Showing posts with label कृषीतंत्र. Show all posts
Showing posts with label कृषीतंत्र. Show all posts

Saturday, September 3, 2011

प्रयोगशील शेतकरी


पुरंदर तालुक्यातील साकुर्डे हे गाव ! गावातील प्रयोगशील शेतकरी सुरेश सस्ते यांनी स्वत:ची शेती विकसित करताना गावातील अन्य शेतकऱ्यांपर्यंत सुधारित तंत्रज्ञान शेताच्या बांधावर पोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. श्री. सस्ते म्हणतात, २००५ मध्ये पुण्यातील कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञांकडून शेतकरी-शास्त्रज्ञ मंचातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती झाली. शेती सुधारण्यासाठी या मंचाचा सदस्य झालो. त्यातून पीक प्रात्यक्षिके, फळबाग व्यवस्थापन, जल-मृद संधारणाचे उपाय, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी, राहूरीमध्ये शिवारफेरी अशा उपक्रमांतून शेतीतील बदल समजले स्वत:च्या शेतीमध्ये त्यांचे अनुकरण सुरु केले. त्याचवेळी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचेही मार्गदर्शन मिळू लागले.

Saturday, June 25, 2011

महाबळेश्वरची मधशाळा…


अनादी काळापासून मानव मधाचा अन्न आणि औषध म्हणून उपयोग करीत आला आहे. मधाचे विभिन्न गुणधर्म व मधनिर्मितीसाठी आवश्यक नैसर्गिक घटकांचा अभ्यास करून राज्यातील महाबळेश्वर येथे १९४६ मध्ये मुंबई खादी व ग्रामोद्योग समितीने मधपेट्यांमध्ये मधमाशांच्या वसाहती निर्माण करून मधाचे उत्पादन घेण्याचा ग्रामोद्योग सुरू केला. आजमितीस राज्यातील ४९० गावांमध्ये ४ हजार मधपाळ २७ हजार मधपेट्यांतून दरवर्षी सुमारे ७८.५० लाख रुपये इतके उत्पादन घेत आहेत. त्यामध्ये एकट्या महाबळेश्वरचा वाटा ५० टक्के इतका आहे.

महाबळेश्वरची नैसर्गिक रचना पाहिली असता येथील ७० टक्के भाग घनदाट जंगलांनी व्यापला आहे. येथील सर्व नैसर्गिक घटकांचा अभ्यास करून मुंबई खादी ग्रामोद्योग समितीने १९४६ मध्ये राज्यातील पहिले मधुमक्षिका पालन केंद्र सुरू केले. आज महाबळेश्वर तालुक्यामध्ये राज्यात सर्वाधिक सुमारे २ हजार मधपाळ तर मधमाशांच्या १,६०० वसाहती आहेत. येथून दरवर्षी सुमारे २० ते २५ लाख रुपयांपर्यंत मधाचे उत्पादन घेतले जाते. मधमाशा फुलातून मकरंद गोळा करतात. पुढे शरीरातील पाचक रस त्यात मिसळून व मकरंदातील पाण्याचे प्रमाण कमी करून शुध्द मध पोळ्यात साठवितात. एक किलो मधापासून ३ हजार कॅलरीज उष्मांक मिळतात. एक चमचा मधापासून १०० कॅलरीज मिळतात. मधात क्षार, आम्ले, प्रथिने,जीवनसत्वे, प्रथिने आदी मुबलक प्रमाणात असल्याने शरीरातील या घटकांची कमतरता भरून निघते.

मधुमक्षिका पालनाचे फायदे-

मध हे अत्यंत शक्तिदायी असे पौष्टिक अन्न व औषध आहे. मधापासून मेन तयार केले जाते. तसेच सौंदर्य प्रसाधनांमध्ये मधाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. मधमाशांपासून मिळणारे राजान्ने (रॉयल जेली), देश, विष (व्हेमन), पराग (पोलन), रोंगण (प्रोपॉलिन्स) ही सर्व अच्च प्रतीची औषधे आहेत. मधमाशांपासून होणाऱ्या परागीभवनामुळे शेती व फळबागांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळते. तसेच मधमाशांचे संरक्षण व संवर्धन होण्यास मदत मिळते. पर्यावरण समतोल राखून नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्यासाठी मधमाशा पालन व्यवसाय महत्वाचा आहे. मधुमक्षिका पालन एक नमुनेदार ग्रामोद्योग आहे. यासाठी जागा, इमारत, वीज आदींसाठी खर्च येत नाही. संपूर्ण देशी तंत्रज्ञान असून अल्प खर्च व रोजगार निर्मिती करून देणारा हा उद्योग आहे.

मेणबत्ती, मेण पत्रा, दारूगोळा, शाई, चिकट टेप, वंगण, रंग, वॉर्निश, छपाईची शाई, बूट, औषधे, डोळे व त्वचाविकार आणि रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मधाचा उपयोग केला जातो. मधमाशांपासून मिळणारे पराग हे भूक वाढविणे व रक्तदाब कमी करणाऱ्या औषधांमध्ये वापरले जातात. यामध्ये ३५ टक्के पिष्टमय पदार्थ, २० टक्के प्रथिने तर १५ टक्के पाणी व क्षार असतात.

कामकरी मधमाशांच्या डोक्यात असणाऱ्या फॅरिजियल ग्रंथीमधून रॉयल जेली हा पदार्थ स्रवतो. कामकरी व राणी माशांच्या अळ्यांची संपूर्ण वाढ होईपर्यंत हा पदार्थ त्यांना भरविला जातो. रॉयल जेली भूकवर्धक असून यामध्ये १३ टक्के प्रथिने, १० ते १७ टक्के शर्करा, ५ टक्के स्निग्ध पदार्थ, ६५ टक्के पिष्टमय पदार्थ आदी घटक असतात.

अशी होते मधनिर्मिती- 

मधमाशा समुहाने राहतात. एका समुहामध्ये १० ते ३० हजार मधमाशा असतात. त्यामध्ये एक राणीमाशी, कामकरी माशी, नरमाशी यांचा समावेश असतो. या तिन्ही माशा वसाहतीतील प्रमुख घटक आहेत. राणीमाशीचा नराबरोबर हवेत संयोग होतो आणि शुक्रबीज हे राणी माशीच्या पोटात असलेल्या एका विशिष्ट पिशवीत साठवले जाते. त्याचा उपयोग राणीमाशी अंडी घालण्यासाठी करते. संयोग झाल्यानंतर राणीमाशी २४ तासानंतर अंडी देण्यास सुरूवात करते. यामधून कामकरी व नरमाशांचा जन्म होतो. कामकरी व नरमाशा फुलातील पराग व मकरंद गोळा करण्याबरोबरच मधाचे पोळे स्वच्छ करणे, मोठ्या अळ्यांना खाद्यपुरवठा करणे आदी कामे सातत्याने करीत असतात. एका मधपेटीतून वार्षिक सुमारे ६० ते ७० किलो मध मिळतो.

मध उद्योगाच्या विकासाकरिता महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग समितीने विविध योजना राबविल्या आहेत. त्यामध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, पश्चिम घाट विकास कार्यक्रम योजना, पीक उत्पादन वाढीसाठी मधमाशीपालन योजना, मानव विकास मिशन, आत्मा अदिवासी विकास योजना, राष्ट्रीय समविकास योजना या योजनांद्वारे शासन व्यवसायासाठी कर्ज स्वरूपात व कमी व्याजदरात कर्ज स्वरूपात व कमी व्याजदरात अर्थसहाय्य उपलब्ध करून देते. तसेच मधपेट्या, मधयंत्र व लाभार्थींना एक महिन्याचं प्रशिक्षण व विद्यावेतन देखील दिले जाते. 

तलावातील गाळ ठरतोय शेतीसाठी वरदान.



महागड्या रासायनिक खताला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी गेल्या दोन तीन वर्षापासून तलावातील गाळ काढून आपल्या शेतात टाकण्याचा उपक्रम सुरु केला आहे. यामुळे शेती उत्पन्नावर चांगला परिणाम झाल्याने तलावातील गाळ बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे.

दरवर्षी रासायनिक खताचे भाव वाढत चालले आहेत. निर्सगाच्या लहरीपणामुळे शेतामध्ये लागवड करण्यात आलेल्या पिकासाठी शेतकऱ्यांना महागडे खत आणि किटकनाशकाचा वापर करावा लागत आहे. पिकासाठी महागडे खत वापरल्याने मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्यांच्या खर्चाची तोंडमिळवणी होणे कठीत होत चालले आहे.

गेल्या दोन तीन वर्षापासून लोणार तालुक्यातील अंभोरा, पिंपळनेर, टिटवी, देऊळगाव कुंडपाळ या तलावामधून पाणी आटलेल्या जागेवरुन गाळ उपसून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला महसूल विभागातून नाममात्र परवाना शुल्क घेऊन तलावातील गाळ काढून नेण्यासाठी परवानगी दिली जात होती. यावर्षी मात्र शासनाने तलावातील गाळ नेण्यासाठी परवाना शुल्क माफ करुन जेसीबीद्वारे खोदकाम करुन तलावातून गाळ घेतल्यास आणि शेतकऱ्याने त्याबाबतचे कागदपत्र आणि छायाचित्र दिल्यास अनुदानावर डिझेल खर्च देण्याचा निर्णय घेतला आहे.

सद्य स्थितीत पिंपळनेर व अंभोरा तलावातून परिसरातील शेतकरी ट्रॅक्टरद्वारे गाळ घेऊन त्यांच्या शेतात टाकत आहेत. तलावातील गाळामुळे परिसरातील नदी-नाल्यांमधून बरीच खनिजद्रव्ये पाण्यासोबत वाहून येतात. ती गाळात मिसळली जातात. हा गाळ शेतात टाकल्यानंतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर चांगला परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शेतकरी आता महागड्या खताला पर्याय म्हणून आपल्या शेतात तलावातील गाळ टाकत आहेत. हा गाळ त्यांच्या पिकासाठी जणू संजीवनी ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे. 


Saturday, June 18, 2011

काळ्या मातीतील खरबूज.




यांत्रिकीकरणाच्‍या या युगात शेतीकडे दिवसेंदिवस दुर्लक्ष होत आहे. निसर्गाची अनियमितता, व्‍यापा-यांकडून होणारी लूट आदी कारणांमुळे शेतीला लागलेला खर्च निघणार की नाही, याची चिंता नेहमीच शेतक-याला असते. त्‍यातच ग्रामीण भागातील युवक घरची शेती सोडून रोजगारासाठी शहराकडे जात आहे. मात्र नोकरीपेक्षा आजही शेतीचे महत्‍व जाणणा-या युवकांचे प्रमाण काही कमी नाही.

वडीलोपार्जित पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेतीचे नवीन तंत्रज्ञान उपयोगात आणून कमी खर्चात आणि कमी वेळात भरघोस उत्‍पादन घेणा-या शेतक-यांचा आदर्शही डोळ्यासमोर आहे. ध्‍येय आणि इच्‍छा असली की काहीच अशक्‍य नाही, याची प्रचिती परभणी तालुक्‍यातील बोल्‍डा येथील ज्ञानेश्‍वर ढोकणे या युवा शेतक-याने आपल्‍या कृतीतून दाखवून दिले आहे. मग वाळूत घ्‍यावयाचे पीक चक्‍क काळ्या मातीत घेऊन या शेतक-याने खरबूजाचे उत्‍पादन केले आहे.

बोल्‍डा येथील शेतकरी ज्ञानेश्‍वर ढोकणे यांनी आपल्‍या शेतात आठ गुंठे काळ्या जमिनीत खरबुजाची लागवड करुन वीस हजार रुपयांचे उत्‍पादन घेतले आहे. गावाच्‍या नदीकाठला लागून त्‍यांची चार एकर शेती आहे. शेतात असणा-या विहिरीला मुबलक पाणीदेखील आहे. काळी जमीन असूनही त्‍यांनी आठ गुंठ्यात टरबूज व खरबुजाची लागवड केली आहे

विशेष म्‍हणजे ही दोन्‍ही पिके काळीच्‍या जमिनीत जास्‍त प्रमाणात येत नाहीत. ही पिके वाळूच्‍या पट्टयात घ्‍यावी लागतात. वाळूच्‍या पट्टयातील उष्‍णता खरबूजाच्‍या वाढीला पोषक असते. असे असूनसुध्‍दा ध्‍येयाने पछाडलेल्‍या ढोकणे यांनी काळ्या जमिनीत खताची मात्रा देऊन उष्‍णता निर्माण केली. त्‍याचा उपयोग खरबुजासाठी झाला. आतापर्यंत त्‍यांनी आठ गुंठे जमिनीतील खरबूज विक्रीतून वीस हजार रुपये मिळविले आहेत. विशेष म्‍हणजे परिसरात खरबुजाचे पीक नसल्‍याने या खरबुजांना चांगली मागणी आहे.

त्‍यांना या पिकांबाबत जास्‍त माहिती नव्‍हती. तरीसुध्‍दा शेतीत अभिनव प्रयोग करायचे ठरविले. खरबुजाच्‍या लागवडीपासून तोडणीपर्यंत तीन ते चार हजार रुपये खर्च झाला. तीन-चार हजार लागत खर्च आणि त्‍याच्‍या पाचपट उत्‍पादन. हे नक्‍कीच इतर शेतक-यांना उर्जा देण्‍याचे काम आहे. दिवसेंदिवस बी-बियाणे, खते महागडी होत आहे. त्‍यातच शेतमजूरांचे दरही आकाशला भिडले आहे. अशा परिस्‍थितीत ढोकणे यांनी वेगळ्या पध्‍दतीने शेती करून परिसरातील शेतक-यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. ‘विजेते हे वेगळे काही करत नाही, ते प्रत्‍येक गोष्‍ट वेगळ्या पध्‍दतीने करतात’ याचाच प्रत्‍यय या शेतक-याने आणून दिला आहे.

Monday, May 30, 2011

आधुनिक कृषी तंत्रज्ञानाव्दारे भरघोस उत्पन्न.




उसाचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या काही कमी नाही. मात्र, कमी पाणी, कमी खर्चात जादा उत्पन्न घेणारे शेतकरी अभावानेच सापडतात. फलटण तालुक्यातील शिंदेवाडी येथील तरुण शेतकरी अभयसिंह वसंतराव जाधव यांनी सात एकर क्षेत्रावर कोईमतूर ८६०३२ या जातीचे उसाचे पीक घेतले आहे. हे पीक अवघ्या सात महिन्यांत १५ ते १६ कांडय़ावर आले असून या पिकापासून त्यांना एकरी १०० टनांपेक्षा जास्त उत्पन्नाची अपेक्षा आहे. 


मुळातच आजचा शिकलेला शहरी किंवा ग्रामीण भागातील तरुण शेती व्यवसायाकडे पाठ फिरविताना दिसत आहे. त्याला या व्यवसायात फारसा रस नाही. तो शेतीपेक्षा नोकरीकडे आकर्षित होताना दिसत आहे. मात्र, १९९६-१९९७ मध्ये कृषी पदवीधर झालेले अभयसिंह जाधव नोकरीच्या मागे न लागता फलटण-खुंटे रस्त्यालगत शिंदेवाडी हद्दीत असलेली आपली वडिलोपार्जित २५ एकर शेती पिकविण्यात धन्यता मानू लागले. पदवीच्या शिक्षणानंतर त्यांना सहज एखादी छोटी-मोठी नोकरी मिळाली असती, परंतु त्यापेक्षा त्यांनी शेती व्यवसाय करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्या निर्णयाबद्दल ते आजअखेर समाधानी असल्याचे आवर्जून सांगतात. आज ते स्वत: लक्ष देऊन २५ एकर शेती पिकवीत आहेत. श्री. जाधव यांनी शेतीमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाव्दारे शेतीची मशागत, पेरणी, पीकपध्दतीचा अवलंब करुन आधुनिक शेतीचा नवा आदर्श जोपासला आहे. शेती ते फक्त पिकवीत आहेत, असे नव्हे तर कमी खर्चात आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत भरघोस उत्पन्न घेण्याचा विक्रमही त्यांनी नोंदविला आहे.

श्री. जाधव यांनी आपल्या २५ एकर बागायती क्षेत्रापैकी सात एकर क्षेत्रावर ऊस, सात एकर क्षेत्रावर गहू तर उरलेल्या क्षेत्रावर इतर पिके घेतली आहेत. या शेतीक्षेत्रापैकी सात एकर क्षेत्रावर कोईमतूर ८६०३२ या ऊस जातीची लागवड केली आहे. कोईमतूर जातीचे बियाणे त्यांनी बारामती येथील कृषी प्रतिष्ठान येथून आणून त्याची लागवड केली. टप्प्याटप्प्याने त्यांनी स्वत: बियाणे बनविण्याची माहिती घेऊन घरचे बियाणे तयार केले आहे. आज सात एकर क्षेत्रावर कोईमतूर जातीच्या उसाची लागवड करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. कोईमतूर जातीच्या बियाणांची लागवड करण्याबरोबरच या पिकाची शास्त्रशुध्द पध्दतीने निगा राखून कमी खर्चात अधिक शेती उत्पादन करण्याचा इतिहास श्री. जाधव यांनी नोंदविला आहे. कृषि अधिकार्‍यांनीही त्यांच्या या प्रयोगशील शेतीचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे.

कोईमतूर जातीचं पीक खरे तर सात महिन्यांत जेमतेम चार ते पाच कांडय़ांवर येत असते. मात्र, श्री. जाधव यांची ऊस शेती पिकविण्याची हातोटी व आजअखेरचा अनुभव आणि कृषीक्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान येथे खर्‍या अर्थांने त्यांनी उपयोगात आणले आहे. हे पीक सात महिन्यांत १६ ते १७ कांडय़ांवर आणण्यात त्यांना यश आले असून, कमी कालावधीत या पिकाची एवढी जोमदार वाढ हा किमान फलटण तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील ऊस पिकासंबंधीचा एक विक्रमच म्हणावा लागेल.

श्री. जाधव यांनी आधुनिक शेतीची कास धरली असून शेतीक्षेत्रातील प्रगत ज्ञान, माहिती आणि अनुभवानुसार पीक पध्दती आणि शेती उत्पादनात त्यांनी पुढाकार घेतला आहे. सुरुवातीला ऊस लागवड करावयाच्या क्षेत्रात शेण खत वापरले, बियाणे प्रक्रिया करुन नऊ इंचावर डोळा ठेवून मग ऊस लागवड केली. त्यानंतर विद्यापीठाच्या शिफारशीनुसार संतुलित खतांचा वापर केला गेला. हे सर्व क्षेत्र विहीर व कालवा बागायती आहे, तरी सुध्दा या ऊस शेतीला साधारणपणे वातावरणानुसार १५ दिवसांनी पाणी देण्याची पध्दत अवलंबिण्यात आली आहे. जमिनीची मशागत, पिकांची लागवड आणि त्यांना आवश्यकतेनुसार खतांची आणि किटकनाशकांची मात्रा देण्याच्या शास्त्रशुध्द पध्दतीही जोपासली आहे. पाणी व खतांचा संतुलित वापर करण्यातही त्यांनी नियोजनपूर्वक काम केले आहे, तसेच लागवडीनंतर अवघ्या २० दिवसांनी व नंतर ७५ दिवसांनी त्यांनी तणनाशकाचा वापर करुन तणांवरचा मोठा खर्च कमी केला. यामुळे पिकातला तणांचा अडसर दूर होऊन पीकाची वाढही जोमदार झाली.

विभागीय कृषी अधिकारी रघुनाथ सरतापे, तालुका कृषी अधिकारी नितीन फुलसुंदर, मंडल कृषी अधिकारी पी. एस. बिचुकले, कृषी पर्यवेक्षक अजित जगताप, कृषी सहाय्यक यांचे वेळोवेळी मिळत गेलेल्या मार्गदर्शनामुळे आज ते या पिकाकडून मोठय़ा अपेक्षा बाळगून आहेत. जे पीक लागवडीपासून १२० दिवसांच्या आसपास बांधणीला येते, ते पीक अवघ्या ६५ दिवसांत बांधणीला आणण्यात श्री. जाधव यांना यश आल्याने या क्षेत्रातील तज्ज्ञांनाही अचंबित करुन सोडत आहे. त्यामुळे या पिकाकडून त्यांना एकरी १०० टनांपेक्षा जास्त उत्पन्नाची अपेक्षा आहे. 

ऊसपीक घेण्यापूर्वी श्री. जाधव यांनी आपल्या शेतात काकडी, कलिंगड, भेंडी या सारखी पिके घेऊन त्यामधून चांगले उत्पन्न घेण्यात यश मिळविले आहे. या पिकाबरोबरच त्यांनी आपल्या शेतातील उसापासून लोकांना दर्जेदार आणि आकर्षित करणार्‍या एक किलो गुळाच्या ढेपा तयार केल्या. श्री. जाधव यांनी तयार केलेल्या एक किलोच्या गुळाच्या ढेपांना परदेशातही मोठी मागणी लाभली. ऊस शेतीबरोबरच त्यांनी दूध व्यवसायावरही लक्ष केंद्रीत केले. सध्या त्यांच्याकडे १५ म्हैशी असून आगामी काळातही दुग्धव्यवसाय हा शेतीपूरक उद्योग म्हणून वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दुग्धव्यवसाय या शेतीपूरक उद्योगापासून आर्थिक लाभाबरोबरच मिळणार्‍या इतर फायद्यांमध्ये शेणखताचा मोठा फायदा आहे. शेणखताचा शेतीतील उत्पन्नवाढीसाठी चांगला फायदा होत आहे. सध्या प्रत्येक वर्षी पाच एकर क्षेत्राला पुरेल एवढे शेणखत त्यांना उपलब्ध होत आहे. आगामी काळात संपूर्ण शेती सेंद्रिय पध्दतीने करण्याचा त्यांचा मानस असून त्यादृष्टीने श्री. जाधव यांनी शेती आणि दुग्धव्यवसायाचे नियोजन चालविले आहे.

Sunday, January 30, 2011

कृषितंत्राने साधली कर्जमुक्ती...

नांदेड तालुक्यातील चिमेगाव अवघ्या सहाशे लोकवस्तीचं गाव. आसना नदीच्या तटावर असलेल्या या गावात गेल्यावर गावात प्रगतीचे वारे वाहत असल्याचं चटकन लक्षात येतं. मुख्य रस्त्यावरून जाताना डावीकडील झाडाला लावलेली पाटी आपलं लक्ष वेधून घेते. पाटीवर 'पाणी हेच जीवन' अशा शीर्षकाखाली कविता दिलेली आहे. 'शेतकरी दादा तुम्ही ऐका जरा, जलसंपत्तीचे तुम्ही रक्षण करा, वनसंपत्तीची सर्वांनी लावली वाट, म्हणून पर्यावरणाने फिरविली आपल्याकडे पाठ' अशा जलसंधारणाचं महत्त्व सांगणार्‍या कवितेच्या ओळीखाली कवीचं नाव लिहिलेलं आहे-पंजाबराव पाटील चिमेगावकर....नजर जाईल तिथपर्यंत शेती दिसते. दोन पावलं पुढे गेल्यावर सागाच्या झाडावर विविध पक्ष्यांची रंगीत छायाचित्रं दिसतात. बाजूला शेडनेड, पॉलिहाऊस, विहिरीवर पंप बसविलेला, उजविकडे पॅक हाऊसचा बोर्ड..... एवढय़ाशा गावातील ही कृषी क्रांती बघून आश्चर्य वाटतं. या यशाचे शिल्पकार आहेत पंजाबराव आणि त्यांचे बंधु नागोराव पाटील(आढाव) चिमेगावकर...

सहा-सात वर्षापूर्वी ९० एकर शेतीचे मालक असलेल्या या कुटुंबावर बँकेचे कर्ज कसे फेडावे ही मोठी समस्या होती. आजचं ऐश्वर्य पाहिल्यावर यावर सहजपणे विश्वास बसत नाही. २००४ मध्ये कृषि विभागाच्या सहकार्याने पुष्पोत्पादन योजने अंतर्गत झेंडूचा प्लॉट या दोघांनी शेतात घेतला आणि त्या दिवसापासून या कुटूंबाने मागे वळून पाहिले नाही. या प्लॉटमध्ये त्यांना २० हजार रुपयांचा फायदा झाला. सोबतच शेती सहलीच्या माध्यमातून कृषि विभागाच्या नवीन योजना, शेतीतील नवे तंत्रज्ञान, फायदेशीर शेतीचे तंत्र आदींची माहिती मिळाल्यावर हे सर्व आपल्या शेतात आणण्याचे प्रयत्न पंजाबरावांनी सुरु केले.

अशातच कृषि विभागाने राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यात तळेगावचे तज्ज्ञ आणि बँकर्स उपस्थित होते. 'बँकेने आमच्यासारख्या कर्जबाजारी शेतकर्‍यावर विश्वास ठेवून नव्या तंत्रज्ञानासाठी पुन्हा कर्ज दिल्यानेच हे यश मिळू शकले' या शब्दांत नागोराव खुल्या दिलाने बँकेला धन्यवाद देतात. या कर्जातून त्यांनी पॉलिहाऊस उभे केले. कृषि विभागामार्फत सव्वा तीन लाख रुपयाचे अनुदान मिळाले. एका वर्षात जरबेराच्या उत्पादनातून साडेसहा लाखाचं उत्पन्न होऊ लागलं. वर्षाकाठचा खर्च होता फक्त दीड लाख रुपये. होणार्‍या फायद्यातून दुसरे पॉलिहाऊस उभारण्यात आलं...आणि ही प्रगतीची पाऊलं पुढे पडत गेली. आज या शेतातली फुलं दिल्ली, हैदराबाद, मुंबई आदी महानगरात जात आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कर्जाची परतफेड वेळेवर होत आहे.

आज या शेतात दोन शेडनेटही आहेत. सव्वा तीन लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला कृषि विभागाने १.३६ लाख रुपये अनुदान दिले आहे. दहा गुंठे क्षेत्रातील या शेडनेटमध्ये सिमला मिरचीची साडेतीन हजार रोपे लावली आहेत. प्रत्येक रोपाला साधारण तीन किलोप्रमाणे चार लाखापेक्षा अधिक उत्पन्नाची अपेक्षा या प्लॉटपासून आहे. दुसर्‍या शेडनेटमध्येदेखील नुकतीच रोपे लावली आहेत. इतर शेतजमिनीवर सोयाबीन, कापूस, भाजीपाला आदी उत्पादन घेतले जाते. या उत्पादनातून शेतीवरील खर्च भागतो. खरे उत्पन्न मिळते ते पॉलिहाऊसच्या माध्यमातून, असे नागोराव आवर्जुन सांगतात.

कृषि विभागाच्या सहकार्याने राष्ट्रीय फलोत्पादन योजने अंतर्गत शेताच्या बाजूला पॅक हाऊस उभारण्यात आले आहे. त्यासाठी शासनाकडून ६२ हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. या पॅक हाऊसमध्ये शास्त्रीय पध्दतीने फुले आणि इतर कृषि उत्पादनांचे पॉकिंग करण्यात येते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने पंजाबरावांनी शेतात श्रमदानातून शेततळ्याची निर्मिती केली आहे. फुलझाडांना पाणी दिल्यानंतर अतिरिक्त झालेले पाणी जमिनीतून झिरपून विहिरीचे पुनर्भरण करण्याचे तंत्र विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे विहीर पूर्णत: भरलेली आहे. फुलझाडांना पाणी देताना त्यातील क्षार बाजूला काढण्यासाठी शेतात एक लाख खर्च करून आरओ वॉटर प्लँट बसविण्यात आला आहे. त्यामुळे जमीन क्षारीय न होता रोपांची वाढ जोमाने होते.

शेतीमध्ये एवढी प्रगती करूनही या चिमेगावकर कुटुंबाला नाविन्याचा ध्यास आहे. शेतीतील नवे तंत्र आत्मसात करण्यासाठी नव्या ठिकाणी भेट देणे, अधिकारी आणि प्रगतीशील शेतकर्‍यांशी चर्चा करणे, शेतीत नवे प्रयोग करणे आदी बाबींवर यांचा सातत्याने भर असतो. स्वत:बरोबर गावाचा विकास व्हावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून स्वत:च्या शेतात मार्गदर्शन शिबीर भरविणे त्यांना आवडते. त्यासाठी शेतालगतच लहानसे सभागृह तयार करण्यात आले आहे. नवे तंत्र स्विकारले तर शेती फायदेशीर ठरू शकते हा संदेश देणारी ही प्रगतीशील शेतकरी भावंडांची जोडी गावासाठी अभिमानाचा विषय ठरली आहे.

'महान्यूज'

Popular Keywords

अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आंबा आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कांदा कात कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद “पिवळी क्रांती