वल्हव रे नाखवा म्हणत समुद्रात खोलवर शिरण्यासाठी असणारे जिगर मच्छिमार बांधवांकडे असते. आम्ही डोलकर म्हणणारे हे दर्याचे राजेच जणू! आपला जीव धोक्यात घालण्याचे धाडस मच्छिमारांच्या रक्तात असते. पण, कधी कधी हे धाडस त्यांच्या जीवावर बेतू शकते. आता असे एक यंत्र आले आहे की ज्याच्यामुळे मच्छिमार बांधवांना धोक्याची सूचना देता येऊ शकते. . डिस्ट्रेस अलर्ट ट्रान्समीटर म्हणजेच दॅट असे या उपकरणाचे नाव आहे.
ठाणे जिल्ह्यातील डहाणू व इतर काही तालुक्यातील मच्छिमारांना दॅट हे उपकरण विनामूल्य मिळणार आहे. या उपकरणामुळे मच्छिमारांना खोल समुद्रात आपत्कालीन स्थितीची माहिती मिळेल. यामुळे मासे पकडताना होणाऱ्या दुर्घटनेतून ते वाचू शकतात. याची निर्मिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( इस्त्रो ) ने भारतीय तटरक्षकांसोबत मिळून केली आहे.
देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दॅट हे उपकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. समुद्रात अनोळखी किंवा अतिरेकी नौका दिसल्यास, बोटीत आग लागणे, बोट बुडत असल्यास त्याची माहिती यंत्राचे बटण दाबून देता येईल. तसेच, कोणी आजारी पडल्यास किंवा बोटीत असलेले कामगार समुद्रात पडणे किंवा तुफान वादळात बोट सापडने आदी वेगवेगळ्या धोक्यांची सूचना या यंत्राचे बटण दाबून देता येते. प्रत्येक आपत्तीकालीन स्थितीच्या संकेतासाठी वेगवेगळे बटण आहे.