दारिद्रय, बेरोजगारी आणि ऊसतोडीसाठी होणा-या स्थलांतरामुळे सांगोला तालुक्यातील गौडवाडीतील दलित समाज विकासाच्या परिघाबाहेर होता परंतु पुणे येथील अफार्म व सांगोला येथील अस्तित्व संस्थेने निजामकालीन उपलब्ध वतनी जमिनीचा विकास करुन ३७ जणांना प्रगतशील बागायतदार बनविले. वेडया बाभळी व कुसळांचे साम्राज्य असणा-या या माळरानावर नंदनवन फुलले आहे.
निजामाच्या काळात गावकीची कामे करणा-या वंचितांना वतनी जमिनी मिळाल्या होत्या. सोलापूर जिल्हयात ३० हजार एकर तर सांगोला तालुक्यात ५ हजार २२० एकर जमीन आहे. गौडवाडी गावात अशीच ८१ एकर वतनी जमीन आहे. येथील प्रत्येक दलित बांधवांच्या नावावर प्रत्येकी दीड ते दोन एकर जमीन आहे. मात्र, मार्गदर्शन व भांडवलाच्या अभावामुळे अनेक जण रोजंदारी किंवा शेतमजुरी करीत होते. स्थलांतरामुळे ऊसातोडणी मजुरांची मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकली जात होती.
पुणे येथील अफार्म (अक्शन फॉर अग्रिकल्चर रिन्युअल इन महाराष्ट) या संस्थेने जर्मनीच्या वो (अरबायटर ओडपर्ट) या स्वयंसेवी वित्तीय संस्थेच्या आर्थिक सहकार्याने मार्ग काढला. 'अनुसूचित जाती-जमाती सक्षमीकरण कार्यक्रम' अंतर्गत हा प्रकल्प हाती घेतला. सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या गौडवाडीची निवड झाली. सुरवातीला या शेतक-यांची शेती करण्याची मानसिकता नव्हती. ग्रामीण भागातील शेती म्हणजे आतबटटयाचा व्यवहार असा त्यांचा ठाम समज होता. मात्र, या संस्थांच्या कार्यकर्त्यांनी शेती विस्तार कार्याचा खुबीने वापर केला. २००६ मध्ये या प्रकल्पाच्या कामास प्रत्यक्ष सुरवात झाली. लाभार्थ्यामध्ये रोज गटचर्चा घडवून आणण्यात आल्या, त्यामुळे त्यांच्या मानसिकतेतही बदल झाला.