नागरिकांचा सामूहिक आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने शासनाने बचत गटांना प्रोत्साहन दिले. अत्यल्प दरात या बचत गटांना उद्योगासाठी कर्ज उपलब्ध होत असल्याने अनेक बचत गटांनी आपल्या प्रगतीचा टप्पा गाठत यातील सदस्यांचेही जीवनमान उंचावले आहे. काम करण्याची जिद्द आणि परिश्रम यावर बचत गटांनी विविध प्रकल्प हाती घेतले असून त्यात त्यांना यशही मिळत आहे. विशेष म्हणजे बचत गटांचे उत्पादन आज दैनंदिन जीवनाचा घटक बनला आहे.
परभणी येथील कृषी विद्यापीठातील सोयाबीन प्रक्रिया केंद्र लघु उद्योजकांसह महिला बचत गटांसाठी संजीवनी ठरत आहे. विद्यापीठाच्या अभियांत्रीकी महाविद्यालयाअंतर्गत येणा-या सोयाबीन प्रक्रिया केंद्रातून महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रीकी महाविद्यालयात २००५ पासून सोयाबीन प्रक्रिया केंद्र कार्यान्वीत झाले महाराष्ट्रात कार्यरत असलेला हा एकमेव प्रकल्प आहे.
सोयाबीन हे अल्पकालावधीत येणारे आणि हमखास बाजारभाव मिळवून देणारे नगदी पीक शेतक-यांच्या विश्वासाला पात्र ठरले आहे. अलिकडील काळात सोयाबीनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सोयाबीनच्या उत्पादनाच्याबाबतीत मध्यप्रदेश खालोखाल महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागत आहे. देशातील एकूण उत्पादनाच्या ५० टक्के उत्पादन एकट्या मध्यप्रदेशात घेतले जाते.
महाराष्ट्र, राजस्थान व उत्तरप्रदेश या राज्यांमध्येही सोयाबीनचे पीक समाधानकारक घेतले जाते. मराठवाडा विभागात सोयाबीनचे सुधारित वाण परभणी सोना, एमएसएस-४७, जवाहर जे.एस.-३३५, समृध्दी एमएयूएस-७१, शक्ती एमएयूएस-८१ यासह प्रसाद एमएयुएस-३२, आणि एमएयुएस-६१ या वाणीची लागवड केली जाते. सोयाबीन हे कडधान्य व गळीत धान्य या दोन्ही प्रकारात मोडत असून त्यातील तेल व प्रथिने यासाठी प्रामुख्याने त्याचे उत्पादन घेतले जाते.
सोयाबीनचा दैनंदिन आहारात कसा वापर करावा याचे ज्ञान नसल्यामुळे पाहिजे तेवढ्या प्रमाणात आहारामध्ये सोयाबीनचा वापर होत नाही. प्रक्रिया युक्त सोयाबीनचा वापर आपण रोजच्या आहारात केल्यास चांगले आरोग्य मिळेल. गायी-म्हशीच्या दुधाइतकेच सोयाबीनचे दूध पोष्टीक असून १ किलो सायोबीन पासून ८ लिटर दुध मिळते. सोयाबीन प्रक्रिया केंद्राने सोयादुध व सोया पनीर याचेसुध्दा उत्पादन केले.
बचत गटाच्या महिला सोयाबीन वर प्रक्रिया करुन उत्पादनांची निर्मिती करत महिन्याला १० ते १५ हजार रुपये घरबसल्या कमवू शकतात. सोयाबीनवर आधारित प्रक्रिया प्रशिक्षण दोन दिवसाच्या कालावधीत लघु उद्योजकांसह महिला बचत गटांना देण्यात आले आहे. सोयाबीन प्रक्रिया केंद्र हे महाराष्ट्रातील एकमेव प्रक्रिया केंद्र आहे. सोयाबीन पासून मिळणा-या प्रथिनांची गुणवत्ता चांगली आहे
सध्या बाजारात सहजपणे काही प्रमुख प्रचलित असलेले पदार्थ म्हणजे सोयातेल, सोयापीठ व सोयादुध. या पदार्थावर पुन्हा प्रक्रिया केल्यास अनेक खाद्य पदार्थ सोयाबीनपासून तयार होऊ शकतात. सोयाबीन हे इतर कुठल्याही कडधान्याच्या तेलबियांच्या किंवा वनस्पतीजन्य इतर कोणत्याही अन्नपदार्थाच्या पोषणमुल्यांच्या बाबतीत आघाडीवर आहे. सोयाबीन पासून मिळणा-या प्रथिनांचे प्रमाण डाळी, शेंगदाणे. मांस व मासे यांच्या तुलनेत दुप्पट, अंड्याच्या तिप्पट व दुधाच्या १० पट इतके आहे.
जेव्हा सोयाबीन इतर कडधान्यासोबत वापरले जाते तेव्हा त्या पदार्थ्यांचे पोषणमुल्य वाढते. सोयाबीनपासून पुर्ण स्निग्धांशयुक्त सोयापीठ तयार करता येते. याचा वापर बेकरी, उत्पादनात केक, मर्फीन्स, बिस्किटे, ब्रेड तसेच पारंपारिक पदार्थामध्येसुध्दा करता येतो. दुग्धजन्य उत्पादनामध्ये सोयादुध, सोयापनीर, सोयादही, सोयाताक, सोया लस्सी, सोया आईस्क्रीम यासह पूर्ण सोयाबीनवर प्रक्रिया केल्यास मुख्यत्वे सोयायुक्त, सोजी व पोहे बनविता येतात. सोयपीठाचा वापर पारंपारिक पदार्थामध्ये करुन लाडू, चकली, शेव तसेच बेकरीच्या विविध पदार्थांसह सोयापीठाच्या वापरातुन ढोकळा, खाकरा, इडली, डोसा व अन्य पारंपारिक पदार्थ बनविता येतात.
महाराष्ट्रात एकमेव असलेला कृषी विद्यापीठातील सोयाबीन प्रकल्पातून बचतगटाच्या महिलांनी प्रशिक्षण घेऊन नागरिकांना सुध्दा सोया उत्पादने देण्याबरोबरच स्वत:ची आर्थिक स्थितीसुध्दा सुधारली आहे.
No comments:
Post a Comment