Monday, June 27, 2011

कृषी विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना.
भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे शेतीबाबतच्या कुठल्याही गोष्टीला ओघाने महत्त्व आलेच. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ठाणे जिल्हा कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने अनेक नाविन्यपूर्ण योजना हाती घेतल्या आहेत. आदिवासी व शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढवणे हा त्या मागचा मुख्य हेतू.

कृषि विभागाच्या या मोहिमेमध्ये नेहमीच्या भातशेतीशिवाय फुलशेतीवर भर देण्यात आला आहे. त्यामध्ये मोगरा आणि सोनचाफ्याचा सुगंध आदिवासींच्या जीवनात बहार घेऊन येणार आहे. मोगरा लागवडीअंतर्गत स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. आदिवासी भागातील शेतकऱ्यांना मोगरा लागवड तशी परिचित आहे. मोगरा लागवडीतून एकरी किमान एक लाखाचे वार्षिक उत्पन्न अपेक्षित असते.

या धडक मोहिमेअंतर्गत ७०९ शेतकऱ्यांची ५४० एकर क्षेत्रावर मोगरा लागवड पूर्ण झाली आहे. पुढील २ वर्षात १००० एकर क्षेत्रावर मोगरा लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी आदिवासी उपयोजनेतून पूरक अनुदान देण्यात येणार आहे.

कृषि विभागाची दुसरी योजना आहे सोनचाफा लागवडीची. आदिवासी भागात नाविन्यपूर्ण सोनचाफा लागवडीसाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या सहकार्यातून ही योजना हाती घेण्यात आली आहे.

सोनचाफा लागवडीतूनही एकरी १ लाखाचे उत्पन्न हमखास मिळतेच. या योजनेमधून २०१०-११ या वर्षामध्ये ५० शेतकऱ्यांना २ हजार कलमांचे वाटप करण्यात आले आहे. तर २०११-१२ मध्ये ३० एकर क्षेत्रावर १० हजार कलमांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. मोगरा आणि सोनचाफा लागवडीतून रोजच्या कमी प्रयत्नांमधून आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळू लागणार आहे.

फुलशेतीचा आधार घेऊन बचतगटाद्वारे व्यवसायाभिमुख शेतीवरही कृषि विभागाने भर दिला आहे. त्याअंतर्गत मागणी व उपलब्ध बाजारपेठ विचारात घेऊन भाजीपाला व फुलांचे उत्पादन करण्यास चालना देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या बचत गटांना पायाभूत सुविधा रक्कम ३० हजार रुपयांच्या मर्यादेत लाभ मिळणार आहे.

फुलशेतीशिवाय आतापर्यंत राज्यात सांगली, सातारा भागाचे वर्चस्व असलेल्या हळद लागवडीसाठी जव्हार, मोखाडा भागातील आदिवासी शेतकरी उत्सुक आहेत. त्यासाठी १०० शेतकऱ्यांच्या गटाची स्थापना करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांना सातारा, सांगली भागाची सहल घडवण्यात आली व त्यांना हळद लागवडीचे प्रशिक्षणही देण्यात आले.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी तामिळनाडूमधील सेलममधून उच्च प्रतीचे बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत विशेष पतपुरवठा करण्यात येणार आहे. शिवाय आदिवासी उपयोजना अंतर्गत पूरक निधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.कृषि विभागाच्या शिंदी लागवड विशेष मोहिमेसाठी कोसबाडच्या कृषि विज्ञान केंद्रातून रोपे आणण्यात आली आहेत. लागवडीनंतर ५ वर्षांनी दर दिवशी ३ ते ४ लिटर प्रतिझाड निरा मिळते. वर्षातून १०० दिवस निरा उत्पादन होते. एका झाडातून शेतकऱ्याला १५०० रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळते. त्यामुळे शिंदी लागवडही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.

आदिवासी भागात शेडनेट हाऊस उभारणीसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र, पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील फलोत्पादन प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण, शेडनेट हाऊस उभारणी ते विक्री व्यवस्थापनापर्यंतचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना देण्यात येते. २०११-१२ मध्ये १०० शेडनेट हाऊस उभारणीचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत उभारल्या गेलेल्या ३१ पैकी २२ शेडनेट हाऊस आदिवासी शेतकऱ्यांनी उभारले आहेत.

सर्वात महत्त्वाचे आदिवासी व मागासवर्गीय शेतकऱ्यांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याची योजना आहे. त्यासाठी २० हजार पेक्षा कमी उत्पन्न व ६ एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे. गेल्या पाच वर्षांत ५९४५ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. २०११-१२ वर्षामध्ये १५०० लाभार्थ्यांची निवड करण्याचे नियोजित आहे.

ग्राहकांना नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली फळे मिळावीत, यासाठी ८ रायपनिंग चेंबर (फळ पिकवणे केंद्र)ची उभारणी करण्यात आली आहे. २०११-१२ मध्ये १० रायपनिंग चेंबर व ५० हजार मे. टन क्षमतेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याशिवाय, शेततळ्यांच्या बांधावर शेवगा लागवड, शेततळ्यात मत्स्य उत्पादन, बांधावर तूर लागवड, चारा विकास प्रकल्प, शंखी गोगलगाय निर्मूलन या छोट्या पण महत्त्वाच्या योजनांबाबतही सतर्कता दाखवण्यात आली आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकरी जनता अपघात विमा योजनेचा समावेश आहे. १० ते ७५ वर्षे वयोगटातील राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू आहे. वाहन अपघात, सर्पदंश, विंचू दंश, वीज पडून मृत्यू, पाण्यात बुडुन मृत्यू या कारणांनी मृत्यु किंवा अपंगत्त्व आल्यास विमा संरक्षण मिळणार आहे. या दुर्घटनांमध्ये मृत्यु पावल्यास मृताच्या वारसांना १ लाख रुपये तर अपंगत्त्व आल्यास ५० हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. कृषि यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत २५ व ५० टक्के अनुदानावर अवजारांचा पुरवठा करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना खरीप हंगामात अधिकाधिक सुलभ पद्धतीने लागवड करण्यासाठी या योजनांचा निश्चितच लाभ होणार आहे. नेहमीच्या योजनांव्यतिरिक्त शेतकऱ्यांची सामाजिक व आर्थिक विषमता दूर करण्यासाठी कृषि विभागाने उचललेले हे पुढचे पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे.

जिल्हाधिकारी ए. एल. जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विभाग या योजना राबवित आहे. या योजनांबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित, राज्याचे कृषि आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

3 comments:

  1. सोनचाफा रोपे तयार मिळतील संपर्क मो न 9822050489 / 8830336625 वैशिष्ट्य सल्ला व मार्गदर्शन तसेच रोपे घरपोच मिळतील

    ReplyDelete
  2. सोनचाफा रोपे तयार मिळतील संपर्क मो न 9822050489 / 8830336625 वैशिष्ट्य सल्ला व मार्गदर्शन तसेच रोपे घरपोच मिळतील

    ReplyDelete
  3. निरा लागवडीसाठी योग्य मार्गदर्शन कोण करेल ?

    ReplyDelete

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद