उन्हाळा सुरु झाला की, पिण्याच्या पाण्याच्या टंचाईलाही सुरुवात होते. टंचाईग्रस्त गावांना टँकर अथवा इतर स्त्रोताच्या माध्यमातून पिण्याचा पाण्याचा पुरवठा केल्या जातो. पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक गाव स्वयंपूर्ण व्हावे ही शासनाची भूमिका आहे. या भूमिकेला लोकसहभागाची साथ मिळाली तर प्रत्येक गाव पिण्याच्या पाण्यासाठी स्वयंपूर्ण होऊ शकते हे धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेंदुरजना खुर्द या गावाने दाखवून दिले आहे. या गावाचा आदर्श सर्वांसाठीच प्रेणादायी ठरणार आहे.
शेंदुरजना खुर्द हे जेमतेम अडीच हजार वस्तीचं गाव. या गावाला नेहमीच उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्यामुळे शेतकर्यांच्या शेतातील खाजगी विहीरी अधिग्रहीत करुन पिण्याचे पाणी पुरविण्यात येत होते. दरवर्षी येणारा उन्हाळा हा पाणीटंचाई घेवूनच येत होता. आणि पिण्याच्या पाण्यासाठी गावातील वादही विकोपाला जात होते. याच गावचे सरपंच श्री. देशमुख यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडे पिण्याचा पाण्याच्या टंचाई निवारण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. तसेच ग्रामस्थांना एकत्र करुन चर्चा केली. यासाठी राष्ट्रीय पेयजल अभियानांतर्गत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण योजना शेंदुरजना खुर्द या गावात राबवावी अशी विनंती केली.
त्यानुसार भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक अरविंद वडस्कर व विश्वास वालदे यांनी या गावाला भेट देऊन संपूर्ण परिसराची भूवैज्ञानिकीय पाहणी केली. तसेच या विभागाचे तज्ज्ञ उपसंचालक अजय कर्वे यांचे मार्गदर्शन घेऊन पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची शाश्वतता व सुरक्षितता वाढविण्याच्यादृष्टिने नियोजन केले.
शेंदुरजना खुर्द या गावाला तीन किलोमीटर अंतरावरुन एका शेताजवळील नालाकाठी असलेल्या विहीरीतून पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु या विहीरीमध्ये जलधारक भूस्तरातून पाण्याचे प्रवाह नसल्यामुळे केवळ दीड तास पाणी उपलब्ध होत होते. पर्यायाने या गावाला नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता.
विहीरीच्या परीसरातील भूस्तराचा सर्वंकष अभ्यास करुन विहीरीभोवती अर्धवर्तुळाकार ट्रेंन्ज व नाल्याच्या पात्रामध्ये उभा ट्रेंन्ज खोदून फिल्टर माध्यम भरुन घेण्याची योजना आखण्यात आली. तत्पूर्वी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने या विहीरीला लागून नाल्याच्या पात्रामध्ये सिमेंट बंधार्याचे काम ग्रामपंचायतीव्दारा करण्याची मंजूरी दिली होती. हे काम सुरु असतांनाच भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी व सरपंच श्री. देशमुख यांनी विहीरीतील भूजल पातळी वाढविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती सर्व ग्रामस्थाना दिली.
भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने राबविलेल्या या अभिनव उपक्रमामुळे जलधारक खडकातील पाणी विहीरीचे बांधकामातील पाडलेल्या छिद्राव्दारे विहीरीमध्ये भरपूर जलदाबाने फेकले गेले व अर्ध्यातासातच विहीरीतील पाण्याच्या पातळीमध्ये आश्चर्यजनक वाढ झाली. त्यानंतर विहीरीवर ७.५० अश्वशक्ती सबमर्शीबल पंप व १० अश्वशक्ती डिझेल इंजिनव्दारे पाण्याचा उपसा केला असता विहीरीतील पाण्याची पातळी ६ इंचापेक्षा जास्त खाली जात नाही हे स्पष्ट झाले.
यापूर्वी या विहीरीतून दीड तासात पाण्याचा उपसा केला असता विहीर १५.५० मीटरपर्यंत कोरडी होत असल्यामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याचे सरपंच श्री. देशमुख यांनी सांगितले. राष्ट्रीय पेयजल अभियानांतर्गत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणांतर्गत अमरावती जिल्ह्यात राबविण्यात आलेला हा उपक्रम यशस्वी ठरल्यामुळे इतर गावातही या उपक्रमाव्दारे भूजलसाठय़ामध्ये वाढ करण्याची योजना प्रभाविपणे राबविण्यात येत आहे.
या उपक्रमामुळे भूजल साठय़ात वाढ झाली असली तरी पावसाचे पाणी भूगर्भात साठविण्यासाठी लोकचळवळ उभी करण्याचा या गावचा संकल्प असून पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची शाश्वतता व सुरक्षितता वाढविण्यासाठी सरपंच श्री. देशमुख यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प यशस्वी ठरला आहे, आणि इतर गावांसाठीही हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.
No comments:
Post a Comment