Sunday, September 9, 2012

द्राक्ष-कमी खर्चात रोगनियंत्रणाची रणनीती - डॉ. एस. डी. सावंत

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील (एनआरसी) शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन वक्ते डॉ. एस. डी. सावंत
विषय - कमी खर्चात रोगनियंत्रणाची रणनीती
वक्ते - डॉ. एस. डी. सावंत

पाऊस नाही, त्यामुळे रोगराई कमी, परिणामी खर्च कमी होईल, असे वाटू देऊ नये. रिमझिम पाऊस पडला तरी बागेत रोग येण्याची शक्‍यता वाढते. रोगावरील खर्च कमी करणे हे छाटणी कशी घेता यावर अवलंबून असते. छाटणीच्या तारखा अशा निश्‍चित केल्या पाहिजेत, की जेणेकरून बाग फुटल्यानंतर लगेच पाऊस पडणार नाही. छाटणीनंतर सुरवातीच्या काळात डाऊनी येतो, त्यापासून बाग वाचविण्यासाठी छाटणीचे नियोजन योग्य वेळी व्हावे. 15 ऑक्‍टोबरनंतर शक्‍यतो पाऊस पडत नाही. त्यामुळे या तारखेनंतर केलेली फळछाटणी सुरक्षित मानली जाते. रोग नियंत्रणावरही ताबा राहतो.

महत्त्वाचे मुद्दे -
- ज्या बागांची छाटणी लवकर होते, त्या बागांशेजारच्या न छाटलेल्या बागेत रोग येणार नाही याची काळजी घ्यावी.
- काडीवरील डाऊनीच्या बीजाणूंचा नायनाट करण्यासाठी पेस्टिंग करावे. यात तीन ते पाच ग्रॅम मॅन्कोझेब आणि दोन ग्रॅम सल्फर यांचे मिश्रण करावे. याद्वारे भुरीचेही नियंत्रण होण्यास मदत होईल.
- छाटणीनंतर फुटलेल्या अनेक फुटी पुढे जातात. त्या हाताने काढून टाकाव्यात. त्यामुळे रोगाचे बीजाणू वाढणार नाहीत.

पोंगा अवस्थेतील काळजी -
पोंगा अवस्थेत रोगाचा धोका जास्त असतो. ही अवस्था येईपर्यंत बागायतदारांनी दोन ते तीन फवारण्या घेतलेल्या असतात. त्यामुळे फवारणीतील फार कमी अंश पाने, फुलांपर्यंत पोचतो. बाकीचे द्रावण उडून जाते. त्यासाठी रोग केव्हा येतो, याचा अभ्यास असावा. पोंगा अवस्थेत पोंग्यात
सकाळी पडणाऱ्या दवाचे पाणी शिरले असेल तरच फवारणी करावी. हे तपासण्यासाठी पोंगा हाताने दाबून पाहावा. त्यात पाणी नसेल तर फवारणीची आवश्‍यकता नसते. अशावेळी आंतरप्रवाही बुरशीनाशकांऐवजी डायथायोकार्बामेट गटातील बाह्यस्पर्शी बुरशीनाशक फवारले तर पोंग्यात रोगाचा धोका टाळता येतो. डायथायोकार्बामेटची (मॅन्कोझेब किंवा मेटीराम सारखी बुरशीनाशके) तीन ते पाच किलो पावडर प्रति एकर या प्रमाणात धुरळणी केल्यास रोगापासून चांगले संरक्षण मिळू शकते.


कमी खर्चाच्या नियोजनासाठी -
- उशिरा छाटावयाच्या बागांमध्ये रोगनियंत्रण सुरवातीपासून चांगले ठेवल्यास रोगांचे बीजाणू तेथे वाढणार नाहीत.
- डाऊनी, भुरी व करपा रोगांचे बीजाणू हवेद्वारे पसरतात. सप्टें.-ऑक्‍टो.मध्ये वारे पश्‍चिमेकडे वाहतात. म्हणून लवकर छाटलेल्या बागांच्या पूर्वेकडे न छाटलेल्या बागा नाहीत, याची खात्री करावी.
- जास्त रोग असलेली वा पानगळ झालेली बाग लवकर छाटल्यास रोगांच्या प्रसाराला आळा बसेल.
- फवारणीपूर्वी चांगले हवामान पाहूनच फवारणीचा निर्णय घ्यावा.
- हवामान अंदाजात ज्या दिवशी पावसाचा अंदाज दिलेला असतो, त्या दिवशी बागेत फवारणी टाळावी.
- ज्या रोगाचा धोका आहे, त्याच रोगासाठी बुरशीनाशक हे दुसरे कोणतेही कृषी रसायन न मिसळता फवारावे.
- अशाप्रकारे सुरक्षितरीत्या फवारणी नियोजन केले तर फवारणींची संख्या कमी होऊन खर्च टाळता येईल.
- ऑक्‍टोबर छाटणीनंतर आंतरप्रवाही बुरशीनाशके व्यवस्थित वापरली तर रोगाचा धोका कमी होतो.
- राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातर्फे वेदर स्टेशनच्या माध्यमातून बागेतील हवामान अंदाजानुसार फवारणीचा सल्ला दिला जातो. त्याचा उपयोग बागायतदारांनी करून घ्यावा.

श्वेतक्रांतीचे जनक डॉ. वर्गिस कुरियन यांचे निधन.


भारतातील श्वेतक्रांतीचे जनक डॉ. वर्गिस कुरियन यांचे आज (रविवार) पहाटे वृध्दपकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी माऊली आणि मुलगी निर्मला असा परिवार आहे. गुजरात सहकारी दुग्ध फेडरेशनने दिलेल्या माहितीनुसार, वर्गिस कुरियन यांचे आज पहाटे आणंद येथील नंदियाड रुग्णालयात निधन झाले. कुरियन यांचे पार्थिव अत्यंदर्शनासाठी अमुलच्या मुख्यालयात आज सायंकाळपर्यंत ठेवण्यात येणार आहे. सायंकाळनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मूळ केरळचे असलेले डॉ. वर्गिस कुरियन हे गुजरातमध्ये आणंद येथे येऊन स्थायिक झाले. देशातील दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीत आमूलाग्र क्रांती करून तयंनी श्वेतक्रांतीचे जनक म्हणून आपली ओळख निर्माण केली. अमूल डेअरी, मिल्क मार्केटिंग फेडरेशन, इरमा, एनडीडी बोर्ड, त्रिभुवनदास फाऊंडेशन इत्यादी संस्थांची स्थापना करून गुजरातचे नाव त्यांनी जगभर नेले. दूध उत्पादकांची परिस्थिती सुधारण्याच्या त्यांच्या कार्याबद्दल मॅगसेसे अ‍ॅवार्ड तसेच इतरही अनेक सन्मान त्यांना मिळाले आहेत.

डॉ. वर्गिस कुरियन यांनी अख्खी अमुल उभी केली. भारतातल्या दुग्धक्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरियन यांनी नेस्ले वगैरेंसारख्या बलाढय़ बहुराष्ट्रीय कंपन्यांना अंगावर घेत अमुलचा ब्रँड घडवला. आपल्यासारख्या गरीब देशात केवढं मोठं काम हे. कुरियन यांचे मामा जॉन मथाई आपले पहिले रेल्वेमंत्री होते. नंतर ते देशाचे अर्थमंत्रीही झाले. त्यामुळे हा वारसा लक्षात घेता कुरियन यांनी राजकारणाची वाट धरली असती तरी ते नैसर्गिकच झालं असतं. पण त्यांनी तसं न करता गुजरातच्या वाळवंटातल्या गरिबांना हाताशी धरत अमुलक्रांती करून दाखवली.

Tuesday, July 17, 2012

काजूबोंड प्रक्रिया : एक नवी दिशा


काजूबोंडापासून उत्तम प्रकारचे सीरप तयार करण्याचा प्रक्रिया उद्योग रत्नागिरीत सुरू झाल्याने आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांपर्यंत काजूबोंडाची उपयुक्तता पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतल्याने कोकणातील काजू बागायतदारांना एक नवी दिशा मिळाली आहे.
कोकणात प्रवेश करताक्षणी पर्यटकांचे स्वागत होते ते काजू, आंबा आणि नारळ-पोफळीच्या दाट झाडींनी. हिरव्यागर्द झाडीतून डोकावणारे पिवळे-लाल काजूबोंड खूपच सुंदर दिसतात. त्याच्या खालच्या बाजूस असलेली काजू बी काढल्यावर उर्वरित बोंड टाकून दिले जातात. शाळेतून जाणारी मुले रस्त्याने असलेल्या झाडांवरची काजूबोंड काढून मजेने खातात.

Wednesday, June 13, 2012

कोरडवाहू शेतीसाठी शेततळे संजीवनीच !


पावसाच्या लहरीपणामुळे वेळोवेळी निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेततळ्यातील पाणी उपयोगी पडते. यामुळे पाण्याअभावी नष्ट होणारी पिके वाचविली जाऊ शकतात. संरक्षित सिंचनाची गरज त्यातून भागविली जाते. शेतकऱ्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण असे हे शेततळे बनविताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात या विषयी ही माहिती : 

जागेची योग्य निवड : शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उपलब्ध असलेल्या खोलगट भागात योग्य आकारमानाचे व आकाराचे शेततळे करावे. जागा निवडताना शेतातील सर्व पाणी त्या निवडलेल्या जागेजवळ एकत्रित येईल, याप्रमाणे वळवावे. शक्यतोवर खोलगट, शेताच्या खालच्या बाजुची जमीन निवडावी. पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावरील जागा निवडू नये. कारण अशी जागा निवडल्यास तळे गाळाने लवकर भरते. त्यामुळे शेततळे प्रवाहाच्या बाजुला थोड्या अंतरावर खोदावे. 

पूजा सावंत यांची सेंद्रिय शेती


रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे जमिनीवर होणारे दुष्परिणाम त्यामुळे जमिनीचा कमी होणारा कस आदी बाबी लक्षात घेऊन तसेच सेंद्रीय शेतीचे महत्व पटल्यामुळे मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील पूजा पांडुरंग सावंत यांनी सेंद्रीय व औषधी शेतीचा अभिनव प्रयोग करून आपल्या पूर्वजांचा सेंद्रीय व औषधी शेतीचा वारसा जतन केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना दोन वर्षापूर्वी जिजामाता कृषी भूषण पुरस्काराने गौरविले आहे.

टाकळी सिकंदर येथील कृषीभूषण कै.दिगंबर (अण्णा) सावंत यांच्या स्नुषा पूजाताईंचे माहेर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिर्डी. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे विवाहानंतरही त्यांना शेतीची ओढ स्वस्थ बसू देईना. रासायनिक खतांचे दुष्परिणाम माहीत असल्यामुळे त्यांनी सेंद्रीय शेतीचे प्रयोग परस बागेतील झाडांवर सुरू केले. 

Tuesday, June 12, 2012

साखर उद्योग टिकविण्यासाठी ऊस उत्पादन वाढवावे - हर्षवर्धन पाटील


राज्यात साखर उद्योग टिकण्यासाठी ऊस उत्पादन वाढीवल्याशिवाय पर्याय नाही. साखर उद्योगासाठी ऊस हाच महत्वाचा घटक आहे. ऊस उत्पादन वाढीसाठी साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक विकास मोहीम राबवावी, असे प्रतिपादन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

साखर आयुक्तालयामार्फत आयोजित 'ऊस विकास कार्यशाळा-हंगाम २०१२-१३' चे उद्घाटन श्री.पाटील यांच्या हस्ते सोमवारी पुण्यातील 'यशदा' मध्ये झाले. त्यावेळी ते बोलत होते. कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील आमदार सा.रे.पाटील, सहकार सचिव राजगोपाल देवरा, वसंतदादा साखर संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, कृषी आयुक्त उमाकांत दांगट, साखर आयुक्त मधुकर चौधरी, ऊस तज्ज्ञ डॉ.डी.जी.हापसे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

Wednesday, June 6, 2012

द्राक्ष बागेत टोमॅटो आंतरपिकाचे भरीव उत्पादन


पारंपरिक शेती करताना त्यास माहिती तंत्रज्ञान व नवीन कृषी तंत्राची जोड दिल्यास शेतीतून भरीव उत्पादन घेणे शक्य होते. यासाठी कृषी विभागाकडून अनेकविध नवीन तंत्रज्ञानाची आणि नवीन प्रयोगांची माहिती शेतकरी बंधुना देण्यात येते. नवनवीन करण्याची उर्मी असलेल्या निफाड तालुक्याच्या उगाव येथील मधुकर मापारी यांनी द्राक्ष बागेत टोमॅटोचे आंतरपिक घेऊन भरीव उत्पादन घेतले आहे. हे मापारी यांचे हे पाऊल इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शकच आहे. 
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उत्पादन खर्चामुळे शेती व्यवसाय करणे जिकरीचे झाले आहे. अत्यल्प पाणी आणि कामाचे यशस्वी नियोजन करून द्राक्ष बागेत टोमॅटोचे आंतरपीक घेऊन भरीव उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग मापारी यांनी केला आहे. मधुकर मापारी यांची उगांव शिवारात ६५ आर शेत जमीन आहे. शेतातच वस्ती करून मापारी कुटुंब राहत आहे. त्या क्षेत्रात मार्च एप्रिल २०११ मध्ये डांग्रीज जातीच्या द्राक्षहुंडीची, थॉमसन जातीची द्राक्षकाडी कलम भरली. त्यास ठिंबक सिंचन, आधारासाठी बांबू, अँगल, तार इत्यादी कामासाठी ६ लाख ३० हजार रुपये एवढा खर्च केला. द्राक्षवेलीची वाढ जोमाने होण्यासाठी सेंद्रीय, रासायनिक खतांची योग्य मात्रा वेळोवळी दिली. द्राक्षबागेची लागवड करताना एकाच वरंब्यावर दोन्ही बाजूने एकमेकांशी तिरप्या पद्धतीत लागवड करुन २१ ओळीद्वारे सुमारे २४५० हुंडी लागवड केली. 

द्राक्षवेलीच्या वाढीची प्रक्रिया सुरू असताना जून २०११ मध्ये दोन ओळींमध्ये असणाऱ्या मोकळ्या जागेत टोमॅटोची आंतरपीक म्हणून लागवड केली. त्यांची योग्य मशागत करून पुरेसे पाणी खत देऊन वाढ केली. टोमॅटो पिकाचा पोत दृष्ट लागण्याइतपत सुधारला. त्या पिकासाठी आधार म्हणून द्राक्ष बागेलाच आधारासाठी लावलेल्या तारीचा आणि सुतळीचा वापर केला. टोमॅटो पिकाच्या देखभालीवर सुमारे ४५ हजार रुपयांचा खर्च केला. 

आज टोमॅटोचे भरघोस उत्पादन निघत असून प्रती कॅरेटचे बाजारभाव २५० ते ५०० रूपये मिळू लागले आहेत. टोमॅटो पिकाची द्राक्ष बागेत झालेली वाढ विशेष लक्षवेधी ठरत आहे. टोमॅटो पिकाकडे मापरी परिवाराने लक्ष पुरविले असले तरी द्राक्षवेलीची देखील त्याच नेटाने काळजी घेतली आहे. द्राक्षवेल देखील आता परिपूर्ण वाढली असून कोणत्याही स्वरूपात रोगराई होणार नाही याची काळजी मापारी कुटुंबाने घेतली आहे. शेती-पाण्याचे नियोजन यशस्वी करून मधुकर मापारी यांनी सुनील व बाबासाहेब या दोन मुलांच्या साथीने द्राक्षांमध्ये टोमॅटो पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. उगांव आणि परिसरातील गावांमधून तज्ज्ञ व अनुभवी शेतकरी मापारी परिवारांचे यशस्वी नियोजन व उत्पादन बघत असून त्याप्रमाणे आपल्या शेतातही असाच प्रयोग करण्याचा मानस मापारी यांच्याकडे बोलून दाखवित आहेत. 

श्री.मापारी यांनी केलेला प्रयोग यशस्वी झालेला असून सर्वच शेतकरी बंधुनी कृषी विभागाने पुरविलेल्या विविध योजनांचा व नवनवीत तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शेती परवडणारीच आहे, असे मत मधुकर मापारी यांनी व्यक्त केले आहे.

सहकारातुन पर्यटन केंद्र


महाराष्ट्राची वरदायिनी म्हणून सातारा जिल्हयातील कोयना धरणास ओळखले जाते. कोयना धरणातील (बँक वॉटर) पाण्याचा फुगवटा जवळजवळ ८५ कि.मी.एवढा आहे. कोयना जलाशयास शिवसागर म्हणून संबोधले जाते.या शिवसागराच्या नजीक महाबळेश्वरपासून २५ ते ३० कि.मी. तापोळा हे गाव डोंगराच्या कुशीत बारमाही हिरव्यागार वनराईत दडलेले आहे. यालाच 'मिनी काश्मीर' म्हणून ओळखले जाते. 
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) सहकार्यातून राज्यातील पहिला इकोऍ़ग्रो टुरिझम कंपनी उभारण्याची किमया सातारा जिल्हातील तापोळा येथील धरणग्रस्त शेतकरी युवकांनी केली.एवढेच नाही तर गेल्या दीड वर्षात नऊ ते दहा लाख रुपयांचा व्यवसाय करण्याबरोबरच गावातील २५ कुटुंबाना रोजगार मिळवून दिला आहे.

Monday, June 4, 2012

कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी शेती मिशन स्थापन करणार - पृथ्वीराज चव्हाण


राज्यातील ५७ टक्के जनता ही कोरडवाहू शेती करते, कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी राज्यात कोरडवाहू शेती मिशन स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. अकोला येथील कृषी महाविद्यालयाच्या डॉ.के.आर.ठाकरे सभागृहात आयोजित संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीच्या समारोपीय कार्यक्रमात शास्त्रज्ञांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे होते. यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदचे उपाध्यक्ष विजय कोलते, कृषी व फलोत्पादन विभागाचे प्रधान सचिव डॉ.सुधीरकुमार गोयल, कृषी आयुक्त उमाकांत दांगट, विभागीय आयुक्त गणेश ठाकूर, आमदार बळीराम सिरसकार, वसंतराव खोटरे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ.टी.ए.मोरे, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ.के.पी.गोरे, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉ.के.ई.लवांदे, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ.व्ही.एम.मायंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जमीन पुनर्मोजणी पथदर्शी प्रकल्पाचा महसूल मंत्र्यांच्या हस्ते पिरंगुट येथे प्रारंभ

राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाने राज्यातील जमिनीची पुनर्मोजणी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी ई-महाभूमी हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून तो ४ महिन्यात पूर्ण करण्यात यावा. तसेच हा कार्यक्रम पुढे राज्यभर राबविण्यात येईल, असे प्रतिपादन महसूल मंत्री श्री. थोरात यांनी केले.

राज्य पुनर्मोजणी पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ श्री. थोरात यांचे हस्ते पुणे जिल्ह्यातील पिरंगुट (ता. मुळशी) येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार संग्रामसिंह थोपटे, माजी खासदार अशोक मोहोळ, माजी आमदार शरद ढमाले, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, मुळशी पंचायत समितीच्या सभापती श्रीमती उज्वला पिंगळे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कवडे, अपर जिल्हाधिकारी गणेश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ऊस पाचट व्यवस्थापन अभियान उत्पादन वाढीचे हुकमी तंत्रज्ञान

भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशात बहुसंख्य लोक शेतीवर आधारित आहेत. पण शेती करताना तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिक उत्पादन घेण्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांमध्ये जागृती करुन त्यांनी आधुनिकतेची कास धरावी यासाठी प्रयत्न करणे कर्तव्य समजून कोल्हापूर येथील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील ऊस पाचट व्यवस्थापन अभियान राबवित आहेत. या अभियानामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादनात वाढ होत असून संपूर्ण राज्याला हे अभियान दिशादर्शक आहे. या विषयी त्यांनी दिलेली माहिती ....

प्रश्न:- ऊस पाचट व्यवस्थापन अभियान राबविणे आवश्यक असल्याचे आपणास का वाटले? 

उत्तर:- ऊसाच्या पाचटाच्या व्यापक फायद्यांचा व जमिनीच्या बिघडत जाणाऱ्या आरोग्याचा विचार करता हे तंत्रज्ञान राबविणे आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस शेती मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जिल्हा पाचटमुक्त करण्याच्या उद्देशाने नोव्हेंबर 2011 ला हा संकल्प केला. यामुळे 100 कोटी रुपयांचे उत्पादन वाढणार असून उत्पादन खर्चात 50 कोटी रुपयांची बचत होणार आहे. हे सुरुवातीच्या अभ्यासाअंती लक्षात आल्यानंतर हे अभियान प्रभावीपणे राबविण्याचे ठरविले.

Sunday, June 3, 2012

शेवगा शेतीचा 'मराळे' पॅटर्न


नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील शहा गावातील बाळासाहेब मराळे या शेतकऱ्याने गेल्या तेरा वर्षापासून शेवगा या पिकाच्या उत्पादनाचा ध्यास घेतला आहे. पुरेशा पाण्याअभावी शेतीत मर्यादा आल्या असताना मोठ्या हिकमतीने त्यांनी शेवगा पिकाचा पर्याय शोधला. अहोरात्र परिश्रमाने, चिकाटीने, त्यांची शेवगा शेती बहरली आहे. एवढेच नव्हे तर राज्याचा सीमा ओलांडून परराज्य आणि देशाबाहेरही त्यांच्या शेवगा शेतीचा प्रचार झाला आहे. त्यांनी शोधलेल्या रोहित-१ या नवीन शेवगा वाणाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनाही चांगले अर्थार्जन होऊ लागले आहे.

खरबूज लागवडीचा यशस्वी प्रयोग

सिंधुदुर्गात होत असलेली कृषी क्रांती येथील समृद्धीचे कारण बनणार आहे. पारंपरिक शेतीला बाजूला ठेवून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नवनवीन प्रयोग करण्याची मानसिकता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. मालवण तालुक्यातील बिळवस येथील सिताराम सदाशिव सावंत यांनी असाच एक प्रयोग केला असून मुंबई येथील काम सुटल्यावर त्यांनी गावात येऊन दुसऱ्याची शेती भाडेतत्वावर घेऊन आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेला कृषी उद्योग करण्यावर भर दिला आहे.

सावंत यांनी स्वतःच्या मालकीची शेतजमीन नसतानाही शेतीची आवड असल्याने दुसऱ्या शेतकऱ्याची सुमारे २५ गुंठे जमीन भाडेतत्वावर घेतली. या शेतीमध्ये खरबुजाची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. खरबुजाच्या लागवडीचा जिल्ह्यातील हा त्यांचा पहिलाच प्रयोग होता. खरबुजाची जिल्ह्यात प्रथमच लागवड असल्याने मालवण पंचायत समितीच्या कृषी विभागाची सावंत यांनी लागवडीसाठी मदत घेतली. येथील कृषी विस्तार अधिकारी मदने यांनी खरबुजाच्या लागवडीसाठी सावंत यांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. 

Saturday, June 2, 2012

शेतीतून समृद्धी

शेती व्यवसाय हा पुरूषांपुरता मर्यादित राहिलेला नसून महिलांनीदेखील मातीतून मोती पिकविल्याची अनेक उदाहरणे आहेत. जमिनीची मशागत करण्यापासून कृषी उत्पादनांच्या प्रक्रिया उद्योगापर्यंत महिलांनी झेप घेतली आहे. ग्रामीण भागात रूजलेल्या बचत गट चळवळीच्या माध्यमातून या प्रयत्नांना आणखी बळ मिळाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील जागृती महिला बचत गटाने शेती क्षेत्रातील यशस्वी महिलांकडून प्रेरणा घेऊन भाजीपाला उत्पादनात चांगली प्रगती केली आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने २००४ मध्ये एकत्र येऊन या बचत गटाची स्थापना करण्यात आली. प्राथमिक स्वरुपाची बचत करून महिलांनी गटाच्या कार्याला सुरुवात केली. महिलांनी पारंपरिक व्यवसाय न करता कृषी कार्यावर आधारित भाजीपाला व्यवसाय सुरू करण्याचे निश्चित केले. प्रारंभी परसबागेच्या स्वरुपात या कामाची सुरुवात झाली. नंतरच्या काळात गटाच्या अध्यक्षा दिप्ती उसरे यांनी दिलेल्या एक गुंठा जागेत भाजीपाल्याची लागवड करणे सोईचे झाले. महिलांना २००५ मध्ये शेतीकामासाठी २५ हजारांचे कर्ज मिळाले. त्यातून शेतीची काही साधने खरेदी करण्यात आली.

Friday, May 25, 2012

रोपट्यांची तहान भागविणारा ठिबक सिंचनाचा अभिनव उपक्रम

ग्लोबल वार्मिंगचे संकट संपूर्ण जगाला भेडसावत आहे. याचाच परिणाम म्हणून की काय, महाराष्ट्रातही जमिनीची धूप होत आहे. दरवर्षी उन्हाबरोबरच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. या सर्वांवर मात करण्यासाठी जमिनीत पाणी साठवून ठेवणे अत्यावश्यक झाले आहे. सिंचनाच्या सुविधा वाढवून शासन यासाठी प्रयत्न तर करीत आहेच त्याचबरोबर वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातूनही याला हातभार लावला जात आहे. यादृष्टीने बुलढाणा जिल्ह्यात रोपट्यांच्या वाढीसाठी राबविला जाणारा ठिबक सिंचनाचा अभिनव प्रयोग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 

ठिबक सिंचनाचे महत्व ओळखून शेतकरी आता शेतामध्ये या प्रणालीचा सर्रास वापर करू लागले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागानेही, आता केवळ ‘पाणी वाचवा’ हा संदेश देऊन न थांबता ‘ठिबक’च्या एका अनोख्या उपक्रमातून वृक्षांची तहान भागवण्याला सुरूवात केली आहे.

Wednesday, May 23, 2012

देवचंद शिवणकर : काकडी पिकामुळे लखपती


‘इच्छा असली तेथे मार्ग निघतोच’. इतरांना दोष देऊन व स्वत:च्या कामावरुन पळपुटेपणा करणाऱ्यांना भाग्यही साथ देत नाही. याचा प्रत्यय मला आला आहे, असे मनोगत गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील चिखलीचे हरहुन्नरी युवक शेतकरी देवचंद गोविंदा शिवणकर यांनी व्यक्त केले. मेहनतीच्या जोरावर काकडीचे भरघोस पीक घेतल्याने शिवणकर आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाले आहेत.देवचंद शिवणकर हे आदिवासी कास्तकार. त्यांनी राष्ट्रीय कृषी फलोत्पादन अभियानांतर्गत आपल्या शेतात हजार चौरस फूटाचे ग्रीनशेड-नेट हाऊस बांधण्यासाठी कनेरी येथील आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थेकडे अडीच लाख रूपये कर्जाची मागणी केली. ह्या हजार चौरस फुटाचे ग्रीनशेड-नेट उभारण्यासाठी त्यांनी प्रथमत: तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधला. ह्या तालुका कृषी कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार व त्यांनी प्रकल्प बांधणी केलेल्या तांत्रिक मदतीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर काकडीचे उत्पादन घेण्याचे निर्धारित केले.

बटाट्याचे एकरी १३० क्विंटल उत्पादन


वाशिम जिल्ह्यातील शेजूबाजार पासून जवळच असलेल्या तपोवन गावातील शेतकरी बंडूजी किसन येवले यांनी आपल्या शेतामध्ये बटाट्याचे एकरी १३० क्विंटल उत्पादन घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या पिकास मुंबई-पुण्यामध्ये बटाटा असे नाव आहे. मात्र विदर्भात आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये हे पीक आलू याच नावाने लोकप्रिय आहे. श्री. येवले यांच्याकडे एकूण १५ एकर शेती असून त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन सर्व शेती सिंचनाखाली आणली आहे. विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी असल्याने त्यांनी आपल्या शेतामध्ये कांदा, हरभरा, लसूण आदी पिके घेतली आहेत. बटाटा पिकाचे उत्पादन चांगले मिळू शकते याविषयी त्यांनी बरेच ऐकले होते. त्याविषयी त्यांच्या मनात उत्सुकता होती. यासाठी त्यांनी बटाटा या पिकाविषयी सर्व माहिती गोळा केली. आपल्या शेतात हे पीक घेणे शक्य आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी बटाट्याचे उत्पादन घेण्याचे ठरविले. 

Tuesday, May 22, 2012

ये फुलों की राणी....


असे म्हटले जाते की तुमच्याकडे दोन रूपये असतील तर त्यातील एक रुपयाची भाकरी घ्या (जेवण करा) आणि एक रुपयाची फुले. भाकरी तुम्हाला जगवेल आणि फुले तुम्हाला कसे जगायचे ते शिकवतील. ठाणे जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव येथील भारती अविनाश सावे यांच्या बाबतीत हे अगदी प्रत्यक्षात आलेय. त्यानी फुलांना जगवलेय आणि कसे जगायचे ते फुलांनी त्यांना शिकवलेय. फुलझाडे लावण्याच्या त्यांच्या छंदाला त्यांनी फुलशेतीचे स्वरूप दिले आणि स्वतःबरोबरच परिसरातील आदिवासी भगिनींनाही त्यांनी कृषी क्षेत्रात सहभागी करून घेतले. 

त्यांचा जन्म वसई येथे १९५८ साली झाला. गरीब परिस्थितीत दहावीपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण झाले. त्यानंतर हिरे कंपनीत त्यांनी काम केले. तिथे सचोटीने काम केल्याने त्यांनी कुशल कामगार हा किताब मिळविला. लग्नानंतर सासरची परिस्थिती काही फार वेगळी नव्हती. त्यामुळे पती अविनाश सावे यांना मदत म्हणून गावच्या बाजारात पटकन विकली जातील, अशी उत्पादने निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. इथेच त्यांची व्यापार वृत्ती (बिझनेस माईंड) दिसून येते. त्यानंतर कर्ज काढून त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. 

माळ्याच्या माळ्यामंदी पाटाचं पाणी जातं,
गुलाब, जाई-जुई, मोगरा फुलवित.....

Tuesday, May 15, 2012

मेळघाटमध्ये सेंद्रीय शेतीतून भरघोस उत्पादन


चिखलदरा तालुक्‍यातील सोमवारखेडा, वस्तापूर, कुलंगणा (खुर्द) कुलंगणा बुजरूक या चार गावातील अनेक शेतकरी सेंद्रीय पद्धतीचा अवलंब करून शेती करीत आहेत. शेतीत लागणारे बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांच्यामुळे होणारी हानी आणि महागाईमुळे येणारा कर्जबाजारीपणा या बाबी लक्षात आल्यावर सेंद्रीय पद्धतीने शेती केल्याशिवाय विकास साध्य होणार नाही हे शेतकऱ्यांना कळून चुकले आहे. जीवन विकास संस्था यासाठी त्यांना मार्गदर्शन करीत आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन, मूग, उडीद, मिरची, ज्‍वारी, भुईमूग यांचे सेंद्रीय पद्धतीने चांगले

Tuesday, April 17, 2012

माळरानावर बहरले डाळींब


पर्जन्यमानात घट झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडला आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे शेतीमालाचे गडगडणारे दर पाहता शेती उद्योग तोट्यात आला आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक पिकांना बाजूला सारत पाण्याच्या थेंबा-थेंबाचे नियोजन करून आणि मेहनत व चिकाटीच्या जोरावर बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली येथील आवटी बंधूंनी त्यांच्या खंडाळा मकरध्वज शिवारातील माळरानावर डाळिंबाचा बगीचा फुलविण्यात यश मिळविले आहे. खडकाळ आणि निकस म्हणवल्या जाणाऱ्या माळरानावर डाळिंबांचा बहर निर्माण करुन इतर शेतकऱ्यासमोर नवा आदर्श निर्माण करण्याचे काम आवटे बंधूनी केले आहे.

कोरडवाहू शेतीला मिळाले शेततळ्याचे वरदान


अमरावती जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणात सिंचन शेतीचा अभाव आहे. कोरडवाहू शेतीत शेततळ्याच्या माध्यमातून काही प्रमाणात का होईना सिंचन करण्याचा प्रयत्न कृषी विभाग आणि राज्य शासनाने चालविला आहे. या वर्षभरात जिल्ह्यात ३ हजार ८०० शेतकऱ्यांनी कृषी विभागातील योजनेमधून शेततळे तयार केले असून त्याचा शेतीसाठी मोठा लाभ होत आहे.

मागील काही वर्षांत विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा आणि वर्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात योजना राबविण्यात आल्या. या भागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढलेले होते. अभ्यासकांनी शेतकरी आत्महत्येचे कारण सिंचनाचा अभाव असल्याचे स्पष्ट केल्यानंतर पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी पॅकेज दिले. त्यामध्ये सिंचनावरच भर देण्यात आला.

Monday, April 16, 2012

कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी पाच हजार कोटींची गुंतवणूक - राधाकृष्ण विखे पाटील


कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासन खाजगी उद्योजकांच्या भागीदारीत आगामी पाच वर्षात पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. 

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आणि प्रवरा फळे भाजीपाला उत्पादक आणि प्रक्रिया खरेदी विक्री सह संस्था, राहता, जि.अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर उभारण्यात येत असलेल्या साई प्रवरा ॲग्रो प्रोसेसिंग पार्कसाठी आयोजित करण्यात आलेल्या गुंतवणूकदार परिषदेचे उद्घाटन श्री.विखे पाटील यांच्या हस्ते पुणे येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. कृषी व पणन विभागाचे प्रधान सचिव डॉ.सुधीर कुमार गोयल, कृषी उद्योग विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक नीता राजीव लोचन, महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मक प्रकल्पाचे कार्यकारी संचालक दादासाहेब झगडे, पशुसंवर्धन आयुक्त एकनाथ डवले, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे अभय बोगीरवार, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे कार्यकारी संचालक विश्वास भोसले, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक डॉ.किशोर तोष्णीवाल यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

Wednesday, April 11, 2012

सुनील राजगुरू यांचा मत्स्य व्यवसाय


पारंपरिक शेती सध्या न परवडणारी झाल्याने शेतीस पूरक व्यवसाय म्हणून मासे पालनाचा व्यवसाय सोलापूर जिल्ह्याच्या माढ्यातील प्रगतशील तरुण शेतकरी सुनील प्रल्हाद राजगुरू यांनी सुरू केला आहे.

सुनील राजगुरू हे शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित तरुण. आई शिक्षण खात्यात, तर वडील आरोग्य खात्यात नोकरीस. वडिलोपार्जित चाळीस एकर जमीन असताना पारंपरिक पिकांमुळे मात्र शेती तोट्याची ठरत होती. त्यामुळे पारंपरिक शेतीस फाटा देऊन शेतीपूरक व्यवसायाकडे वळलेल्या सुनील यांनी आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवस रेशीम उद्योग आणि ससे पालनाचा व्यवसाय केला. 

कथा हिरव्या यशाची


'प्रयत्न करणाऱ्यांची शेती आहे. मेहनत करीत रहा ती भरभरून देईल' रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातील लक्ष्मण कुंभार यांच्या शेतीला भेट दिल्यावर त्यांच्या या बोलण्यातील सत्यता पटते. आपल्या चार एकरच्या शेतीत भाजीपाला आणि कलिंगडाचे भरघोस उत्पन्न घेताना त्यांनी वर्षाचे उत्पन्न तीन लाखांपर्यंत पोहोचविले आहे.
कुंभार यांच्या कुटुंबात एकूण पाच भाऊ. त्यामुळे वडिलोपार्जित अल्पशा जमिनीतून प्रत्येकाच्या वाट्याला केवळ दोन गुंठे जमीन आली. मात्र लक्ष्मण कुंभार यांनी चुलत्याची २६ वर्ष सेवा केल्याने त्याचे फळ जमिनीच्या रुपात त्यांना मिळाले. घर चालविण्यासाठी त्यांनी प्रारंभी घराची कामे केली. मात्र त्यात ते फार काळ रमले नाही. ते गावाकडे आले. कोतळूक गावात नदीकिनारची उतारावरची जमीन त्यांच्याकडे आली. जमिनीला शेतीयोग्य करण्यासाठी अपार कष्ट घेतले. त्यांच्या कष्टाला फळही लवकर मिळाले. भाताचे उत्पन्न चांगले येऊ लागले.

आधुनिक शेती लाखमोलाची


शेती आता केवळ पारंपरिक पद्धतीने करण्याचा व्यवसाय राहिलेला नाही. यामध्ये सातत्याने काहीतरी नवीन प्रयोग केल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकते. बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजा तालुक्यातील शेलगाव राऊत येथील अल्पभूधारक शेतकरी श्रीमंत रामभाऊ राऊत यांनी दहा गुंठे शेडनेटमध्ये सिमला मिरचीची लागवड करुन हेच सिद्ध करून दाखविले आहे. त्यांनी याद्वारे दीड लाखांचे उत्पन्न घेतले आहे. अजूनही उत्पादन सुरू असून त्यातून त्यांना किमान ५० हजार रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. श्रीमंत राऊत यांनी पारंपरिक शेती करुन शेती आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने आधुनिक शेतीची कास धरली आहे. यासाठी तालुका कृषी कार्यालयाचे कृषी सहायक एस.पी.बंडगर, कृषी केंद्र चालक श्रीकृष्ण ढवळे यांच्यासोबत चर्चा करुन त्यांनी दहा गुंठ्यावर नेटशेडमध्ये सिमला मिरची लागवड करण्याचा निर्णय केला. वाणाची निवड केल्यानंतर सिमला मिरचीची रोपे घरीच तयार करण्यात आली. 

Tuesday, April 10, 2012

नातं मातीचं


रत्नागिरी जिल्ह्यात अनेकजण पारंपरिक पद्धतीने शेती करण्यात निष्णात आहेत. मात्र कोकणच्या तांबड्या मातीत शेती करताना तिच्या वैशिष्ट्यांचा आणि येणाऱ्या पिकांचा नीट अभ्यास करून शेतीत अनुकूल परिवर्तन करण्याचे प्रयत्न फार थोड्या प्रमाणात आढळून येतात. शिवाय अशा प्रयत्नात यश मिळाल्यावर 'जे जे आपणासी ठावे...' या उक्तीप्रमाणे परिसरातील शेतकऱ्यांना पीकपद्धतीची माहिती देण्याचे प्रयत्नही फारसे आढळत नाहीत. मात्र गुहागर तालुक्यातील कोतळूक गावातील शेतकरी जानू पांडू भेकरे याला अपवाद ठरले आहेत. 
नोकरीच्या अमिषाने मुंबई येथे भर तारूण्यात गेलेले भेकरे शेतीपत्रिका या शेतीविषयक मासिकाचे नियमित वाचक असल्याने त्यांचे मन नोकरीत रमले नाही. शेतीची आवड असल्याने १९८० मध्ये ते गावी परतले. गावात स्वत:ची अशी जमीन नव्हती पण शेती करण्याची प्रबळ इच्छा असल्याने भाड्याने जमीन घेऊन त्यावर शेती करण्यास त्यांनी सुरूवात केली. केवळ तिसरीपर्यंत शिकलेले असूनही नवे ज्ञान आत्मसात करण्याची आवड असल्याने कोकणात सहसा न आढळणारी कलिंगडाची शेती करण्यास त्यांनी सुरूवात केली आणि गेली २८ वर्षे शेतकरी म्हणून त्यांच्या यशाचा आलेख सातत्याने उंचावतो आहे. गुहागर तालुक्यातील कलिंगडाच्या वाढत्या क्षेत्रामागे भेकरे यांचीच प्रेरणा असल्याचे कोतळूक परिसरातील ग्रामस्थ सांगतात.

शेतीतील आधुनिक वाल्मिकी


भूमातेच्या उदरातून स्वकष्टातून सोने पिकविण्याचे महान काम सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील वाजेवाडीचे प्रगतशील शेतकरी शंकरराव खोत यांनी केले आहे. वडिलोपार्जित शेतजमिनीमध्ये स्वकष्टाने शेतीची मशागत, पीकपद्धतीचे शास्त्रशुद्ध नियोजन, पाणी-खते-कीटकनाशकांच्या फवारणीचा तसेच बाजारपेठेचा अभ्यास आणि नियोजन करून परवडणारी आणि लाभदायी शेती करण्याचा नवा फंडा श्री.खोत यांनी जिद्द, कष्ट, मेहनत आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शोधला आहे.वाजेवाडी इथं तारळी नदीच्या काठावर खोत कुटुंबियांची शेतीवाडी आहे. पाच भावांचं एकत्र कुटुंब, त्यात शंकरराव सर्वात धाकटे. पाचही भावांना शेतीतील तांत्रिक बाबींचे परिपूर्ण ज्ञान असल्याने त्यांच्या या ज्ञानाचा चांगल्या प्रकारे शेती करण्यासाठी उपयोग झाला. १९९०-९१ च्या सुमारास बारामती येथील कृषीभूषण अप्पासाहेब पवार यांची झालेली भेट शंकररावांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. उपलब्ध जमीन, पाणी आणि मनुष्यबळाचे सुयोग्य नियोजन करुन निर्धारपूर्वक भूमातेच्या सेवेला लागण्याचा निर्णय त्यांनी अप्पासाहेबांच्या सल्ल्यानुसार घेतला.

Sunday, April 1, 2012

युवक शेतकऱ्यांनी धरली गटशेतीची वाट


बदलत्या नैसर्गिक परिस्थितीमुळे पारंपरिक शेतीत निर्माण झालेल्या अशाश्वतपणावर मात करीत काहीतरी वेगळे करून दाखविण्याची जिद्द उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नजच्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. या जिद्दीला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी नान्नजच्या सहा युवक शेतकऱ्यांनी गट शेतीची वाट धरली आहे. 

प्रत्येकी अवघ्या दहा गुंठ्यामध्ये सुरु असलेला हा प्रयोग उत्तर सोलापूर तालुक्यासाठीच नव्हे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीही पथदर्शी ठरत असून इस्त्रायलच्या धर्तीवर सेडनेटमधील ग्रुप फार्मिंगचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे प्रयोगशील शेतकरी अंकुश टोणपे यांनी सांगितले. 

पारंपरिक पिकाला पर्याय काकडीचा


जिद्द आणि नाविन्याची आवड असेल तर प्रयत्नांना नक्कीच यश लाभते. त्यातही शेतक्षेत्रातील आधुनिक पद्धतीचा वापर केल्यास कमी खर्चात चांगले पीक उत्पादन मिळते. पारंपरिक आणि अति खर्चिक ऊस पिकाला फाटा देऊन नव-नवीन पिकांची लागवड केल्यावर देखील शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळू शकतो, याचे उत्तम उदाहरण सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाले आहे. 

शेतीत विविध प्रयोग करण्यासाठी आवड असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथील मुकुंद साठे या प्रयोगशील शेतकऱ्याने ऊस पिकाला पर्याय म्हणून अवघ्या २५ गुंठ्यात काकडीचे अडीच लाख रुपयांचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांच्या लाख मोलाच्या काकडीने त्यांना चक्क लखपती केले आहे.

Saturday, March 17, 2012

युगपुरुष... यशवंतराव चव्हाण साहेब


 
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेबांविषयी आपल्या सर्वांच्या मनात अपार श्रद्धा, प्रेम आणि आदर आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दाखविलेली दूरदृष्टी आणि घेतलेले अचूक निर्णय यातूनच आजचा प्रगतीशील महाराष्ट्र घडला आहे. राष्ट्रीय पातळीवरही चव्हाण साहेबांनी आपलं कर्तृत्व वेळोवेळी सिद्ध केलं. केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी केलेलं कार्य आणि देशवासियांच्या मनात स्वत:विषयी निर्माण केलेला विश्वास या बळावरच देशाचं उपपंतप्रधानपदही त्यांच्याकडे चालून आलं. चव्हाण साहेबांच्या रुपानं देशाला सक्षम उपपंतप्रधान लाभला तसंच मराठी माणूस उपपंतप्रधान झालेला पाहण्याचं भाग्य आपल्याला अनुभवता आलं, अशा या युगपुरुषाबद्दल आपले विचार व्यक्त केले आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी.

यशवंतराव चव्हाण साहेबांनी जातीभेदविरहीत, सुसंस्कृत आणि संपन्न महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं होतं. आपलं राज्य केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात प्रगतीशील राज्य बनले पाहिजे हा त्यांचा ध्यास होता. ४० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय राज्याच्या प्रगतीला गती आणि सर्वसामान्य माणसाला बळ देणारा होता. राज्यातील जनतेचं कल्याण हेच एकमेव ध्येय उराशी बाळगून त्यांनी अविरत कार्य केलं.

Monday, February 27, 2012

एका एकरात तिळाचे ३५ हजारांचे उत्पन्न


वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील हळद पिकाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरपूर जैन येथील शेतकरी यादवराव ढवळे यांनी गेल्या तीन वर्षापासून उन्हाळी तीळ लागवड करुन एका एकरात ३५ ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. या पिकासाठी आलेला खर्च वजा जाता त्यांना ३० ते ३५ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.
पश्चिम विदर्भातील वाशिम जिल्हा हा प्रामुख्याने सोयाबिनचा पट्टा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यामध्ये सिंचनाची पुरेशी सुविधा नसल्याने शेतकरी प्रामुख्याने सोयाबिननंतर हरभऱ्याचे पीक घेतात. तर ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची सुविधा आहे ते शेतकरी गहू किंवा भाजीपाला वर्गीय पिके घेतात. परंतु बाजारामध्ये भाजीपाल्यांचे प्रमाण वाढले तर भाजीपाल्याला अपेक्षित भाव मिळत नाही. म्हणून शेतकऱ्यांना भाजीपाल्याची शेती करणे फारसे परवडत नाही.

योग्य व्यवस्थापनामुळे टोमॅटोचे विक्रमी उत्पादन

भारत कृषीप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करुन पिकांचे योग्य नियोजन केले तर टोमॅटोसारख्या बेभरवशाच्या पिकातूनही विक्रमी उत्पादन घेता येते. नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील राजपूर येथील दत्ता सानप यांनी हा प्रयोग यशस्वी करुन सहा महिन्याच्या हंगामात साडेतीन लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे.

‘हिरव्या पुण्या’ची कहानी


आयुर्वेद ही भारतीय आरोग्यशास्त्राची विशेष ओळख आहे. ही औषधे बनविण्यासाठी विशेष औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांची आवश्यकता असते. पूर्वी आपल्या देशात अशी वनसंपदा मुबलक प्रमाणात उपलब्ध होती. तथापि, अशी झाडे दुर्मिळ होऊ लागली आहेत. उद्या अशी झाडे लोप पावली तर आयुर्वेदिक औषधे मिळणेही कठीण होईल. हा समंजस विचार करुन नाशिकमधील कुसुम दहिवेलकर यांनी एक रोपवाटिका निर्माण करुन वनस्पतींचा हा अनमोल ठेवा जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीमती दहिवेलकर ह्या निवृत्त वनाधिकारी. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मिळालेल्या पैशातून पाथर्डी गावात थोडी जागा विकत घेऊन ‘हिरवे पुण्य’ नावाची रोपवाटिका साकारली आहे.

Friday, February 17, 2012

चाकोरीबाहेर जाऊन हळद उत्पादनाचा यशस्वी प्रयोग


नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा या तालुक्यांचा परिसर कसमादे पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकरी नेहमीच नवनवीन प्रयोग करुन शेती उत्पादनात वाढ करण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रयोग देवळा येथील पेशाने शिक्षक असलेल्या संजय देवरे या शेतकऱ्याने केला आहे. हळदीचे पीक घेऊन त्याचे जास्त उत्पादन काढण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी करुन दाखविला आहे.कसमादे पट्टा हा तसा नेहमीच अवर्षण प्रवण राहिला आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे शेतकरी बांधवांना शेती करताना तारेवरची कसरत करावी लागते. परंतु पर्जन्यमान अल्प प्रमाणात असले तरीही या पट्ट्यातील शेतकरी आपल्या मेहनतीच्या जोरावर गहू, कांदा, मका या पिकांबरोबरच डाळिंबाचे उत्पादन घेतात.

Wednesday, February 8, 2012

सेंद्रीय शेतीद्वारे भरघोस उत्पादन


नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला शेतमाल अलिकडे दुर्मिळ झाला आहे. विविध प्रकारच्या रासायनिक औषधांचा वापर करून पिकविलेले धान्य तथा भाजीपालाच आज वापरावा लागतो. त्यातून शरीराला किती आणि कोणते अन्नघटक मिळतात हा प्रश्न आहे. परंतु या सर्व गोष्टींना फाटा देत केवळ नैसर्गिक आणि सेंद्रीय पद्धतीने गेल्या बारा वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील दहागाव येथील शेतकरी बाबाराव जाधव हे शेती करीत आहे. बाबाराव जाधव यांनी सेंद्रीय शेतीचे तंत्र वापरुन भरघोस उत्पादन घेत शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे. गेल्या अकरा वर्षापासून प्रत्यक्ष कृतीतून सेंद्रीय शेतीचा ते प्रचार करीत आहेत. त्यांनी उत्पादित केलेल्या गहू, हरभरा, तूर, सोयाबिन, भाजीपाला यासारख्या सेंद्रीय शेतमालाला प्रचंड मागणी आहे.

Thursday, February 2, 2012

झाडा-फुलांचा जिव्हाळा जपणारी कविता

निसर्गाचे विभ्रम आणि कविता यांचं एक अतूट असं नातं असतं. निसर्गाचं रूप टिपणारी कविता शुद्ध आस्वादपर, वर्णनपर असू शकते, तशी ती अनेकदा मानवी जीवनाशी या निसर्गाला जोडून एक विलक्षण असा आविष्कार घडवते. मराठीतील एक ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांची कविता याच जातकुळीतली आहे. मौज प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेला त्यांचा ‘बरेच काही उगवून आलेले’ हा कवितासंग्रह जगण्यात निसर्गाच्या खुणा शोधत जाणाऱ्या कवितांनी सजलेला आहे.

धामणस्करांच्या कवितेतून भेटणारा निसर्ग वाचकांच्या ओळखीचा आहे. निसर्गातले त्यांचे सर्वात जवळचे घटक म्हणजे हिरवेपणा उधळणारी झाडं आणि रंगवर्षाव करणारी फुलं. माणूसही तसा निसर्गाचाच भाग आहे, पण झाडा-फुलांमधले रंग-विभ्रम त्याच्यात नाहीत. मात्र त्यांना टिपणारी संवेदनशीलता माणसाकडे नक्कीच आहे. म्हणूनच मनुष्य आपल्या जगण्याच्या संदर्भात निसर्गाचा विचार करतो, निसर्गात स्वतःच्या आयुष्याच्या खुणा शोधू पाहतो, झाडा-फुलांच्या तटस्थपणे फुलण्या-कोमेजण्यातून आपल्या जगण्याचे संदर्भ जागवतो. धामणस्करांची कविता याच पठडीतली आहे. निसर्ग हा त्यांच्या अनुभवाचा आणि चिंतनाचा विषय आहेच पण तो केवळ सौंदर्याचा आविष्कार म्हणून किंवा दृश्य जाणीवांचा आस्वाद म्हणून अवतरत नाही.

पडीक जमिनीतून पिकविले सोने


पेरणी योग्य नसलेल्या पडीक जमिनीमध्ये अहोरात्र काबाडकष्ट करीत कुटुंबाच्या उन्नतीसाठी झपाटलेल्या युवा शेतकऱ्याने कृषीक्रांती घडविली आहे. पडीक जमिनीवर त्याने भरघोस कपाशीचे उत्पादन घेण्याचा करिश्मा केला आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यातील डेहनीच्या दिनेश रामभाऊ मारशेटवार या नवोदित शेतकऱ्याने आपल्या अपार परिश्रमाच्या जोरावर जराशा संकटाने कंपित होणाऱ्या शेतकऱ्यांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले असून तालुक्यात त्यांच्या परिश्रमाचे कौतुक केले जात आहे. उद्यमशीलता, धेर्य, सचोटी आदी गुणांच्या जोरावर माणूस विपरित परिस्थितीवर मात करु शकतो, हे अनेकदा ऐकायला मिळते. या गुणांची कास धरुन दिनेशने आपल्या मालकीच्या तीन एकर मुरमाड व पडीक जमिनीमध्ये कृषीक्रांती घडवून आणली आहे. एकीकडे काळ्याभोर मातीच्या जमिनी योग्य नियोजनाअभावी पडीक करून निसर्गाला दोष देणा-या शेतक-यांची संख्या वाढत असताना दिनेशने मात्र परिस्थितीशी दोन हात करण्याचे धैर्य दाखविले आहे. 

Tuesday, January 31, 2012

माझ्या मामाचा गाव

'मामा' या शब्दातच स्नेह दडला आहे आणि गावाचं आणि निसर्गाचं नातंही जवळचं. गुहागर तालुक्यातील मुंढर या गावातल्या समीर साळवी यांच्या कृषी पर्यटन केंद्रावर गेल्यावर या दोन्ही शब्दातला अर्थ मूर्त रुपाने समोर दिसतो आणि गावाकडच्या या अद्भूत दुनियेत पर्यटक आनंदाने रमतो. 'फळबागांची शोभा पाहुया, मामाच्या गावाला जाऊ या..' असे म्हणतच जणू तो इथून परत फिरतो.

मुंढर हे गाव गुहागरपासून साधारण २० किलोमीटर अंतरावर आहे. गुहागरहून चिपळूणकडे जाताना चिखली गाव ओलांडल्यावर डावीकडे मुंढर फाटा लागतो. या गावात गेल्यावर उजव्या बाजूला असलेला 'माझ्या मामाचा गाव' असा फलक आपले लक्ष आकर्षून घेतो. मोकळ्या माळरानातून पुढे जात निसर्गरम्य परिसरात आपण येऊन पोहचतो. समोरच दिसणारी नारळाची झाडं आपलं स्वागत करतात. बाजूला चार-पाच मांजरी लाडीकपणे जवळ येऊन जणू तुम्ही तिथे आल्याचा आनंद व्यक्त करत असतात. हवेची थंड झुळूक प्रवासातला थकवा घालवते. साळवी दाम्पत्याने केलेल्या स्वागतानं तुम्ही काही वेळातच 'आपलं गाव' विसरून 'मामाच्या गावात' रमता.

सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने घडविली कृषी क्रांती


उद्यमशीलता आणि एखादी गोष्ट करायचीच या ध्येयाने कार्य करणारी व्यक्ती अशक्य ते शक्य करण्याची किमया साधू शकते. यवतमाळ जिल्ह्यात या ध्येयाने झपाटलेल्या अनेक शेतकऱ्यांनी कृषी किमया साधली आहे. दारव्हा तालुक्यात बोरीअरब पासून काही अंतरावर असलेल्या हातगावचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामगीर गिरी हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांनी परिश्रमाच्या जोरावर आपल्या शेतात क्रांती घडविली आहे. 
पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत या किमयागार शेतकऱ्याने हळद, ऊस व केळीच्या लागवडीतून समृद्धी आणली आहे. आज या शेतकऱ्याने घडविलेली हरितक्रांती बघण्यासाठी हातगावमध्ये शेतीतज्ज्ञांची रेलचेल पाहावयास मिळते.

Sunday, January 29, 2012

मातीचे वरदान

प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी परिश्रमाची शिदोरी उपयोगी पडते. मातीशी इमान राखून केलेल्या कष्टामुळे शेतकऱ्याला मातीतून सोने पिकविता येते. त्याला मिळालेली संपत्ती, मान सन्मान हे त्या मातीचेच वरदान असते. असेच वरदान लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातीन नाणीज गावच्या चंद्रकांत इरमल या शेतकऱ्याचा शेतकरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलाय.

गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या इरमल यांचे शिक्षण कठीण आर्थिक परिस्थितीमुळे होऊ शकले नाही. वडिलोपार्जित शेती सहा एकर होती. मात्र पारंपरिक पद्धतीने शेती करताना कुटुंबाचे पालनपोषण करणेही तसे जडच होते. शिवणकला शिकून सुरू केलेला व्यवसायही गावात फारसा प्रतिसाद न मिळाल्याने पुढे चालू शकला नाही. मात्र अशाही परिस्थितीत हार न मानता त्यांनी शेतीकडे लक्ष देण्यास सुरूवात केली.

केशरी यश


विस्तीर्ण भूभागावर पसरलेली आंब्यांची फळबाग...बाहेरच्या बाजूस छानसा बंगला... छोटंसं कार्यालय आणि कार्यालयात संगणक आणि लॅपटॉपवर दोन शेतकरी भावंडं आंब्यांच्या विपणनाबाबत माहिती पाहून आपसात चर्चा करत आहेत... पारंपरिक 'शेतकरी' या संकल्पनेला बाजूला सारून नव्या युगातील तंत्रज्ञानाला सोबत घेऊन यशाचे अनेक टप्पे सहजपणे पार करणाऱ्या हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या पावस येथील 'देसाई बंधूं'च्या फळबागेतील हे दृष्य... तंत्रज्ञानामुळे होणारे अनुकूल परिवर्तन आणि प्रक्रिया उद्योगाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या बंधुंपैकी आनंद देसाई यांना नुकतेच उद्यानपंडीत पुरस्काराने सन्मानित केले आहे.

Monday, January 23, 2012

कोट्याधीश संत्रा उत्पादक


अमरावती जिल्ह्याच्या पुसला येथील प्रगतशील युवा शेतकरी राजेंद्र केदार यांनी चक्क ४ कोटी रुपयांची संत्री विकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अलिकडच्या काळात संत्रा व्यवसाय डबघाईस आला असताना केदार यांनी मिळविलेले हे यश मात्र लक्षवेधक ठरले आहे. 

केदार यांच्या शेतात जवळजवळ एक कोटी संत्रा फळे आहेत. यातील ५० लाख संत्री तोडून बाजारातही गेली आहेत. मागील काही दिवसांपासून संत्र्यांची तोडणी सुरु असून त्यासाठी २०० महिला पुरुष सतत राबत आहेत. 

राजेंद्र केदार यांनी अमरावती विद्यापीठातून गणित विषयात बी.एस्‍सी केले आहे. त्यांचे सात भावंडांचे कुटुंब असून यातील चार शासकीय सेवेत कार्यरत आहेत तर तीन भावंडं शेती करतात. उच्चशिक्षित असतानाही राजेंद्र यांनी शेतीची वाट धरली हे विशेष. 

स्वखर्चातून बनतोय शेतरस्ता


शेतीच्या विकासात जर कुठला सर्वात मोठा अडचणीचा प्रश्न असेल तर तो म्हणजे शेतरस्त्यांचा. गावागावात शेत रस्त्यांमुळे वाद उभे राहिलेली अनेक उदाहरणे ऐकायला मिळतात. वर्षानुवर्षे सुरु असलेली ही अडचण सोडविण्यासाठी बुलडाणा तालुक्यातील माळवंडी गावात एक नवा प्रयोग पुढे आला आहे. येथील शेतकऱ्यांनी स्वत: पुढाकार घेत शेतरस्ता बनविण्याचे काम हाती घेतले आहे.

माळवंडी ते मातला हा शेतरस्ता कागदोपत्री मोठा असला तरी येथे प्रत्यक्षात बैलगाडी जाईल एवढीच वाट राहिली आहे. वर्षानुवर्षे या रस्त्यावरुन जाताना शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. दरवर्षी खड्डे भरावे लागायचे. यासाठी खर्चही मोठा व्हायचा. 

नान्नजची द्राक्षे सातासमुद्रापलिकडे


नान्नज म्हटले की नजरेसमोर उभे राहते ते सोलापूर जिल्ह्यात द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असलेले एक गाव. कै.नानासाहेब काळे आणि त्यांचे चिरंजीव कृषीभूषण दत्तात्रय काळे यांनी अथक परिश्रमातून द्राक्ष संशोधन आणि उत्पादनामध्ये जिल्ह्याची कीर्ती सातासमुद्रापलिकडे पोहोचविली आहे. 

नान्नजच्या कै.नानासाहेब काळे यांनी बारामतीहून १९५८ साली प्रथम बिया असलेल्या द्राक्षाचे वाण आणून त्याची लागवड केली. त्यावेळी जिल्ह्यात द्राक्षांच्या जाती विकसित झालेल्या नव्हत्या. त्यामुळे बिया असलेली द्राक्षेही चवीने खाल्ली जायची. परंतु बी विरहित द्राक्ष संशोधन करण्याचा कै.काळे यांनी ध्यास घेतला. त्यासाठी त्यांनी कॅलिफोर्नियात विकसित झालेल्या 'थॉमसन सिडलेस' या द्राक्षाच्या जातीचे वाण १९६४ साली बारामतीहून आणले. त्यावर सातत्याने संशोधन करून त्यांनी १९८० साली 'सोनाका' हे नवीन वाण शोधले. तर पुन्हा दहा वर्षानंतर १९९० साली 'शरद सिडलेस’चा उदय झाला. 

Wednesday, January 18, 2012

शेततळ्याच्या पाण्यावर भाजीपाल्याची शेती


कोरडवाहू शेती ही बहुतांशी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. पावसाच्या अनियमितेमुळे अशा शेतीमधून मिळणारे उत्पन्न हे खात्रीशीर राहत नाही. यावर सामूहिक शेततळ्याचा पर्याय शोधून पाण्याची सोय झाल्याने कोरडवाहू शेतीमधूनच अधिक आणि खात्रीशीर उत्पन्न घेण्याचा यशस्वी प्रयोग बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील कुबेफळ येथील शेतकरी रामराव फड यांनी करून दाखविला आहे.

फड यांनी कोरडवाहू शेतीला पाण्याचा शाश्वत आधार देण्यासाठी सामूहिक शेततळे तयार केले. शेताशेजारी असणाऱ्या ओढ्यावर सिमेंट बंधारा बांधला. त्यामुळे पाण्याची पातळी वर आली आहे. बंधाऱ्यालगत ४४ बाय ४४ मीटर आकाराचे १ कोटी २० लाख लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले. या शेततळ्याचा फड यांना मोठा फायदा झाला असून कमी कालावधीत येणारी भाजीपाल्याची शेती या शेततळ्याच्या पाण्यावर त्यांनी फुलवली आहे.

स्थापत्य अभियंत्याने फुलवली आल्याची शेती


गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुका हा धान उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तथापि, धान उत्पादनाची शेती दिवसेंदिवस तोट्याची ठरत असल्याने शेतकरी वैफल्यग्रस्त होत आहेत. परंतु आधुनिक तंत्रज्ञान व अंगभूत सृजनात्मकता यांचा मेळ घालून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त प्रतापगड भागातील बेरोजगार स्थापत्य अभियंता यशवंत सोपानराव गणवीर यांनी शेतीमध्ये आल्याच्या शेतीचा नवा प्रयोग यशस्वी करुन दाखविला आहे.
यशवंत गणवीर यांनी आपल्या शेतीत अन्य पीक घेण्याची संकल्पना आखून तीन एकर शेतीत लगेच आर्थिक प्राप्ती होईल अशी पिके घेण्याचे ठरविले. अडीच एकर शेतीत त्यांनी आल्याची लागवड करुन सुमारे २५ टन उत्पादन घेतले आणि इतरांसाठी आदर्श निर्माण केला. त्यांचा आत्मविश्वास त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला. त्याबरोबरच अर्ध्या एकर शेतीत त्यांनी हायब्रीड चना, मिरची, वांगी, बीट, कोथिंबीर व अन्य पिकांची लागवड केली. यातून वर्षाला ५० हजाराचे उत्पन्न घेण्याचा त्यांचा मानस आहे.

रेशीम उद्योगाने दाखविली प्रगतीची वाट


परंपरागत शेतीबरोबरच रेशीमकोष निर्मितीचा नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील शेणोली येथील तरुण शेतकरी दीपक लोंढे यांनी उत्पन्न वाढीबरोबरच शेतकऱ्यांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीत परंपरागत शेतीपद्धतीबरोबरच नव्या पद्धतीने रेशीमकोष निर्मितीत यशस्वी पुढाकार घेतला आहे. 

लोंढे हे गेल्या दहा वर्षापासून रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग करीत आहेत. त्यांनी सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर रेशीम उद्योग उभारला. बघता-बघता यात यश मिळत गेले. या उद्योगात नाविन्यता टिकवून रेशीमकोष निर्मिती करताना सायकल पद्धतीचा अवलंब करण्यात आला. निव्वळ शेतपिके न घेता त्याला शेतीपूरक व्यवसायाची जोड देऊन शेतकऱ्यांच्या अर्थिक परिवर्तनाचा नवा विचार त्यांनी याद्वारे मांडला आहे. 

पीकपद्धती बदलून सुपनेत विविध प्रयोग


शेतीत सलग तीच तीच पिके घेतल्याने जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते. त्यासाठी पिकात फेरपालट व पिकाच्या मुळी बदलाने जमिनीचा कस टिकून राहतो. हे तंत्र लक्षात आल्याने सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील सुपने येथील शेतीनिष्ठ प्रकाश आकाराम पाटील यांनी त्यांच्या शेतात विविधांगी प्रयोगांचा राबता सुरु ठेवला आहे. 

गेल्या दहा वर्षापासून श्री.पाटील हे स्वीटकॉर्न या मक्याच्या प्रकाराचे यशस्वी उत्पादन घेत आहेत. ऊसात आंतरपिके, शास्त्रशुद्ध मशागती व उपलब्ध शेतीचा पुरेपूर वापर करण्यात ते आघाडीवर आहेत. दैनंदिन सामाजिक व राजकीय क्षेत्रातील धडपडीबरोबर त्यांनी शेतीशीही आपले नाते घट्ट ठेवले आहे. 

सुपने विभागात त्यांची शेतजमीन मध्यम काळ्या प्रतीची आहे. उत्पादनासाठी जमीन पोषक असली, तरी शेतकऱ्यांना पिके घेताना प्रचंड मेहनत व चिकीत्सकपणा ठेवावा लागतो. या विभागातील ज्येष्ठ नेते (कै.) आकाराम गणपती पाटील यांना शेतीची नस माहिती होती. त्यांनी पारंपरिक शेती व्यवसायात विक्रमी उत्पन्नाच्या माध्यमातून तालुक्यात शेती प्रगतीचा वेगळा पायंडा निर्माण केला होता. सातत्याने डोक्यात शेतीची प्रयोगशाळा राबविणाऱ्या विचाराचे त्यांचे चिरंजीव प्रकाश पाटील यांनीही तोच प्रयोग पुढे सुरू ठेवला आहे. 

कोयना नदीवरुन लिफ्टने पाणी आणून त्यांनी आठ एकर शेतीला पाणीपुरवठा केला आहे. शेतकरी नगदी पिकांच्या उत्पन्नासाठी सर्रास प्रयत्नशील असतात. मात्र, प्रकाश पाटील एखाद्या पिकाकडे नगदी भावनेने न पाहता ठरलेल्या गणितानुसार उत्पन्न घ्यायचा जीव ओतून प्रयत्न करतात व नंतर त्या पिकात फेरपालट करतात. फेरपालट करताना पिकाची मुळी बदलण्यासाठीही त्यांचा विशेष प्रयत्न असतो. प्रत्येक वेळी जमिनीची पोत जाणून घेऊनच ते नवी पिके घेतात. त्याबरोबर हवामानाच्या अंदाजालाही त्यांनी महत्त्व दिले आहे. 

गेल्या दहा वर्षांपासून शेतीतील विविध ठिकाणी आलटून पालटून ते स्वीटकॉर्नचे उत्पन्न घेत आहेत. पिकासाठी सर्वार्थाने प्रयत्न करायचे, नंतर त्या प्रयत्नातून उत्पन्नाचे गणित मांडायचे व ठराविक उत्पन्नाची हमी घ्यायची हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. मक्यातून गुंठ्यास एक हजार रुपये उत्पन्न घेण्यात त्यांनी आघाडी ठेवली आहे. 

खरीपाच्या हंगामात ते बीजप्रक्रिया करुन सोयाबीन व भुईमुगाचे उत्पन्न घेतात. त्या पिकात घरखर्चासाठी मिरचीचे आंतरपीक घेण्याची त्यांची प्रथा आहे. त्यानंतर सुरु हंगामातील ऊसाच्या लागणी घ्यायच्या व त्यामध्येही मिरचीचे आंतरपीक घ्यायचे. ऊसातून एकरी पावणेदोन ते दोन टन उत्पन्न घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राहत्या घरालगतच त्यांचे गुऱ्हाळघर आहे. गुऱ्हाळ बंद झाल्यानंतर त्यालगतच्या शेतजमिनीत मशागत करुन ते स्वीटकॉर्नचे उत्पन्न घेतात. त्यांनतर दसरा सणाचा अंदाज घेऊन झेंडू फुलांचे उत्पन्न घेण्याची त्यांची परंपरा आहे. झेंडूच्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीत गुंठ्यास सातशे ते एक हजार रुपये उत्पन्न त्यांनी घेतले आहे. 

चार ते पाच फुटांचे अंतर ठेवून दोनआड ऊसाच्या पट्टा पद्धतीबरोबर त्यात हरभरा, लसूण व मिरचीची आंतरपिके त्यांनी घेतली आहेत. सोळा टक्के ब्रीक्स (गोडी) असणाऱ्या तैवानच्या कलिंगडाचे तालुक्यात प्रथमच त्यांनी मल्चिंग पद्धतीतून उत्पादन घेतले होते. त्यातून तीन महिन्यात तीस गुंठ्यांत ४७ हजारांचे उत्पन्न मिळाले होते. तसेच टरबूज, भात, देशी केळी, गव्हाचेही यशस्वी प्रयोग त्यांनी आतापर्यंत केले आहेत.

मुख्य पीक निघाल्यानंतर त्या शेताची जुळून नांगरट करायची, दोन वर्षांच्या फेऱ्यातून एकरी सात ट्रेलर शेणखत घालून शेताला विश्रांती द्यायाची व त्या वेळेत उपलब्धतेनुसार मेंढरांचे वाढे बसवण्याची त्यांची मशागत पद्धत आहे. एखाद्याने त्यांच्या शेतावर यावे आणि विविध प्रयोगांचा राबता पाहून केवळ शेतीच्या अभ्यासात गुंतावे, असे त्यांच्या शेतावरील फेरीतून जाणवते. त्यांची ही पद्धत शेतकऱ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणारी आहे.

ऊसाला पर्याय अद्रक शेतीचा


ऊसाची शेती ही सधन शेती म्हणून ओळखली जाते. सध्या या पिकावर अशाश्वत भावाचे आलेले संकट पाहिले तर ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र ऊसाला पर्याय म्हणून आता आल्याची (अद्रक) शेती हा पर्याय पुढे येत असून सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील वाकाव येथे अनिल मगर या वाणिज्य शाखेतील पदवीधर शेतकऱ्याने हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे.

स्वत:च्या शेतीमध्ये 12 एकर क्षेत्रात ऊसाची लागवड केलेली असताना देखील आल्याच्या पिकाकडे वळण्याचे कारण सांगताना मगर म्हणाले की, ऊसाच्या लागवडीपासून विजेची समस्या, मजुरांची टंचाई या समस्यांना सामोरे जात असताना तो कारखान्यात जाईपर्यंत जीवात जीव नसायचा. शिवाय, टनेज वाढविण्यासाठी तळहाताच्या फोडाप्रमाणे ऊसाची जोपासना करावी लागते आणि भाव किती द्यायचा, हे कारखान्याच्या हातात! त्यामुळे हे कुठेतरी थांबले पाहिजे, असा विचार मनात आला. पंढरपूर तालुक्यात कान्हापुरी परिसरात मोठ्या प्रमाणात आल्याचे पीक घेतले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिथे जाऊन या पिकाची माहिती घेतली आणि सुरुवातीला दोन एकर क्षेत्रात आल्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला.

Thursday, January 12, 2012

आठ एकरात डाळिंबाचे ७० टन उत्पादन


सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील राजाळे जवळच्या बिरदेवनगर (जाधववाडी) हद्दीत आठ एकर क्षेत्रातून विनायक मनोहर नामजोशी यांनी भगव्या जातीच्या डाळिंबाचे ७० टन उत्पादन घेण्यात यश मिळविले आहे. 

श्री. नामजोशी हे फलटण संस्थानाचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांचे नातू आहेत. ते शेती पिकविण्यात आनंद मानतात. त्यांनी येथील शेतील ऊस पीक घेतले आहे, तर बिरदेवनगर (जाधववाडी) हद्दीतील जमिनीचे दर गगनाला भिडलेले असताना त्यांनी १३ एकर क्षेत्रात डाळिंब पीक घेणे पसंत केले आहे. 

मत्स्यबीजोत्पादनात सातारा आघाडीवर..


सातारा जिल्ह्याने मत्स्यबीजोत्पादनात पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये आघाडी घेतली आहे. मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ३ कोटी १२ लाख मत्स्यबीजांचे उत्पादन केवळ सातारा जिल्हयात झाले असून, ३०० मे. टन मत्स्योत्पादन करण्यात आले आहे. मत्स्योत्पादनामुळे १९ लाख ६० हजार ६२८ रुपयांचा महसूल जिल्ह्याला मिळाला आहे.

पावसाळ्यात जून-जूलै महिना माशांच्या प्रजोत्पादनाचा (ब्रिडिंग) हंगाम आहे. जिल्ह्यातील धोम मत्स्यबीज केंद्रात मत्स्य विभागाच्या वतीने माशांना इंजेक्शन देण्यात येते. त्यानंतर हे मासे अंडी घालतात व त्यापासून तयार होणारी मत्स्यबीजे धरून ती धोम तलावात साठवून त्यापासून बोटुकली व मत्स्योत्पादन घेतले जाते.

Friday, January 6, 2012

शेतात उमलले समृध्‍दीचे फूल



लहरी निसर्गावर अवलंबून राहत कापूस आणि सोयाबीन यांची परंपरागत शेती करण्‍यापेक्षा फूलशेतीचा वेगळा पर्याय निवडणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत नाही. ती शेती फायद्याची ठरते, असे यशस्‍वी प्रयोगाअंती वर्धा जिल्‍ह्यामधील सेलू तालुक्‍यातील वाहिदपूर गावच्‍या संजय अवचट यांनी दाखवून दिले आहे.

श्री. अवचट हे पॉलिहाऊस उभारुन तेथे जरबेरा या जातीच्या फुलाचे उत्पादन घेत आहेत. त्यांनी सेलूच्या बँक ऑफ इंडियाकडून ९.७५ लक्ष रुपयांचे कर्ज घेतले. त्यामध्ये अनुदान ३.१५ लक्ष रुपये मिळाले. एकूण १३ लक्ष १२ हजार रुपयांमध्ये पॉलिहाऊसची उभारणी करण्यात आली. या पॉलिहाऊसचे आकारमान ३६ × २८ चौ.मी. असून जरबेरा जातीच्या फोर्जा, बॅलेट, प्राईम रोज, गोलीमय, दाना ऐलीन, इन्सरन्स मनीबलू या फुलांचे उत्पादन घेण्यात येते.

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद