सिंधुदुर्गात होत असलेली कृषी क्रांती येथील समृद्धीचे कारण बनणार आहे. पारंपरिक शेतीला बाजूला ठेवून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नवनवीन प्रयोग करण्याची मानसिकता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. मालवण तालुक्यातील बिळवस येथील सिताराम सदाशिव सावंत यांनी असाच एक प्रयोग केला असून मुंबई येथील काम सुटल्यावर त्यांनी गावात येऊन दुसऱ्याची शेती भाडेतत्वावर घेऊन आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेला कृषी उद्योग करण्यावर भर दिला आहे.
सावंत यांनी स्वतःच्या मालकीची शेतजमीन नसतानाही शेतीची आवड असल्याने दुसऱ्या शेतकऱ्याची सुमारे २५ गुंठे जमीन भाडेतत्वावर घेतली. या शेतीमध्ये खरबुजाची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. खरबुजाच्या लागवडीचा जिल्ह्यातील हा त्यांचा पहिलाच प्रयोग होता. खरबुजाची जिल्ह्यात प्रथमच लागवड असल्याने मालवण पंचायत समितीच्या कृषी विभागाची सावंत यांनी लागवडीसाठी मदत घेतली. येथील कृषी विस्तार अधिकारी मदने यांनी खरबुजाच्या लागवडीसाठी सावंत यांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले.