बरेच ऐकले होते. त्याविषयी त्यांच्या मनात उत्सुकता होती. यासाठी त्यांनी बटाटा या पिकाविषयी सर्व माहिती गोळा केली. आपल्या शेतात हे पीक घेणे शक्य आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी बटाट्याचे उत्पादन घेण्याचे ठरविले. 

Saturday, September 24, 2011

आंतरपिकाने फुलविला शेतमळा


शेतीला लळा लावल्याशिवाय शेतमळा पिकत नाही असे म्हणतात. ही बाब सत्यात उतरवून दाखविली आहे यवतमाळ जिल्ह्यातील मुळावा येथील प्रयोगशील शेतकरी अमोल विजय डुब्बेवार यांनी. जिद्द आणि चिकाटीला श्रमाची जोड देऊन डुब्बेवार यांनी उसात बटाट्याचे आंतरपिक घेउन तीन महिन्यात एकरी ६२ हजार रुपयांचा नफा मिळविला आहे. त्यांच्याकडे ११ एकर जमीन आहे. माळरानाजवळ असलेली त्यांची जमीन प्रथम त्यांनी सपाटीकरण केली व त्यानंतर पाण्याची व्यवस्था करुन घेतली. या शेतीमध्ये ते दरवर्षी वेगवेगळी पिके घेतात.

Tuesday, March 22, 2011

विदर्भात रुजतेय बटाटय़ाची शेती.


शेतीतील खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही, म्हणून शेती फायद्याची नाही, असे म्हणून शेती करायचीच नाही असा नकारात्मकतेचा सूर सतत कानी पडत असतो. मात्र त्याच शेतीतून शेतकरी लखपती होऊ शकतो याचा आदर्श शेतकर्‍यांच्या आत्महत्येमुळे चर्चेत आलेल्या विदर्भातील शेतकर्‍यांसमोर ठेवला आहे.

पारंपरिक शेतीला विश्वनाथ गवई यांनी बटाटा, लसूण, अद्रक आणि हरितगृहात ढोबळ्या मिरचीचे भरघोस उत्पादन घेत कधीकाळी हजाराच्या घरात उत्पन्न देणार्‍या शेतीतून लाखोची कमाई केली आहे. अशा या कल्पक आणि हायटेक शेतकर्‍याची यशोगाथा विदर्भातील इतर शेतकर्‍यांना नवी प्रेरणा देणारी आहे. 

अकोला शहरापासून १८ कि. मी. अंतरावर असलेल्या कापशी तलाव या गावामध्ये विश्वनाथ वासुदेव गवई हे आपल्या आई व भावाच्या मदतीने शेती करतात. तीन भावांचे एकत्र कुटुंब असून एकनाथ गवई शासकीय सेवेत आहेत. विश्वनाथ यांचे शिक्षण १२ वी पर्यंत, तर दुसरा भाऊ प्रकाशचे शिक्षण बी.ए. पर्यंत
झाले आहे. गवई कुटुंबाकडे २२ एकर शेती आहे. सुरुवातीला आई वडिलांनी शेतमजुरी करुन १२ एकर शेती विकत घेतली व मुलांचे शिक्षण पूर्ण केले. तीन भावांच्या एकत्रित कुटुंबाने शेतीच्या भरवशावर पुन्हा १० एकर शेती विकत घेतली. पूर्वी एका विहिरीवर बागाईत शेती करुन २ एकरांमध्ये भाजीपाला लागवड केली जात असे. वडील वासुदेव गवई हे स्वत: शेजारील गावामध्ये आठवडी बाजारात भाजीपाला विक्री करायचे.
वडिलांच्या निधनानंतर शेतीची संपूर्ण जबाबदारी विश्वनाथ यांच्या खांद्यावर आली. विश्वनाथ गवई यांनी कृषी विभागाच्या रोजगार हमी योजनेतून ८ एकर आवळा लागवड केली असून, आवळ्याची बाग आता ६ वर्षांची झाली असून उत्पादन चालू झाले आहे. आवळा पिकामध्ये आंतरपीक म्हणून सीताफळाच्या ५०० झाडांची लागवड करण्यात आली असून २०१० पासून उत्पादन येण्यास सुरुवात झाली आहे. आवळ्यापासून आवळा लाडू, कॅन्डी, ज्युस असा प्रक्रिया उद्योग उभा करण्याचा गवई यांचा प्रयत्न आहे.
आपली शेती अधिक उत्पादनक्षम होण्यासाठी पाण्याची, सिंचनाची सोय होणे फार गरजेचे आहे. त्याशिवाय आपली प्रगती होणार नाही हे हेरुन विश्वनाथ यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दरवर्षी १ याप्रमाणे ३ बोअरवेल खोदल्या. ठिबक सिंचनाच्या मदतीने संपूर्ण २२ एकर क्षेत्र ओलिताखाली आणले आहे. उन्हाळ्यामध्ये सिंचनाची सोय व्हावी यासाठी त्यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून सामूहिक शेततळे घेतले आहे. त्यामुळे बोअरवेलचे पाणी शेततळ्यात साठवून ते पाणी ठिबक सिंचनाद्वारे फळशेती, कपाशी व भाजीपाला पिकांना देण्यात येत आहे. कृषि अधिकारी अजय पराते यांचे आपल्याला मार्गदर्शन मिळते, असे विश्वनाथ गवई सांगतात.
गवई यांनी तीन एकर क्षेत्रावर तैवान पपईच्या शेतीतून चांगले उत्पादन घेतले. उत्पादन खर्च कमीत कमी येण्यासाठी गांडुळखत, कंपोस्टखत, हिरवळीच्या खतांचा वापर केला. फवारणीसाठी त्यांनी गोमूत्र, दूध, बाजरीपावडर इत्यादीचा वापर करुन कीटकनाशके व बुरशीनाशकांचा खर्च कमी करण्यात यश मिळवले आहे. एकरी १ लाखापर्यंत उत्पन्न त्यांनी घेतले आहे. २० गुंठे क्षेत्रावर शेडनेट हाऊसची उभारणी केली असून त्यामध्ये ते ढोबळी मिरची हे प्रमुख पीक घेतात. ढोबळी मिरचीशिवाय काकडी, कोथिंबीर यासारखी हंगामी पीके त्यांनी यशस्वीपणे घेतली आहेत. दोन वर्षांपासून कारले या पिकाची एक एकर शेतीवर लागवड केली आहे. गांडुळखत, कंपोस्ट खत यासोबत निंबोळी अर्क अशा सेंद्रिय पध्दतीने उत्पादन खर्च कमी करुन एकरी ३५ ते ४० टन कारल्याचे उत्पादन घेतले जात आहे.
विदर्भातील शेतीत अशक्य वाटणार्‍या बटाटा पिकाची लागवड करुन त्यांनी ६० क्विंटल बटाटय़ाचे उत्पादन मिळवले आहे. एकरी ८० ते ९० क्विंटल उत्पादन त्यांनी यापूर्वी घेतले आहे. अवकाळी पाऊस व खराब वातावरणामुळे बटाटा पिकाचे उत्पादन कमी मिळाले आहे. सरासरी तीन महिन्याचे पिक असल्यामुळे बटाटा पिकाची लागवड रब्बी हंगामातही घेता येते. बटाटा पिकासोबत अद्रक, लसूण या पिकांचाही त्यांनी यशस्वी प्रयोग केला आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायही ते करतात. सामूहिक शेततळ्यात मत्स्यउत्पादन करीत त्यांनी मागील वर्षी २० हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. यावर्षी मत्स्यविक्रीतून ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कमी खर्चात जास्त नफा या महामंत्राचा उपयोग करुन इतर शेतकर्‍यांना विश्वनाथ गवई मार्गदर्शन करीत असतात. शेती फायद्याची नाही म्हणून शेतीकडे दुर्लक्ष करणार्‍या शेतकर्‍यांना गवई यांची प्रयोगशील शेती नवी दिशा देणारी ठरत आहे.



Popular Keywords

अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आंबा आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कांदा कात कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद “पिवळी क्रांती