दैनंदिन पर्जन्यमानाची मोजणी ही अत्यंत क्लिष्ट व वेळखाऊ प्रक्रिया आहे. या प्रक्रियेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ व वेळही अधिक लागतो आणि चूकाही होऊ शकतात. मानवी चुका व वेळ वाचविण्यासाठी महा-रेन या संकेतस्थळाची निर्मिती ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ए.एल.ज-हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मॅग्नम ओपस यांच्या तांत्रिक सहकार्याने करण्यात आली आहे. या संकेतस्थळाच्या नाविण्यपूर्ण निर्मितीमध्ये ठाणे जिल्हयाने राज्यात प्रथम मान मिळविला आहे.
पावसाच्या आकडेवारीचा उपयोग विविध योजना राबविण्यासाठी, सांख्यिकीय माहितीसाठी तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या धोरण अंमलबजावणीसाठी केला जातो. कृषि आणि तत्सम क्षेत्रासाठी जेथे पीक पध्दती पावसावर अवलंबून आहे तेथे ही आकडेवारी अत्यंत उपयुक्त ठरते. म्हणून पर्जन्यमानाची आकडेवारी अचूक असणे आवश्यक आहे. यावर उपाय योजना करण्याच्या उद्देशाने नवीन संकेतस्थळ निर्मितीची संकल्पना पुढे आली आणि ती साकारही झाली. संकेतस्थळाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात नुकताच करण्यात आला.