ग्रामीण भागातील बहुतांश महिलांचा मोठा व्यवसाय करण्याकडे कल नसतो. घरातील घरात पापड लाटणे, लोणची बनविणे, खानावळ चालविणे सारखे व्यवसाय करतात . परंतू याला अपवाद ठरला खैरे गावातील महिला बचतगट.
वाडा तालुक्यातील मानिवली मध्ये असलेल्या खैरे गावातील कल्पना पाटील यांनी ११ महिलांचा बचतगट तयार केला. गावातील परिस्थितीचा अभ्यास करून शेळीपालन आणि शेती नांगरणीसाठी भाडेतत्वावर पॉवर टिलर टॅक्टर देण्याचा व्यवसाय सुरु केला. या पॉवर टिलर टॅक्टरसाठी बॅक ऑफ महाराष्ट्रकडून ५० हजार रुपयांचे कर्ज घेण्यात आले. व्यवसाय सुरु केला पण दुदैंवाने शेळीपालन व्यवसाय हवा तसा चालना नाही. तसेच शेती नांगरणीसाठी ट्रॅक्टरला मागणी न आल्याने संपूर्ण बचतगटच अडचणीत आला.
महिलांच्या अंगी असणारी जिद्द व चिकाटीमुळे त्या डगमगल्या नाहीत. या अडचणींवर मात करून नव्या उमेदीने त्यांनी वाडयातील सामाजिक वनीकरण विभागाकडून २५ हजार रुपयांचे अनुदान मिळविले. पुढे तर बँकांकडे कर्जासाठी हात न पसरता बचतगटाच्या सर्व महिलांनी २५ ते ३० हजार रुपये खर्च करून शेती व्यवसाय सुरु केला. शेतीत त्यांनी चवळी, मका, कारली असा भाजीचा मळा फुलवला. विशेष म्हणजे या महिलांच्या घरातील सर्वच मंडळी या भाजीपाला व्यवसायात हातभार लावत आहेत. साधारणपणे या भागात ५०० किलोचे उत्पादन होते. वाडा शहरात भाजीपाल्यासाठी मोठी बाजारपेठ नसल्याने नवी मुंबईतील व्यापारी हा भाजीपाला उचलतात. त्यामुळे बाजारभावाप्रमाणे त्यांना ५ ते १० हजार रुपये मिळतात.
महिला बचतगटाने फुलविलेल्या भाजीपाला व्यवसायातून महिलांचा आर्थिकस्तर उंचचावण्यास मदत झाली आहे. बँकेचे कर्ज वेळेत फेडणे, सामाजिक वनीकरणासाठी सहकार्य, भाजीपाला उत्पादनसारखा स्तुत्य उपक्रम राबविणे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या स्वर्ण जयंती ग्रामस्वयंरोजगार योजनेंतर्गत या महिला बचतगटाला ठाणे जिल्हा आणि कोकण विभागासाठी राजमाता जिजाऊ स्वालंबन पुरस्कार देण्यात आला.
No comments:
Post a Comment